सावधान! मरू नदीपुलावरील "स्पॉट व्हेरी डेंजर' भाउ !

अपघातास निमंत्रण देणारी ही झाडे तातडीने कापून दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे
अपघातास निमंत्रण देणारी ही झाडे तातडीने कापून दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे

भिवापूर (जि.नागपूर) ः झाडे कसा काय माणसाचा जीव घेतात हो? असा प्रश्‍न सहज कुणाच्याही मनात निर्माण होतो. परंतु मरू नदीपुलावरील वळण रस्त्याच्या कडेला वाढलेली "डेंजर' झाडेझुडपीच थेट माणसांचा जीव घेतात म्हटलं तर नवल वाटायला नको. भिवापूरच्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना पुलावरून येणारी वाहने दाट झाडांमुळे सहसा नजरेस पडत नाहीत. त्यामुळे या वळणावर अनेकदा अपघातांच्या गंभीर घटना घडून अनेकांना जीव गमवावा लागला. काहींच्या नशिबी कायमचे अपंगत्व आले आहे.मरू नदीच्या पुलावरील मरण्यासाठी इतका "डेंजर स्पॉट' असल्यावर भिती कुणाला वाटणार नाही, बरं !

वाहनचालकांसाठी धोक्‍याचे वळण
अपघातास निमंत्रण देणारी ही झाडे तातडीने कापून दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. गडचिरोलीकडे जाणाऱ्या महामार्गावर येथून दोन किलोमीटर अंतरावरून वाहणाऱ्या मरू नदीवर पूल आहे. हा पूल ओलांडताच महामार्गाच्या डाव्या बाजूला मोठे वळण आहे. हे वळण मागील काही वर्षांपासून वाहनचालकांसाठी धोक्‍याचे ठरत आहे. या वळणावर रस्त्याच्या कडेला मोठमोठी झाडे दाटीवाटीने उभी आहेत. झाडांच्या आजूबाजूला झुडपेसुद्धा वाढली आहेत. यामुळे दोन्ही बाजूंनी जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांच्या चालकांना समोरून येणारे वाहन सहसा दिसत नाही. त्यातूनच मग अपघाताच्या घटना घडतात.

अनेक घटनांची साक्ष
विशेष म्हणजे निलजकडून भिवापूरच्या दिशेने येणाऱ्या वाहनांकरिता वळणावरील झाडे यापूर्वी अनेकदा काळ ठरली आहेत. वळणावर पोहचल्याशिवाय पूल दिसून येत नाही. नियमित ये-जा करणाऱ्यांना याचा तेवढा त्रास नाही, परंतु नवीन वाहनचालकांना हे वळण धोक्‍याचे ठरते.दुचाकीचालक वाहनासहित नदीपात्रात पडल्याच्या तर कधी दुचाकी पुलाच्या सुरक्षा कठड्याला धडकल्याच्या अनेक गंभीर घटना या ठिकाणी घडल्या आहेत. चारचाकी व मोठ्या वाहनांच्या अपघातांच्या पण बऱ्याच घटना या वळणावर घडलेल्या असून या घटनांत अनेकांना प्राणास मुकावे लागले.

तुटलेले सुरक्षा कठडे देतात अपघातास निमंत्रण
भिवापूर-उमरेड मार्गावर रानमांगली व गोंडबोरी फाट्यादरम्यान तसेच मानोरा फाट्याजवळील नाल्यावर असलेल्या पुलांचे सुरक्षा कठडे पूर्णतः तुटलेले आहेत. त्यामुळे दोन्ही ठिकाणी अपघातांच्या गंभीर घटना यापूर्वी अनेकदा घडलेल्या आहेत. कित्येक महिने लोटूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या कठड्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही. दोन्ही ठिकाणचे पूल हे वळणावर असल्याने या ठिकाणी भविष्यात मोठे अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अपघातास निमंत्रण देणाऱ्या स्थळांची पाहणी करून भविष्यात अपघात होणार नाहीत या दिशेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com