चंद्रपूर जिल्ह्यात "वारां'चा विजय 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी विजय प्राप्त केला. बल्लारपूर मतदारासंघातून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार विजयी झाले. ब्रह्मपुरी मतदारसंघातून कॉंग्रेसचे विजय वडेट्टीवार विजयी झाले.

चंद्रपूर  : जिल्ह्यात सहा मतदारसंघ आहे. या सहा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघांवर "वारां'नी विजय मिळविला. बल्लारपूर मतदारसंघातून राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विजय मिळविला. ब्रह्मपुरीतून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, तर चंद्रपुरात अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या गळ्यात मतदारांनी विजयाची माळ टाकली. 
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी 70 ते 75 हजार मतांनी विजय प्राप्त केला. त्यांच्या विजयाने भाजपला मोठा फटका बसला आहे. सुरवातीला किशोर जोरगेवार भाजपात होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाकडे तिकीट मागितले. मात्र, पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी सेनेच्या माध्यमातून निवडणूक लढविली. तेव्हा दुसऱ्या क्रमांकाची 51 हजार मते त्यांना मिळाली होती. आताच्या निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. मात्र, कॉंग्रेसनेही त्यांना नाकारले. त्यामुळे अपक्ष म्हणून ते रिंगणात होते. मतदारांचा त्यांना चांगलाच पाठिंबा मिळाला. याच आधारावर त्यांनी भाजपच्या गडाला खिंडार पाडले. या निवडणुकीत भाजपचे नाना श्‍यामकुळे यांचा दारुण पराभव झाला. जिल्ह्यातील सर्वाधिक मते घेत त्यांनी विजय प्राप्त केला. बल्लारपूर मतदारासंघातून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार विजयी झाले. वनमंत्र्यांचा सलग तिसऱ्यांदा या मतदारसंघातून विजय झाला. त्यांनी कॉंग्रेसचे डॉ. विश्‍वास झाडे यांचा पराभव केला. मुनगंटीवार यांना 85 हजार 204 मते मिळाली. ब्रह्मपुरी मतदारसंघातून कॉंग्रेसचे विजय वडेट्टीवार विजयी झाले. त्यांचा हा मतदारसंघातून दुसरा विजय आहे. त्यांना 96 हजार 235 मते मिळाली. त्यांनी भाजप-शिवसेना युतीचे गड्डमवार यांचा पराभव केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Victory of "Wars" in Chandrapur District