शिकाऱ्याच्या गोळीने घेतला शेतकऱ्याचा बळी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

आर्वी (जि. वर्धा) : तालुक्‍यातील परसोडा शिवारात अनोळखी व्यक्तीने रानडुकराची शिकार करण्याकरिता बंदुकीतून झाडलेली गोळी लागल्याने शेतात जाणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही संतापजनक घटना शनिवारी (ता. आठ) दुपारी चार सुमारास घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, शोकसंतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

गोवर्धन महादेव डोबले (वय 45) रा. परतोडा असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे परसोडा शिवारात चार एकर शेती आहे. जोपर्यंत मारेकऱ्याला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह घटनास्थळावरून हलविण्यात येणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. तपास करून आरोपीला अटक करण्यात येईल, असे आश्‍वासन तळेगाव पोलिसांनी दिले. यानंतर जमाव शांत झाला.
प्राप्त माहितीनुसार, शेतकरी गोवर्धन डोबले हे सायकलने परसोडा शिवारातील आपल्या शेतात जात होते. दरम्यान, रानडुकराची शिकार करण्याकरिता अनोळखी व्यक्तीने गोळी झाडली. ही गोळी थेट गोवर्धन डोबले यांना लागली. घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. गोळीचा आवाज ऐकून ग्रामस्थ व परिसरातील शेतकरी घटनास्थळाकडे धावत आले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनंजय चौबे हेही तिथे पोचले. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह आर्वी उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरिता पाठविला.
तळेगाव येथील एका समुदायाचे तीन व्यक्ती शिकारीसाठी आले होते. त्यांनीच गोळी झाडली व घटनास्थळावरून पळून गेले, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. शेतकरी गोवर्धन डोबले यांच्या पश्‍चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांची शिकार होत आहे. अशा प्रकरणांकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

Web Title: The victim of a shooter shot a victim