विदर्भ मुलांचे पाऊल पडते पुढे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

अर्धशतकी खेळी करणारा यष्टीरक्षक पवन परनाते विदर्भाच्या विजयाचा शिलेदार ठरला. 

नागपूर : विदर्भाच्या मुलांनी विजयी धडाका कायम ठेवत म्हैसूर येथे सुरू असलेल्या 23 वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील सहाव्या साखळी सामन्यात मध्य प्रदेशचा सहा गड्यांनी सहज पराभव केला. या लागोपाठ सहाव्या विजयासह विदर्भाने बादफेरीतील स्थानही निश्‍चित केले आहे. अर्धशतकी खेळी करणारा यष्टीरक्षक पवन परनाते विदर्भाच्या विजयाचा शिलेदार ठरला. 

मध्य प्रदेशने विजयासाठी दिलेले 192 धावांचे माफक लक्ष्य फॉर्ममध्ये असलेल्या विदर्भाला फारसे कठीण गेले नाही. विदर्भाने अवघे चार गडी गमावून 39 व्या षट्‌कातच लक्ष्य गाठले. परनातेने 84 चेंडूंत 63 धावा फटकावल्या. मध्य प्रदेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत सर्वबाद 191 धावा केल्या. दुष्यंत टेकानने अवघ्या 20 धावांतच मध्य प्रदेशच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठविले. सुरवातीला बसलेल्या या धक्‍क्‍यातून मध्य प्रदेश संघ शेवटपर्यंत सावरला नाही.

मधल्या फळीतील यश दुबे (50 धावा), हर्ष गवळी (48 धावा) व अंकुश त्यागी (41 धावा) यांनी थोडाफार संघर्ष करून मध्य प्रदेशला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. सहा सामन्यांमध्ये 24 गुणांची कमाई करणाऱ्या विदर्भाचा सातवा साखळी सामना येत्या 17 नोव्हेंबरला तमिळनाडूविरुद्ध खेळला जाणार आहे. 

संक्षिप्त धावफलक 
मध्य प्रदेश : 20 षटकांत 44.2 षटकांत सर्वबाद 191 (यश दुबे 50, हर्ष गवळी 48, अंकुश त्यागी 41, प्रंकेश राय 22, दुष्यंत टेकान 2-27, सरोज राय 2-27, यश कदम 2-28, गौरव ढोबळे 2-29, अथर्व तायडे 1-22, मोहित राऊत 1-14). विदर्भ : 38.2 षटकांत 4 बाद 193 (पवन परनाते 63, सिद्धेश वाठ 35, मोहित काळे 35, यश कदम नाबाद 30, नयन चव्हाण नाबाद 14, सनपाल सोळंकी 1-17, प्रंकेश राय 1-51, अंकुश त्यागी 1-32, अतुल खुशवाह 1-37). 

विदर्भ-केरळ सामना आज 
त्रिवेंद्रम येथे सुरू असलेल्या सैयद मुश्‍ताक अली चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील विदर्भाचा पाचवा साखळी सामना उद्या, गुरुवारी केरळविरुद्ध खेळला जाणार आहे. फैज फजलच्या नेतृत्वात खेळत असलेल्या विदर्भाने पहिले चारही सामने जिंकून बादफेरीतील स्थान जवळजवळ निश्‍चित केलेले आहे. विदर्भाने सलामी लढतीत त्रिपुराचा नऊ गड्यांनी धुव्वा उडविल्यानंतर उत्तर प्रदेशवर पुन्हा नऊ गड्यांनी, मणिपूरचा 70 धावांनी आणि काल, मंगळवारी झालेल्या रोमांचक लढतीत राजस्थानला एका धावेने नमवून "ब' गटात 16 गुणांची कमाई केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidarbha boys in knock out