वाहन जाळणारा विद्यार्थी होणार "रेस्टिकेट'? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मुलींच्या वसतीगृह क्रमांक दोनमध्ये विद्यार्थिनींच्या गाड्या पेटवून देणाऱ्या तरुणाची ओळख पटली आहे. हा तरुण विक्षिप्त असून, मेडिकलचाच विद्यार्थी असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी सत्यशोधन समितीचा अहवाल येताच वाहन जाळणाऱ्या विद्यार्थ्यावर निष्कासनाची कारवाई केली जाणार आहे. हाच विद्यार्थी सायको किलर असल्याची जोरदार चर्चा येथे आहे. 

नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मुलींच्या वसतीगृह क्रमांक दोनमध्ये विद्यार्थिनींच्या गाड्या पेटवून देणाऱ्या तरुणाची ओळख पटली आहे. हा तरुण विक्षिप्त असून, मेडिकलचाच विद्यार्थी असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी सत्यशोधन समितीचा अहवाल येताच वाहन जाळणाऱ्या विद्यार्थ्यावर निष्कासनाची कारवाई केली जाणार आहे. हाच विद्यार्थी सायको किलर असल्याची जोरदार चर्चा येथे आहे. 

मेडिकलच्या चतुर्थ वर्षात शिकणारा हा विद्यार्थी असून, तो मूळचा पंजाबचा आहे. घटना घडलेल्या दिवसापासून तो पंजाबला पसार झाला आहे. वसतिगृहात सीसीटीव्हीत कैद झालेल्या फुटेजचा आधार घेत अजनी पोलिसांनी मेडिकल अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांच्या परवानगीने तो राहत असलेल्या वसतिगृहातील खोलीची झडती घेतली. खोलीत कुठल्याही प्रकारचे आक्षेप असतील, असे साहित्य आढळले नाही. मात्र, या विद्यार्थ्याने काही दिवसांपूर्वी ऍसिड खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती पोलिसांनीच्या चौकशीतून पुढे आली. त्याची मनस्थिती ठीक नसल्याच्या निष्कर्ष पोलिस आणि मेडिकलमधील चौकशी अधिकाऱ्यांनी काढला आहे. गेल्या शुक्रवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास मेडिकलमधील होस्टेल क्रमांक दोनच्या मैदानात ठेवलेल्या पाच दुचाकी या तरुणाने पेटवून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यातील दोनच दुचाकींनी पेट घेतला. तोवर विद्यार्थिनींनी आरडाओरड केल्याने तो तेथून पळाला. याच रात्री या तरुणाने मेडिकलमधील प्रयोगशाळेच्या खिडकीच्या काचा फोडल्या असल्याची माहिती चौकशीतून पुढे आली. सुदैवाने मेडिकलच्या वसतिगृहात सीसीटीव्ही लावण्यात आल्याने तो विद्यार्थी टीव्हीत दिसत आहे. त्या आधारे पोलिसांनी मेडिकलमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे बयाण नोंदवून घेतले. शिवाय मेडिकलमधील विद्यार्थ्यांचे रेकॉर्डही तपासले. यात गाड्या जाळणारा तरुण आणि मेडिकलमधील एका विद्यार्थ्याचा चेहरा जुळला आहे. त्यामुळे पोलिस आता त्या विक्षिप्त तरुणाचा शोध घेत आहेत. 

या विद्यार्थ्याचे मानसिक संतुलन ढासळले आहे. काही दिवसांपासून तो प्राध्यापकांशीही विचित्र वा गत होता. या प्रकरणी शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. आनंद फुलपाटील यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन चौकशी समिती नेमली होती. तीन सदस्यांच्या समितीकडून अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतरच निष्कासनाचा प्रस्ताव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे सादर केला जाईल. ते कारवाई करतील. 
- डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल. 

Web Title: The vehicle burner students will send down