कॉंग्रेस नगरसेवक बंटी शेळकेंविरुद्ध पुन्हा एक गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
01.01 AM

या प्रकरणी मोन्टी व त्याच्या मित्रांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपींना वाचविण्यासाठी जामीनपात्र कलमान्वये गुन्हा दाखल केला.

नागपूर ः कॉंग्रेसचे वादग्रस्त नगरसेवक बंटी शेळके यांच्यावर पोलिस ठाण्यात पुन्हा एक गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी मंगळवारी रात्री 11 आपल्याच वस्तीतील काही तरुणांना मारहाण केल्याचा आरोप असून या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोन्टी नीलेश मुटकरे (27, रा. दसरा रोड, महाल) याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास मित्र रजत दुर्गे, अक्षय काचुरे, दिलीप तितरमारे हे त्यांच्या घरासमोर बसून होते. त्यावेळी नगरसेवक बंटी शेळके हे आपल्या काही कार्यकर्त्यांसह मद्यधुंद अवस्थेत तेथे पोहोचले. याच परिसरात शेळके यांचे घर आहे. शेळके मोन्टी व त्यांच्या मित्रांजवळ थांबले. विधानसभा निवडणुकीत मोन्टी व त्याच्या मित्रांनी आपल्याला मदत का केली नाही, आपल्या प्रचारात सहभागी का झाले नाही, असा जाब विचारला.

शेळकेंनी विरोधात काम केल्याचा संशय घेऊन भांडण केले. एकेकाला मारायला सुरुवात केली. नगरसेवक असल्याने मुले शांत होते. तरुणांना परिसरात राहायचे असल्यास दबून राहण्याची धमकी दिली. या प्रकरणी मोन्टी व त्याच्या मित्रांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपींना वाचविण्यासाठी जामीनपात्र कलमान्वये गुन्हा दाखल केला.

 

महापालिका निवडणुकीत बंटी शेळके प्रभाग 18 मधून उभे होते. त्यावेळी परिसरातील तरुणांनी हिरिरीने भाग घेऊन प्रचार केला. पण, नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर ते तरुणांशी असभ्य वर्तन करू लागले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीवेळी परिसरातील तरुणांनी त्यांच्यासाठी प्रचारच केला नाही. याचा राग धरून त्यांनी अनेकदा तरुणांना मारहाण केली. पण, आता सहन करायचे नाही म्हणून पोलिसांत तक्रार दिली असून त्यांच्याविरुद्ध भादंविच्या 326 कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी पीडितांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले.
 

मला बदनाम करण्याचे प्रयत्न

भाजपचे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी मला बदनाम करण्यासाठी रचलेले नाट्य आहे. मोन्टीला मी मारहाण केली नाही. उलट लहान भावाप्रमाणे त्याची गळाभेट घेऊन समजूत काढली. मोन्टी हा दारू पिऊन वस्तीत काही दिवसांपासून शिवीगाळ करीत होता, अशा तक्रारी मला मिळाल्या होत्या. त्यामुळे त्याची मी भेट घेऊन त्याची समजूत घातली. मात्र, भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोन्टीला हाताशी धरून मला बदनाम करण्यासाठी हा कट रचला आहे.
-बंटी बाबा शेळके


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidarbha nagpur congress corporater banti shelke