वेगाचा व्हिडिओ बेतला जिवावर! 

उदय कैलास बाटे
उदय कैलास बाटे

खापरखेडा (जि.नागपूर) : वेगाने दुचाकी वाहन चालवत असताना त्याचा व्हिडिओ बनविणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. चित्रीकरण करताना नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर आदळून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी कोराडीनजीकच्या नांदा फाट्यावर सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. उदय कैलास बाटे (वय 23, रा. वॉर्ड 2, नवीन बिना, भानेगाव) असे मृताचे नाव आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, उदय हा सायंकाळी सहाच्या सुमारास कोराडीला काही कामानिमित्त गेला होता. खापरखेडा येथे दुचाकीने परत येत असताना तो वेगाने चालवत होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, उदय वेगाने गाडी चालवीत असताना व्हिडिओ तयार करीत होता. यामुळे त्याचे नियंत्रण बिघडले व तो दुभाजकावर आदळला. त्याची दुचाकी तब्बल शंभर मीटरपर्यंत घासत गेली. अपघातानंतर मार्गावरून ये-जा करणाऱ्यांनी एकच गर्दी केली. नागरिकांनी खापरखेडा पोलिसांना माहिती दिली. खापरखेडा पोलिसांनी लागलीच घटनास्थळ दाखल करून मृतदेहाला शवविच्छेदनासाठी नागपुरातील मेयो रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास करीत आहेत. 
हेल्मेट असते तर वाचला असता जीव 
उदय वेगाने गाडी चालवीत होता, मात्र त्याने हेल्मेट घातले नव्हते. यामुळे दुभाजकावर आदळताच त्याचे डोके फुटले व तो जागीच ठार झाला. त्याच्या डोक्‍यात हेल्मेट असते तर जीव वाचू शकला असल्याची चर्चा घटनास्थळी नागरिक करीत होते. मृताचे रेडिमेड कापडाचे दुकान व ऑटो डीलचे काम आहे. अविवाहित असलेल्या उदयच्या निधनाने कुटुंबात शोककळा पसरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com