महिलांनो रात्र झाली...वाहन नसले तर पोलिसांना फोन करा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

रात्री नऊनंतर कोणत्याही मुलीला किंवा महिलेला घरी जाण्यास वाहन उपलब्ध नसल्यास त्यांनी पोलिसांना फोन करावा. पोलिस खुद्द शासकीय वाहनातून तिला घरी सोडून देतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

नागपूर ः हैदराबादमधील डॉ. प्रियांका रेड्डी बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणासारख्या निंदनीय घटनेपासून वाचण्यासाठी पोलिसांनी एक पाऊल पुढे असणे गरजेचे आहे. हीच बाब हेरून पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी एकट्या मुली आणि महिलांसाठी स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. रात्री नऊनंतर कोणत्याही मुलीला किंवा महिलेला घरी जाण्यास वाहन उपलब्ध नसल्यास त्यांनी पोलिसांना फोन करावा. पोलिस खुद्द शासकीय वाहनातून तिला घरी सोडून देतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

 मदतीला नागपूर पोलिस धावून येणार

हैदराबाद येथील महिला पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका रेड्डी यांची बलात्कार करून हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. देशभरातून गुन्हेगारांना फाशीच्या शिक्षेची मागणी केली जात आहे. नागपुरात भविष्यात अशाप्रकारची कोणती घटना घडू नये म्हणून नागपूर पोलिसांनी कंबर कसली आहे. रात्री नऊनंतर रस्त्यावर एकटी असलेल्या महिला, मुलींच्या मदतीला नागपूर पोलिस धावून येणार आहेत.

 टेलिफोन क्रमांकावर संपर्क करा
 
महिलांना जवळच्या पोलिस ठाण्याच्या टेलिफोन क्रमांकावर संपर्क करून अडचण सांगावी लागणार आहे. काही मिनिटात पोलिस व्हॅन तुमच्या मदतीला धावून येणार आहे. यासाठी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पुढाकार घेऊन शहरातील सर्व पोलिस ठाण्यांना निर्देश दिले आहेत. रात्रीच्या वेळी गाडी पंक्‍चर झाल्यास, सिटी बस मिळाली नाही, ऑटोने घरी जाणे सुरक्षित वाटले नाही किंवा असुरक्षित वाटू लागल्यास पोलिस ठाण्याला फोन करा.

अायुक्त, मनपा यांचे संबंध

आपण उभे असलेले ठिकाण, अडचण आणि कुठे जायचे आहे हे सांगितल्यास त्यावेळी कर्तव्यावर असलेले पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी याची दखल घेतील.
पोलिस ठाण्याच्या उपलब्ध वाहनात महिला कर्मचारी नेमून सांगितलेल्या पत्त्यावर सोडून देण्याचे काम करतील. या प्रकारचे निर्देश पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी 2 डिसेंबर रोजी बिनतारी संदेशद्वारे शहरातील सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidarbh nagpur reddy ladies police