विदर्भातील शेतकऱ्यांना न्यायाची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा विदर्भातील शेती आणि शेतकऱ्यांसाठी तसा कोरडाच गेला. आतापर्यंत विदर्भातील कापूस, धान, सोयाबीन, संत्रा उत्पादक शेतकरी आणि त्यांच्याशी संबंधित एकही तारांकित प्रश्‍न, लक्षवेधी चर्चेचे प्रस्ताव विधिमंडळात चर्चेला आलेले नाहीत. एरव्ही विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावरून सरकारला घेरणारे विरोधी पक्षाचे नेतेही थंड पडले आहेत. त्यामुळे किमान या सप्ताहात तरी विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा विरोधकांसह सत्ताधारीही व्यक्त करत आहेत.

हिवाळी अधिवेशनाच्या केंद्रस्थानी मुख्यतः विदर्भातील मागासलेपणाचे विषय असतात. त्यातही विशेषतः विदर्भातील विकासकामांमधील अनुशेष, शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न, उद्योग आदी मुद्दे या अधिवेशनात सर्वांच्या चर्चेचे विषय असतात. विरोधी पक्षांचे नेते पोटतिडकीने विदर्भातील शेतकऱ्यांचे विषय मांडत असतात. विदर्भातील शेतकरी आत्महत्यांच्याबाबतीत शापित आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पाऊस, रोगराई आदींमुळे उद्‌भवणारी सततची नापिकी, वाढता उत्पादन खर्च, शेतमालाच्या दरातील अभाव आणि घटते उत्पन्न, यामुळे विदर्भातील शेतकरी नैराश्‍यग्रस्त होत असल्याचे दिसून आले आहे. राज्याच्या तुलनेत सर्वाधिक शेतकरी आत्महत्या विदर्भातील अमरावती विभागात होतात. त्याचमुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसोबत विदर्भातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा कापूस किमतीचा मुद्दा, संत्र्याचे भाव, धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, शेती प्रक्रिया उद्योगांबाबतचे धोरण हे विषय विरोधक प्राधान्याने विधिमंडळात मांडत असतात.

तारांकीत प्रश्‍न, लक्षवेधी, तसेच वेगवेगळ्या चर्चेच्या नियमांचा आधार घेत ही चर्चा झडत असते. चालू हिवाळी अधिवेशनात मात्र अद्यापपर्यंत विदर्भातील शेतकऱ्यांशी संबंधित एकही विषय विधानसभेच्या कामकाजावर आलेला नाही. शेतकऱ्यांच्या मुद्द्याला हात घालून विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करत असतात; मात्र या वेळी सरकारसोबत विरोधकांनीही विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे साफ दुर्लक्षच केल्याचे दिसून येते. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात पाच दिवस कामकाज होणार आहे. अधिवेशनाचे येत्या शनिवारी (ता. 17) सूप वाजणार आहे. अधिवेशनाचा पहिला आठवडा शेतकऱ्यांसाठी कोरडाच गेल्यानंतर किमान या सप्ताहात तरी विदर्भातील शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न विधिमंडळात येतील, अशी अपेक्षा आहे.

वाढते मृत्यू
802
अमरावती
255
नागपूर
(सप्टेंबर 2016 अखेर विदर्भात झालेल्या आत्महत्या)

Web Title: vidarbha farmers await justice