बाजारात झाली गर्दीचगर्दी, अखेर कडकडीत बंदचा निर्णय

lakhani
lakhani

लाखनी (जि. भंडारा) : गेल्या मंगळवारी मुरमाडी (सावरी) येथे भाजीपाल्याची इतकी दुकाने लागली की, त्याला आठवडी बाजाराचे स्वरूप आले. त्यामुळे या आठवड्यात दुकाने लावण्याबाबत मुरमाडी ग्रामपंचायत व लाखनी नगर पंचायतींनी एकमेकांकडे बोट दाखवले. शेवटी तहसीलदारांच्या आदेशाने आज, औषधांशिवाय सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.
लॉकडाउनच्या काळात जीवनावश्‍यक वस्तू व भाजीपाला विक्री सुरू असली तरी, सावधगिरीतून सर्व गावांतील आठवडी बाजार भरवण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे मार्च महिन्यापासून आठवडी बाजार भरलेच नाही. शहरातील रिकाम्या जागेवर भाजीपाला, फळे विक्रीची दुकाने लावण्यास परवानगी दिली आहे. यामुळे प्रत्येक भागातील नागरिक भाजीखरेदी करताना गर्दी होणार नाही, याबाबत लक्ष ठेवले जात आहे.
लाखनी येथे दर मंगळवारी आठवडी बाजार भरतो. तालुक्‍यातील 25 ते 30 गावांतील नागरिक व शेतकरी या बाजारात येतात. यात लगतच्या तालुक्‍यातील व्यावसायिक व विक्रेतेसुद्धा मोठ्या संख्येने येतात. आता लॉकडाउनमुळे आठवडी बाजार भरविण्यास मनाई केली आहे. भाजीपाला व फळ विक्रीची दुकाने दररोज विशिष्ट कालावधीत सुरू ठेवली जातात.
मात्र, गेल्या मंगळवारी मुरमाडी-सावरी येथे आठवडी बाजाराप्रमाणे दुकाने लावण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडवरही दुकाने लावण्यात आली होती. सायंकाळी खरेदीसाठी येणाऱ्यांचीही संख्या वाढल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. त्यावरून ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. त्यामुळे मुरमाडी ग्रामपंचायतीने सोमवारी गावात दवंडी देऊन गावाच्या परिसरात कोणतेही दुकान लावता येणार नाही असे जाहीर केले. त्यामुळे दुकानदार व व्यावसायिकांनी दुकान लावण्यासाठी परवानगी लागत असलेल्या लाखनी नगर पंचायतीकडे धाव घेतली. परंतु, गेल्या आठवड्यात झालेल्या गोंधळाचा अनुभव पाहता नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी मंगळवारी दुकाने लावू देण्यास नकार दिला. त्यामुळे आज बाजारात दुकाने लागणार किंवा नाही? असा प्रश्‍न निर्माण झाला होता. शेवटी तहसीलदारांनी दवाखाने व औषधी दुकानांशिवाय अन्य सर्व दुकाने मंगळवारी बंद ठेवण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आज, लाखनीत कडकडीत बंद आहे.

सविस्तर वाचा - नागपुरात तीन गर्भवती  महिलांना कोरोनाने ग्रासले
सवलतीचा गैरफायदाच
प्रशासन नागरिकांना जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा व्हावा यासाठी वेगवेगळी दुकाने सुरू करण्यास परवानगी देत आहे. परंतु, कोरोना संक्रमणाच्या काळात बाहेर येणारे सगळेच सोशल डिस्टन्सिंग विसरून जातात. आवश्‍यक खरेदीसाठी लहान मुलांना सोबत आणले जाते. ओळखीच्या व्यक्तीसोबत रस्त्यातच गप्पा मारल्या जातात. या सगळ्यातून आपण सवलतींचा गैरफायदाच घेतो, हेच दिसून येते.

.......................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com