कुचबिहार करंडक : विदर्भाचे पोट्‌टे जिंकले रे ब्वॉ... 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

मुंबईने निर्णायक विजयासाठी विदर्भासमोर 236 धावांचे आव्हान ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना एकवेळ विदर्भाची 3 बाद 70 धावा अशी नाजूक स्थिती झाली होती. या आणीबाणीच्या प्रसंगी मंदार महालेने मधल्या फळीतील प्रेरित अग्रवाल व अन्य फलंदाजांच्या मदतीने किल्ला लढवून विदर्भाला दणदणीत विजय मिळवून दिला

नागपूर : विदर्भाच्या संघात कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता आहे, हे त्यांनी सोमवारी बलाढ्य मुंबईला त्यांच्याच मैदानावर पटकनी देऊन सिद्ध करून दाखविले. मुंबई येथील शरद पवार क्रिकेट अकादमीच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या 19 वर्षांखालील मुलांच्या कुचबिहार करंडक (एलिट "अ' गट) स्पर्धेतील साखळी सामन्यात विदर्भाने यजमान मुंबईचा पाच गड्यांनी धुव्वा उडवून मोसमातील पहिल्या विजयाची नोंद केली. 

मुंबईने निर्णायक विजयासाठी विदर्भासमोर 236 धावांचे आव्हान ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना एकवेळ विदर्भाची 3 बाद 70 धावा अशी नाजूक स्थिती झाली होती. या आणीबाणीच्या प्रसंगी मंदार महालेने मधल्या फळीतील प्रेरित अग्रवाल व अन्य फलंदाजांच्या मदतीने किल्ला लढवून विदर्भाला दणदणीत विजय मिळवून दिला. मंदारने 13 चौकारांसह 131 चेंडूंत नाबाद 93 धावा फटकावल्या. तर प्रेरितने 8 चौकारांसह 71 चेंडूंत नाबाद 48 धावांचे योगदान दिले.
 


मंदार महाले 

दोघांनी सहाव्या गड्यासाठी जोडलेल्या नाबाद 104 धावा सामन्यात निर्णायक ठरल्या. मुंबईचा कर्णधार वेदांत मुरकरने ही जोडी फोडण्यासाठी अथक परिश्रम केले. परंतु, दोघांनी सर्वच गोलंदाजांना धैर्याने तोंड देत मुंबईच्या आशेवर पाणी फेरले. मंदारने झारखंडविरुद्धच्या सलामी लढतीतही पहिल्या डावात 64 आणि दुसऱ्या डावात 23 धावांचे योगदान दिले होते. 

या विजयासह विदर्भाने पाच गुणांची कमाई करून दोन सामन्यांमध्ये आपली गुणसंख्या सातवर नेली आहे. विदर्भाचा तिसरा साखळी सामना येत्या सहा डिसेंबरपासून कर्नाटकविरुद्ध गृहमैदानावर खेळला जाणार आहे. विदर्भाला नागपुरात झारखंडविरुद्ध अनिर्णीत सुटलेल्या सलामी लढतीत केवळ एकाच गुणाची कमाई करता आली. 

Image may contain: 1 person, outdoor, closeup and nature
यू गनी

संक्षिप्त धावफलक : मुंबई पहिला डाव : 191. विदर्भ पहिला डाव : 141. मुंबई दुसरा डाव : 185. विदर्भ दुसरा डाव : 69.2 षट्‌कांत 5 बाद 236 (मंदार महाले नाबाद 93, प्रेरित अग्रवाल नाबाद 48, अमन मोखाडे 40, महंमद फैज 25, दानिश मालेवार 23, आकाश मिश्रा 2-49, दर्शन मंगुकिया 2-91, अमानुल्लाह मनिहार 1-24). 

शिष्यांच्या कामगिरीवर गुरूही खुश 
विदर्भाने मुंबई संघाला त्यांच्या मैदानावर पराभूत केल्याने संघप्रशिक्षक उस्मान गनीही खुश आहेत. मुंबईवरून "सकाळ'शी बोलताना गनी म्हणाले, हा विजय निश्‍चितच सांघिक प्रयत्नांचे फलित आहे. मध्यमगती गोलंदाजांना अनुकूल ठरलेल्या या खेळपट्‌टीवर चौथ्या डावात 230 धावांचे विजयी लक्ष्य गाठणे सोपी गोष्ट नव्हती. मात्र, विदर्भाच्या फलंदाजांनी ते सहजशक्‍य करून दाखविले.

ठळक बातमी - पाच व्यक्तींना जीवदान देऊन वेदांतने घेतला जगाचा निरोप

विजयात मंदारचे योगदान सर्वाधिक ठरले असले तरी, मनन दोशीची कामगिरीही तितकीच महत्त्वाची होती. मननने सहा बळी टिपून मुंबईला कमी धावांत रोखल्यानंतर मंदार, प्रेरित व अन्य फलंदाजांनी संयम, कौशल्य व मानसिक कणखरता दाखवून विजयी लक्ष्य गाठण्यात मदत केली. या विजयामुळे खेळाडूंचे मनोबल उंचावणार असून, त्याचा फायदा पुढील सामन्यांमध्ये संघाला "बूस्ट' मिळणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidarbha cricket team victory on mumbai