मुख्यालय नागपुरात, अध्यक्षपद पश्‍चिम विदर्भात

मनोज भिवगडे
मंगळवार, 12 जून 2018

अकोला  - महाराष्ट्राचा भाैगोलिक विस्तार बघता प्रादेशिक विकासाची घडी निट बसविण्यासाठी वैधानिक विकास मंडळांची स्थापना झाली. १ जानेवारी १९९४ मध्ये विदर्भ वैधानिक विकास मंडळ स्थापन झाल्यापासून मंडळाचे मुख्यालय नागपुरात आणि अध्यक्षपद मात्र अमरावती विभागाला मिळाले आहे. प्रा. राम मेघे यांच्या नियुक्तीपासून सुरू झालेली ही परंपरा आमदार चैनसुख संचेती यांच्या नियुक्तीने कायम राखल्या केली.

अकोला  - महाराष्ट्राचा भाैगोलिक विस्तार बघता प्रादेशिक विकासाची घडी निट बसविण्यासाठी वैधानिक विकास मंडळांची स्थापना झाली. १ जानेवारी १९९४ मध्ये विदर्भ वैधानिक विकास मंडळ स्थापन झाल्यापासून मंडळाचे मुख्यालय नागपुरात आणि अध्यक्षपद मात्र अमरावती विभागाला मिळाले आहे. प्रा. राम मेघे यांच्या नियुक्तीपासून सुरू झालेली ही परंपरा आमदार चैनसुख संचेती यांच्या नियुक्तीने कायम राखल्या केली.

पश्‍चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा आणि विदर्भ मागासलेला राहिला. त्यामुळे या भागाच्या विकासासाठी स्वतंत्र मंडळांची स्थापना करण्याची मागणी पुढे आली. त्यानुसार १९९४ मध्ये विदर्भ वैधानिक विकास मंडळाची स्थापना झाली. पहिले अध्यक्ष होण्याचा मान अमरावतीचे प्रा. राम मेघे यांना मिळाला. त्यांच्यानंतर शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात १९९५ मध्ये अमरावतीचेच भाजपचे नेते अरूणभाऊ अडसड यांना अध्यक्षपद मिळाले. युतीचे सरकार जाऊन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आल्‍यानंतर अमरावतीचेच हर्षवर्धन देशमुख यांच्याकडे १९९९ मध्ये अध्यक्षपद आले. त्यांच्यानंतर कुणाचीही नियुक्ती न झाल्याने २००४ मध्ये प्रशासक नियुक्त करण्यात आला. नागपूर विभागाचे तत्कालीन आयुक्त शैलेकुमार शर्मा यांच्याकडे प्रभार आला. त्यापाठोपाठ आनंद लिमये यांची नियुक्ती झाली. त्यांचा कार्यकाळ २००६ पर्यंत होता.

अध्यक्षपद बिडकरांच्या रुपाने अमरावती बाहेर
आघाडीच्या राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा. तुकाराम बिडकर यांच्याकडे अध्यक्षपद आले. त्यांच्या काळात अनेक सुधारणा वैधानिक विकास मंडळात झाल्यात. २०११ पर्यंत त्यांच्याकडे हे पद होते. बिडकर यांच्या रुपाने प्रथमच अमरावतीकडचे अध्यक्षपद अकोल्यात आले.

वाशीमकडे मंडळाचे नेतृत्व
बिडकर यांच्यानंतर कुणाचीही नियुक्ती झाली नाही. त्यामुळे २०११ ते २०१३ पर्यंत प्रवीण दराडे आणि बी.व्ही.गोपालरेड्डी या विभागीय आयुक्तांकडे अध्यक्षपद राहिले. २०१३ मध्ये विकास मंडळाचे नेतृत्व वाशीम जिल्ह्याला मिळाले. वाशीमचे प्रकाश डहाके यांना अध्यक्षपद मिळाले.

प्रथमच बुलडाण्याला अध्यक्षपद
मार्च २०१५ मध्ये विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्याकडे अध्यत्रपदाची सूत्रे आली. तेव्हापासून कुणाचीही नियुक्ती न झाल्याने अनुप कुमार यांच्याकडे हे पद कायम होते. सोमवार, ११ जून २०१८ रोजी बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूरचे भाजपचे ज्येष्ठ आमदार चैनसुख संचेती यांना विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष होण्याचा मान मिळाला.त्याच्या नियुक्तीने अध्यक्षपदी अमरावती विभागाकडे राहण्याची परंपराही कायम राखल्या गेली.

विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष
प्रा. राम मेघे - १९९४ ते १९९५
श्री अरूण अडसड - १९९५ ते १९९९
श्री हर्षवर्धन देशमुख - १९९९ ते २००४
डॉ. शैलेशमुकार शर्मा (भा.प्र.से.) - २००४ ते २००५
श्री आनंद लिमये (भा.प्र.से.)- २००५ ते २००६
श्री तुकाराम बिडकर - २००६ ते २०११
श्री प्रवीण दराडे (भा.प्र.से.) - २०११
श्री. बी.व्ही. गोपालरेड्डी (भा.प्र.से.) - २०११ ते २०१३
श्री प्रकाश डहाके - २०१३ ते २०१५
श्री अनुप कुमार - २०१५ ते २०१८
श्री चैनसुख संचेती - जून २०१८ पासून

Web Title: vidarbha development board