सावनेर महामार्गावर "ट्रॉमा सेंटर' ; ग्रामीण रुग्णालयाचे आधुनिकीकरण

vidarbh nagpur trama center in sawner
vidarbh nagpur trama center in sawner

नागपूर ः महामार्गावर अपघात झाल्यानंतर जखमी झालेल्यांचे प्राण वाचविण्यास मदत होणारे ट्रॉमा सेंटर विकसित करण्याचा अजेंडा शासनाचा आहे. मात्र, अनेक महामार्गांवर अपघातानंतर शंभर किलोमीटरपर्यंत उपचाराची सोय नाही. ही बाब लक्षात घेत प्रत्येक महामार्गावर ट्रॉमा सेंटर उभारण्याची संकल्पना पुढे आली. यातूनच सावनेर महामार्गावर ट्रॉमा सेंटर उभारण्यात येणार आहे. याशिवाय येथील ग्रामीण भागाशी जोडलेले ग्रामीण रुग्णालय विकसित करण्याचा अजेंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे ठरविण्यात आला.

अपघातांमध्ये दरवर्षी शेकडो जण उपचार उशिराने मिळाल्याने दगावतात. उपचाराअभावी होणाऱ्या या मृत्यूंना कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने खेड्यापाड्यांमध्ये ट्रॉमा केअर सेंटरचे जाळे उभारण्याचा निर्णय घेतला होता. सावनेर मार्गावरील ग्रामीण रुग्णालय हे मेडिकलच्या अखत्यारीत आहे. यामुळे या महामार्गावर ट्रॉमा विकसित करण्याची जबाबदारी मेडिकलने स्वीकारली आहे. विशेष असे की, यासंदर्भात शासनाकडून मेडिकल प्रशासनाला तसे पत्र प्राप्त झाले आहे. रस्ते अपघातातील जखमींवर पहिल्या तासात योग्य उपचार मिळाल्यास त्यांचा जीव वाचू शकतो, हे लक्षात घेऊन राज्यातील मुख्य द्रुतगती महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. काही ठिकाणी काम सुरू आहे.

50 खाटांचे रुग्णालय होणार

या मतदारसंघाचे आमदार सुनील केदार यांच्या पुढाकारातून सावनेर ग्रामीण रुग्णालयाला अत्याधुनिक रूप देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. सध्या येथे खाटांची संख्या 20 आहे. ती वाढवून 50वर नेण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

13 हजार 560 जण अपघातात दगावले

राज्यात वर्षाकाठी सुमारे 30 हजार अपघात होतात. 2018 या वर्षात महामार्ग तसेच रस्ते अपघातामध्ये जखमी झाल्यानंतर 13 हजार 560 जणांचा मृत्यू झाला. यामुळे महामार्गावर ट्रॉमा सेंटरची गरज आहे. या सावनेर महामार्गावरील ट्रॉमा सेंटरसाठी हॉटलाइन क्रमांकाची सोय असण्याचे संकेत आहेत. येथे छोटे शस्त्रक्रियागृह, तज्ज्ञ डॉक्‍टर, कार्डिअक रुग्णवाहिका आदी व्यवस्था करण्यात येणार आहे.


महामार्गावर अपघात झाल्यास तत्काळ उपचार मिळावे. 50 ते 60 किलोमीटर अंतरावरील लेवल थ्री पातळीवरील "ट्रॉमा केअर युनिट' उभारण्याची संकल्पना आहे. अपघातानंतर उपचारादरम्यान रुग्ण स्थिर झाल्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करता येईल. मूळ हेतू एकच रुग्णाचा जीव वाचवणे.
-डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, मेडिकल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com