विदर्भात नगरपालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

नागपूर : विदर्भातील नगरपालिका कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून (ता. 1) बेमुदत कामबंद आंदोलन केले. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कामकाज ठप्प पडले. कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना आल्यापावली परत जावे लागले. नागपूर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. सरकारच्या विरुद्ध घोषणाबाजी करून कामबंद केले.

गोंदिया ः नगर परिषद कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग विनाअट लागू करावा, अस्थायी कर्मचाऱ्यांना स्थायी करावे, अनुकंपाधारकांना त्वरित नोकरी द्यावी, नवनिर्मित नगरपंचायतीमधील उद्‌घोषणानंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना विनाअट समाविष्ट करण्यात यावे आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
अमरावती ः महाराष्ट्र नगर परिषद कर्मचारी संवर्ग कर्मचारी व संघर्ष समितीच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी (ता. एक) जिल्ह्यातील नगरपालिका कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. चांदूरबाजार, दर्यापूर, अचलपूर, धामणगावरेल्वे यांसह प्रत्येक तालुक्‍यातील कर्मचाऱ्यांनी नगर परिषद कार्यालयापुढे आंदोलन सुरू केले.
भंडारा : नववर्षाच्या सुरुवातीला जिल्ह्यातील सर्व नगर परिषदा व नगरपंचायतीतील कर्मचाऱ्यांनी सातव्या वेतन आयोगासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अत्यावश्‍यक सेवेसह इतर कामे खोळंबली आहेत. सर्व नगर परिषद, नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत संघटना प्रतिनिधींनी अधिकारी व मंत्रालयस्तरावर बैठकीत चर्चा केली.
वर्धा : मंगळवार (ता. एक) पासून बेमुदत कामबंद आंदोलनात एक हजारापेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी सहभागी झाल्याने कार्यालयीन कामकाज ठप्प पडले आहे. आंदोलन सुरूच राहिल्यास नागरिकांची गैरसोय होणार आहे. आज सकाळपासूनच नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या कार्यालयात शुकशुकाट होता. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातही नगरपालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन झाले.

Web Title: Vidarbha municipal workers' agitation