वासनकर कुटुंबीयांच्या पोलिस कोठडीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

नागपूर - गुंतवणूकदारांची लुबाडणूक करणाऱ्या वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीचे संचालक प्रशांत वासनकर, भाग्यश्री वासनकर आणि विनय वासनकर यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. यानुसार 19 मेपर्यंत ते पोलिस कोठडीत राहणार आहेत. या प्रकरणी विशेष एमआयडी न्यायालयाचे न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

पोलिसांनी वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीच्या संचालकांना जुन्याच प्रकरणामध्ये अटक केली आहे. यामध्ये आरोपींनी जमा केलेल्या पैशातून सोने विकत घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना एमआयडी न्यायालयात सादर केले. त्यावर न्यायालयाने आरोपींना पोलिस कोठडी सुनावणी होती. पोलिस कोठडीमध्ये मुदतवाढ देण्यात यावी, अशी विनंती पोलिसांतर्फे करण्यात आली. यावर बचावपक्षाने तीव्र आक्षेप नोंदविला. पोलिसांनी यापूर्वीच सर्व सोने जप्त केले आहे. तसेच आरोपी प्रशांत वासनकर हा जवळपास गेल्या तीन वर्षांपासून कारागृहात असताना नव्याने चौकशीचे काहीही कारण नसल्याचा युक्‍तिवाद बचावपक्षातर्फे करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी पूर्वीच गुन्हा दाखल केलेला असून यामध्ये आता काहीही शिल्लक राहिले नसल्याचे बचावपक्षाचे म्हणणे आहे. तसेच पोलिस कोठडीमध्ये वाढ करणे निरर्थक असल्याच्या मुद्याकडे बचावपक्षाने न्यायालयाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेत न्यायालयाने अखेर पोलिस कोठडीमध्ये वाढ दिली. विनय वासनकरतर्फे ऍड. श्‍याम देवानी, ऍड. कैलाश डोडानी, ऍड. हितेश खंडवानी, प्रशांत वासनकरतर्फे ऍड. चैतन्य बर्वे, भाग्यश्री वासनकरतर्फे ऍड. हर्षल पुराणिक यांनी तर सरकारतर्फे सरकारी वकील कल्पना पांडे यांनी बाजू मांडली.

Web Title: vasankar family increase police custody