शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आद्य प्रकाशक

सकाळ वृत्तसेवा
01.01 AM

कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला, अभिनेता नितीश भारद्वाज, डॉ. राजन वेळूकर, रायसोनी समूहाचे संचालक सुनील रायसोनी आणि शुभा रायसोनी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी "गांधी ऍट 150' पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज विद्येचे उपासक होते. त्यांच्या काळात पाच पुस्तके प्रकाशित झाली असल्याचे पुरावे असल्याने मी शिवाजी महाराजांना आद्य प्रकाशक समजतो. त्यानंतरच्या काळात कोणीही शिवराज्यावर पुस्तके प्रकाशित केली नाही. 1905 साली आग्य्राहून सुटका पुस्तक प्रकाशित झाले. आज केवळ मराठीत संपूर्ण शिवचरित्र प्रकाशित झाले असून, आता हिंदीत अन्‌ इंग्रजीत अपेक्षित असल्याचे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्‍त केले.

रायसोनी समूहातर्फे चिटणवीस सेंटर येथे बुधवारपासून (ता. 4) आयोजित ऑरेंज सिटी लिटरेचर फेस्टिव्हलच्या उद्‌घाटन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला, अभिनेता नितीश भारद्वाज, डॉ. राजन वेळूकर, रायसोनी समूहाचे संचालक सुनील रायसोनी आणि शुभा रायसोनी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी "गांधी ऍट 150' पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

बाबासाहेब म्हणाले, जे विद्येला छंद म्हणून जोपासतात ते नेहमीच समृद्ध असतात. शहाजी राजांच्या दरबारात 23 भाषांचे जाणकार होते. ते विविध भाषांतील ज्ञानाचा पुरवठा शहाजींना करीत होते. हा उदात्त इतिहास कायम उपेक्षित राहिला. हा सारा इतिहास शिवसाहित्यात यायला हवा. साहित्य व्यवहारात प्रकाशकांचा व्यवसाय मंदावला असल्याचे बाबासाहेब याप्रसंगी म्हणाले.

सोशल मीडियाचा योग्य वापर करा

अभिनेता नितीश भारद्वाज म्हणाले, हल्ली प्रत्येकजण मोबाईलमध्ये व्यस्त आहे. सोशल मीडियावर मत प्रदर्शन केले नाही तर आपण काळाच्या मागे जगतो असे लोकांना वाटते. सोशल मीडियावर पोस्ट फॉरवर्ड करण्याला लोक प्राथमिकता देतात. पण, आपण उत्तरे देत सामाजिक सद्‌भावना धोक्‍यात आणत असतो. तंत्रज्ञान चांगले असले तरी त्याचा योग्य उपयोग करा आणि वाचन करा. अभ्यास करा. त्यातूनच आपण समृद्ध होऊ. मी कृष्णाची भूमिका केली ती गाजली. कारण माझ्या घरात पुस्तके होती आणि महाभारताचा मी अभ्यास केला. मृत्युंजय, ना. सी. फडके, इरावती कर्वे, दुर्गाबाई भागवत मी वाचले आहे. त्यामुळे माझ्यावर एक संस्कार झाला भारद्वाज म्हणाले.

वर्तमानपत्रांनी पत्रकारिता जागवली

हल्ली इलेक्‍ट्रॉनिक माध्यमे दाखवित असलेल्या बातमीची गुणवत्ता नाहीशी झाली आहे. तेथे केवळ तथ्यहीन चर्चा, आरडाओरडा दिसतो. ही माध्यमे स्वतःची जबाबदारी विसरली असून, वर्तमानपत्रांचे वाचक कमी असले तरी वर्तमानपत्रांनीच खऱ्या अर्थाने पत्रकारिता जागवली असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला यांनी व्यक्त केले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidarbh nagpur babasaheb purandare on shivaji maharaj