क्षुल्‍लक चुकांमुळे निष्पापांचे बळी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

गेल्या काही दिवसांमध्ये कुलरचा शॉक लागून अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत. फाजील आत्मविश्वास आणि अगदीच किरकोळ चुकांमुळे हे अपघात घडत आहेत. कूलर हाताळताना सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

नागपूर - उकाड्यापासून दिलासा देण्यासाठी लावलेले कूलर यमदूत ठरले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये कुलरचा शॉक लागून अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत. फाजील आत्मविश्वास आणि अगदीच किरकोळ चुकांमुळे हे अपघात घडत आहेत. कूलर हाताळताना सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

सूर्य कोपल्याने विदर्भात कूलरचा वापरही वाढला आहे. कूलर किंवा टुल्लूपंप हाताळताना शॉक लागून मृत्यू ओढवण्याच्या घटना सातत्याने पुढे येत आहेत. गत दीड महिन्यात कुलरचा शॉक लागून अनेकांनी जीव गमावला. यात तरुणांची संख्या अधिक आहे. मृतांमध्ये एक चिमुकलीचाही समावेश आहे. रामटेकची १३ महिन्यांची प्रियांशी सावरकर अंगणात खेळत असताना कुलरचा शॉक लागून मृत्यू झाला. शिवाय सावनेर तालुक्‍यात ३५ वर्षीय सविता बाळबुधे या महिलेला कुलर सुरू करताना शॉक लागला. धामणगाव येथील २८ वर्षीय उज्ज्वल व्यवहारे या युवकाला चालू कुलरमध्ये पाणी भरताना शॉक लागला, तर चांदूररेल्वे तालुक्‍यातील धनोडी येथील ३५ वर्षीय प्रीती नखाते या महिलेचा कुलरचा स्पर्श होताच शॉक लागला. 

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील १५ वर्षीय विवेक पवार या मुलालासुद्धा कुलरमध्ये पाणी टाकताना शॉक लागला. नागपूरच्या बडकस चौकातील ऋषिकेश आमले या १८ वर्षीय युवकाचाही कुलरमध्ये पाणी भरतेवेळी मृत्यू झाला. बुलकशाह अंजुम मो. अजह परवीन या ३० वर्षीय महिलेचा  घरातील फरशी पुसताना कुलरला स्पर्श होताच शॉक लागला. वर्धा येथील २१ वर्षीय अंकित तुळणकर ताटी ओली झाली नाही ते पाहताना शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. या शिवायही कुलरमुळे अनेक प्राणांकित अपघात झाले आहेत.

ही काळजी घ्या
कुलरमुळे होणारे वीज अपघात टाळण्यासाठी सदैव थ्रीपीन प्लगचा वापर करावा. अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर्स बसवून घ्यावे, अर्थिंग योग्य असल्याची तपासणी करून घ्यावी, कुलरचा थेट जमिनीसोबत संपर्क येईल, अशी व्यवस्था करावी. कुलरमध्ये पाणी भरतेवेळी आधी कुलरचा  वीज प्रवाह बंद करून प्लग काढावा, कुलरच्या आतील वीजतार पाण्यात बुडली नसल्याची खात्री करावी, कुलरमधील पाणी खाली जमिनीवर सांडणार नाही याची काळजी घ्यावी, ओल्या हाताने कुलरला स्पर्श करू नये, कुलरची वायर सदैव तपासून बघावी. फायबरचा बाह्यभाग असलेल्या व चांगल्या प्रतीचा कुलर वापरावा.

Web Title: Victims due to trivial mistakes