कर्नाटकच्या चित्ररथाला विदर्भातील मूर्तिकारांचे हात

केतन पळसकर
Saturday, 25 January 2020

नागपूर : कवी ग्रेस, वऱ्हाडी कवी विठ्ठल वाघ, आद्य शायर म्हणून ख्याती असलेले भाऊसाहेब पाटणकर यांच्यासह अलीकडच्या काळातील विनोदी अभिनेता भारत गणेशपुरे आदी विदर्भाचे नाव कलाक्षेत्रात उंचावत आहेत. तर, येणारी पिढीसुद्धा त्यांच्या पावलांवर पावले टाकीत हाच वारसा पुढे नेत आहे. दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या पथ संचलनात कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करणारा चित्ररथ साकारण्यात विदर्भातील मूर्तिकारांचे हात आहेत, हे त्याचेच एक उदाहरण.

नागपूर : कवी ग्रेस, वऱ्हाडी कवी विठ्ठल वाघ, आद्य शायर म्हणून ख्याती असलेले भाऊसाहेब पाटणकर यांच्यासह अलीकडच्या काळातील विनोदी अभिनेता भारत गणेशपुरे आदी विदर्भाचे नाव कलाक्षेत्रात उंचावत आहेत. तर, येणारी पिढीसुद्धा त्यांच्या पावलांवर पावले टाकीत हाच वारसा पुढे नेत आहे. दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या पथ संचलनात कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करणारा चित्ररथ साकारण्यात विदर्भातील मूर्तिकारांचे हात आहेत, हे त्याचेच एक उदाहरण.

कर्नाटकमधील संत बसवेश्‍वर यांच्याद्वारे स्थापित "अनुभव केंद्र' ही चित्ररथाची संकल्पना आहे. हा चित्ररथ घडविण्यात यवतमाळ जिल्ह्यातील यशवंत एनगुर्तीवार (पाटणबोरी, ता. केळापूर), प्रसन्न गोगीलवार, प्रवीण पिल्लारे (ता. दारव्हा) यांच्यासह अमरावतीच्या शिवा प्रजापती या मूर्तिकारांचा समावेश आहे. 2014 साली "पंढरपूरची वारी' आणि 2017 साली लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ साकारताना यशवंत आणि प्रसन्न यांनी उत्कृष्ट काम केले होते. यात 2014 साली महाराष्ट्राने प्रथम क्रमांक आणि 2017 साली तृतीय क्रमांक प्राप्त केला. तलाशसारख्या गाजलेल्या चित्रपटात कला दिग्दर्शक म्हणून कामगिरी बजावणारे कला दिग्दर्शक शशीधर अडपा यांच्या मार्गदर्शनात कर्नाटकच्या चित्ररथाचे काम साध्य केले आहे.

Image may contain: 6 people, people standing
नागपूर : कला दिग्दर्शक शशीधर अडपा यांच्यासह चित्ररथ साकारणारे विदर्भातील कलावंत.

 

विदर्भातील कलावंतांचे कौतुक
मूळचे कर्नाटक येथील अडपा यांनी आजवर बारा वेळा कर्नाटकचा चित्ररथ साकारताना कला दिग्दर्शक म्हणून जबाबदारी पार पाडली. यंदाच्या चित्ररथामध्ये संत बसवेश्‍वर यांनी कर्नाटकमधील बिदर जिल्ह्यामध्ये बाराव्या शतकामध्ये स्थापन केलेल्या अनुभव केंद्राला (लोकशाही संसद) प्रतिबिंबित केले. चित्ररथाच्या दर्शनी भागात संत बसवेश्‍वरांची 11 फुटांची लोभस मूर्ती लक्ष केंद्रित करणारी आहे. अनुभव केंद्रातील अक्का नागम्मा, शरणे सत्यक्का, अंबिगर चोडय्या, मोलिंगे मारय्या, कल्याण्म्मा हरळय्या, गुंडण्णा कुंभार, सिद्धरामेश्‍वर आदींचे प्रतीक या चित्ररथामध्ये साकारण्यात आले आहेत.

- हाटे फिरायला गेले अन्‌ पाहतात तर काय मुलगा होता रक्‍ताच्या थारोळ्यात

चार दिवसांच्या प्रवासानंतर चित्ररथ दिल्लीत
या चित्ररथाची निर्मिती विदर्भातील कलावंतांनी बंगरूळ येथे केली. बंगरूळ येथून ट्रकद्वारे या नाजूक मूर्तींना दिल्लीत होणाऱ्या सोहळ्यासाठी नेण्यात आले. बंगरूळ ते दिल्ली हे सुमारे दोन हजार किलोमीटरपेक्षा जास्त असणारे अंतर कापण्यासाठी चार दिवसांचा अवधी लागला. दिल्ली येथे पोहोचताच चित्ररथातील विविध दहापेक्षा जास्त असणाऱ्या मूर्तींना एकत्र करण्यात आले. गुरुवारी सर्व राज्यातील चित्ररथांची तालीम दिल्ली येथे झाली.

आत्मिक समाधान मिळाले
कर्नाटक महाराष्ट्राप्रमाणे विविध संस्कृतीने नटलेले राज्य आहे. शिल्प साकारताना शरणेसत्यका या साध्वीच्या जीवनचरित्र्याचे वाचन केले. कर्नाटकातील या संतांनी "जनसेवा हीच ईश्‍वर सेवा अन्‌ कर्म हेच कैलास' हा संदेश जगाला दिला. त्यांचे शिल्प साकारताना मला आत्मनिरीक्षण करण्याची संधी मिळाली. यामुळे मला आत्मीक समाधान मिळाले. शशिधर अडपा यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
- यशवंत एनगुर्तीवार, कलावंत,
माजी विद्यार्थी, सर जेजे स्कूल ऑफ आर्ट, मुंबई


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidarbha artist prepared Chitrarath of karnataka