आद्यग्रंथ लीळाचरित्रात संपूर्ण जीवनमूल्यांचा सार 

vidarbh nagpur mahanubhav leedacharite life value
vidarbh nagpur mahanubhav leedacharite life value


नागपूर ः आद्यग्रंथ लीळाचरित्राने मराठी मनाला समृद्ध केले आहे. आनंद, समाधान, शांत सुंदर जीवन जगण्याचा मार्ग या ग्रंथाने दाखविला आहे. ज्ञानेश्‍वरांच्या ज्ञानेश्‍वरीनंतर आदर्श समजावा असा हा लीळाचरित्र ग्रंथ असून, यात संपूर्ण जीवनमूल्यांचा सार दडलेला आहे, असे गौरवोद्गार आद्यग्रंथ लीळाचरित्र गौरव सोहळा आणि पंडित म्हाइंभट संकलित लीळाचरित्र ग्रंथ प्रकाशनात उपस्थित मान्यवरांनी ग्रंथाबाबत काढले. 

अखिल भारतीय महानुभाव महामंडळातर्फे आज रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात प्रकाशन समारंभ थाटात पार पडला. दैनिक सकाळ कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते. विचारपीठावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. नेहरू उमराणी, मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुळकर्णी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या उपाध्यक्ष डॉ. विद्या देवधर, ज्येष्ठ अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड, इन्क्‍युबेशन इनोव्हेशनच्या संचालक डॉ. अपूर्वा पालकर, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथील ऍडव्होकेट ऑन रेकॉर्डच्या डॉ. मोनिका गुसैन, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मधुकर रा. जोशी, मुंबई विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. पद्मा देशमुख, विधानसभा सदस्य विकास ठाकरे, मनपा सभापती प्रकाश भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

प्रास्ताविक बोधीराज दादा यांनी केले. दुपारी शहरातील जुनी मंगळवारी ते कविवर्य सुरेश भट सभागृहापर्यंत ग्रंथ पालखी काढण्यात आली. सभागृहात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उल्हासपूर्ण वातावरणात ग्रंथाचे प्रकाशन पार पडले. श्‍वेता शेलगावकर यांनी सूत्रसंचालन केले. महामंडळाचे महासचिव प्रा. उमेश आकरे यांनी आभार मानले. ग्रंथाचे संपादक आचार्य प्रवार श्रीनरेंद्रमुनीबाबा अंकुळनेरकर यांनी समारोपीय मनोगत व्यक्त केले. 

वाङ्‌मयाचा मौलिक ठेवा ः म. रा. जोशी 

लीळाचरित्र ग्रंथ हा वाङ्‌मय आणि भाषेच्या दृष्टीने मौलिक ठेवा असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक म. रा. जोशी यांनी व्यक्त केले. महानुभावांचा विचार विद्यापीठ स्तरावर पोहोचविण्याचे कार्य हा ग्रंथ करणार असून, महानुभाव साहित्य स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. विद्यापीठाने पदवीच्या विद्यार्थ्यांना लीळाचरित्र या आद्यग्रंथावर एक स्वतंत्र पेपर ठेवावा. सांप्रदायिकांनी भारतीय जीवनमूल्यांचे रक्षण केले आहे. या मूल्यांशी आपण संवाद साधतो का हा विचार प्रत्येकाने करावा. आपल्या ग्रंथाचे परंपरेने शास्त्रशुद्ध विवेचन करणे सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. 

जात जन्माने नव्हे जगण्याने ठरते ः वाड 

जगात ज्ञानासारखे पवित्र दुसरे काही नाही म्हणूनच माणसाची जात जन्माने नव्हे तर, जगण्याने ठरत असल्याचे विचार अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी मांडले. अन्नाचा प्रश्‍न सोडविताना जगण्याची पद्धत स्तंभ, शांत ठेवता येत नाही. मानवतेचा धर्म पाळताना आपण उणे पडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. चांगल्या कामाची प्रचीती परमेश्‍वरात येत असल्याची शिकवण महानुभाव पंथ शिकवत असल्याचे डॉ. वाड म्हणाल्या. 

लीळाचरित्र महाराष्ट्राचे मोठे वैभव ः डॉ. उमराणी 

लीळाचरित्र सांस्कृतिक महाराष्ट्रासाठी मोठी देणगी असून, ग्रंथाने मराठी मनाला समृद्ध केले. समता, बंधुता, मानवतेचा मार्ग दाखविण्याचे कार्य लीळाचरित्राने केल्याचे मत पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. नेहरू उमराणी यांनी व्यक्त केले. मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुळकर्णी म्हणाले की, लीळाचरित्र आद्यग्रंथ मराठीत असणे महत्त्वाचे आहे. मराठी भाषेत अल्पाक्षरी प्रतिमासृष्टी असल्याने, या ग्रंथामुळे निश्‍चितच भाषेची प्रतिभा वाढेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com