विदर्भातील शेतकऱ्यांना दुग्ध उत्पादनातून बळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

एनडीडीबी व मदर डेअरी यांच्यात करार - हजारावर संकलन केंद्रे
नागपूर - विदर्भातील सहकार चळवळ कमकुवत झाल्याचा फटका दुग्ध उत्पादनाला बसल्याने पशुपालक आणि शेतकऱ्यांवर त्याचा परिणाम झाला. त्यामुळे विदर्भातील दुग्ध उत्पादनाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ व मदर डेअरी फ्रूट्‌स ॲण्ड व्हेजिटेबल लिमिटेड यांनी पुढाकार घेतला आहे. 

एनडीडीबी व मदर डेअरी यांच्यात करार - हजारावर संकलन केंद्रे
नागपूर - विदर्भातील सहकार चळवळ कमकुवत झाल्याचा फटका दुग्ध उत्पादनाला बसल्याने पशुपालक आणि शेतकऱ्यांवर त्याचा परिणाम झाला. त्यामुळे विदर्भातील दुग्ध उत्पादनाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ व मदर डेअरी फ्रूट्‌स ॲण्ड व्हेजिटेबल लिमिटेड यांनी पुढाकार घेतला आहे. 

विदर्भ आणि मराठवाड्यातील दुग्धदन्य पदार्थांचे उत्पादन वाढविण्यासाठी राज्य सरकार, एनडीडीबी व मदर डेअरीच्या सहकार्याने विशेष प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यासाठी विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि मराठवाड्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद, जालना या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. या दहाही जिल्ह्यांतील दुग्ध उत्पादनवाढीसाठी दोन हजार गावांची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना चांगल्या प्रजातीच्या गायी देण्यात येणार आहेत. या प्रकल्पावर एकूण तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. विदर्भातील दुधाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे तसेच प्रक्रिया उद्योगातून रोजगाराची संधी निर्माण करणे, हेही प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. निवड झालेल्या दोन हजारांवर गावांमध्ये दुग्ध संकलन केंद्र आणि तालुका, जिल्हा आणि शहर पातळीवर दूध व त्यापासून तयार केलेल्या पदार्थांची विक्री केंद्रे सुरू केली जाणार आहेत. यामुळे बाजारपेठेत असलेल्या प्रति लिटर दुधाच्या दरामागे शेतकऱ्यांना ४ ते ५ रुपये अधिक मिळणार असल्याची माहिती आहे. 

दूध संकलन सुरू
विदर्भात सध्या काही गावांमध्ये दूध संकलनाला सुरुवात झाल्याची माहिती आहे. या प्रकल्पामुळे काही खासगी कंपन्यांची मक्‍तेदारी संपणार असून स्पर्धेमुळे दुग्ध उत्पादकांना अधिकचे पैसे मिळण्याची शक्‍यता आहे. 

उत्पादकता, उत्पादनवाढीवर भर 
एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात जेवढे दुधाचे उत्पादन होते, तेवढ्या संपूर्ण विदर्भात होते. हे वास्तव बदलण्यासाठी या प्रकल्पात उत्पादन व उत्पादकता वाढ, संस्थात्मक उभारणी यावर भर दिला जाणार आहे. तसेच कृत्रिम रेतनाची सेवा पशुपालकांपर्यंत पोहोचविणे, संतुलित पशुखाद्य व मार्गदर्शन सेवा, गुणवत्तापूर्ण पशुखाद्य, पूरक पशुखाद्य पुरवठा, वैरण विकास कार्यक्रम, गावपातळीवर पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Web Title: vidarbha farmer power by milk production