हायकोर्टात व्हीसीएचा पोलिसांवर 'बाऊन्सर'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

नागपूर - भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 सामन्यापूर्वीच व्हीसीए (विदर्भ क्रिकेट असोसिएशन) आणि पोलिसांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगू लागला होता. परवानगी नसताना सामना घेतल्याचा आक्षेप नोंदवत पोलिसांनी सामन्यानंतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून व्हीसीएला "बीट' करण्याचा प्रयत्न केला. परंतु, हा सर्व प्रकार केवळ "पास' नाकारल्यामुळे पोलिस करीत आहेत असा "बाऊन्सर' टाकत व्हीसीएने सामना आपल्या बाजूने झुकवला. आज न्यायालयानेच "पास' स्वरूपात पोलिसांकडून खंडणी मागण्याचा प्रकार झाल्याचे ताशेरे ओढले.

व्हीसीएने सुरक्षेच्यादृष्टीने आवश्‍यक असलेली परवानगी न घेता सामन्यादरम्यान ध्वनी प्रदूषण केल्याबद्दल हिंगणा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांनी दोन गुन्हे नोंदविले होते. याविरुद्ध व्हीसीएने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. आज गुरुवारी (ता. 2) झालेल्या सुनावणीदरम्यान व्हीसीएने चौफेर फटकेबाजी करत पोलिसांचे खरे स्वरूप न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. पोलिसांनी व्हीसीएकडे 500 "पास'ची मागणी केली होती. व्हीसीएने 217 पासेस दिल्या. मात्र, त्यानंतरही आणखी "पास' द्या अन्यथा सामना निर्विघ्न पार पडणार नाही, अशा धमक्‍या पोलिसांनी दिल्या. त्याच आकसातून गुन्हे दाखल करण्यात आल्याचे व्हीसीएने न्यायालयाला सांगितले. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने पोलिसांचे काम सुरक्षाव्यवस्था पुरविणे आहे की "पास'च्या नावाखाली खंडणी मागणे? असा सवाल उपस्थित केला.

सुनावणीदरम्यान व्हीसीएने डीसीपी दर्जाचे वरिष्ठ पोलिस अधिकारी एसी बॉक्‍समध्ये बसून विनातिकीट क्रिकेट सामन्याचा आनंद घेत असल्याचे छायाचित्र न्यायालयाला दाखविले. यावर ताशेरे ओढत न्यायालयाने एसी बॉक्‍समध्ये बसून लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिस निभावत होते का? अशी विचारणा केली. तसेच व्हीसीएच्या जामठा स्टेडियममध्ये सुरक्षेच्या कुठल्या त्रुटी आहेत, याचा चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले. व्हीसीएतर्फे वरिष्ठ अधिवक्ता सुनील मनोहर तर सरकारतर्फे मुख्य सरकारी वकील भारती डांगरे यांनी बाजू मांडली.

"पास' बंद करता येईल का?
"पास' मिळविण्यासाठी पोलिसांनी केलेला गैरप्रकार लक्षात घेत ही सोय बंद करता येणार नाही का? अशी विचारणा न्यायालयाने केली. व्हीसीएतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच पोलिसांना "पास' दिल्या जातात. मात्र, पोलिसांनी प्रत्येकवेळी व्हीसीएचे अध्यक्ष ऍड. आनंद जयस्वाल यांच्याकडे 500 "पास'ची मागणी केली, हे येथे उल्लेखनीय!

Web Title: vca bouncer on police in high court