विदर्भ, मराठवाड्यातील कापूस उद्‌ध्वस्त 

विदर्भ, मराठवाड्यातील कापूस उद्‌ध्वस्त 

अमरावती - राज्यातील आत्महत्याग्रस्त विदर्भ व मराठवाड्यातील सुमारे 44 लाख हेक्‍टर जमिनीवरील कापसाचे पीक उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे चार लाख शेतकरी बाधित होणार असल्याचा अंदाज वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनने आपल्या अहवालात वर्तविला आहे. केंद्राने तातडीने शेतकऱ्यांना मदत न केल्यास या भागातील आत्महत्या वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

यंदा कमी पावसामुळे निर्माण झालेला दुष्काळ, घसरलेली जलपातळी, हवामानातील बदल, बीटी तंत्रज्ञानातील अपयश, जमिनीतील घसरलेली आर्द्रता व पोत याचा एकंदरीत परिणाम कापसाच्या उत्पादनावर होत आहे. उत्पादनाची सरासरी कमालीची घसरणार असून, या दशकातील ती सर्वांत नीचांकी असेल, असा अंदाज आहे. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनने प्रत्यक्षात शेतांवर जाऊन केलेल्या सर्वेक्षणातून हा अंदाज काढण्यात आला आहे. 

विदर्भ व मराठवाड्यात यंदा दोन ते तीन क्विंटल उत्पादनाची सरासरी राहणार आहे. यामुळे या भागात सुमारे आठ हजार कोटी रुपयांचे नुकसान संभवणार आहे. 

बीटी तंत्रज्ञानाच्या बियाण्यांवर होणाऱ्या अळ्यांचे आक्रमण रोखण्यासोबतच नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना महागडी औषधे फवारावी लागतात. त्यामुळे उत्पादनाचा खर्च वाढत असून, उत्पादन मात्र त्या तुलनेत होत नसल्याने शेतीवरील खर्चाचा बोझा वाढला आहे. केंद्राने दीर्घ व अल्प मुदतीची मदत तातडीने जाहीर करण्याची आवश्‍यकता असल्याचे मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. 

गतवर्षी गुलाबी बोंड अळीच्या आक्रमणाने शेतकरी उद्‌ध्वस्त झाला. राज्याच्या कृषी विभागाने स्वदेशी व विदेशी अशा 90 कंपन्यांना चुकीचे बीटी बियाणे पुरविल्याच्या आरोपाखाली नुकतेच 1200 कोटी रुपये दंड व नुकसानभरपाई देण्याची नोटीस बजावली आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही. 

चार लाख शेतकरी चिंतित 
मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर तर विदर्भातील नागपूर व अमरावती विभागातील 19 जिल्ह्यांत कापसाचा पेरा आहे. विशेष म्हणजे, हा कापूस उत्पादक पट्टा कोरडवाहू असून पावसाच्या पाण्यावर अवलंबला आहे. 19 जिल्ह्यांत 44 लाख हेक्‍टर क्षेत्रात कापसाचा पेरा असून चार लाख शेतकऱ्यांची उपजीविका त्यावर अवलंबली आहे. सर्वेक्षणात वर्तविलेल्या अंदाजानुसार यंदा प्रतिहेक्‍टर दोन ते तीन क्विंटल कापसाच्या उत्पादनाची सरासरी राहणार आहे. दशकातील ही सर्वांत कमी उत्पादनाची सरासरी व सलग दुसऱ्या वर्षी बसणारा फटका आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com