"जनआक्रोश'च्या चंद्रपुरात दोन चुली 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

चंद्रपूर - केंद्र आणि राज्य सरकारविरोधात चंद्रपुरात सोमवारी आयोजित जनआक्रोश मेळाव्यानिमित्ताने कॉंग्रेसमधील दुफळीचे दर्शन झाले. आमदार विजय वडेट्टीवार आणि माजी खासदार नरेश पुगलिया यांनी वेगळ्या चुली मांडल्या. दोघांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन केले. नेत्यांसोबतच कार्यकर्तेही विभागले गेले. कॉंग्रेसच्या विदर्भातील या पहिल्याच जनआक्रोश मेळाव्याला दुफळीचे गालबोट लागले. 

विधानसभेतील उपनेते आमदार विजय वडेट्टीवार आणि माजी खासदार नरेश पुगलिया यांच्यात कमालीचे वितुष्ट आहे. वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात कॉंग्रेसच्या विभागीय जनआक्रोश मेळाव्याची घोषणा केली. त्यानंतर पुगलिया यांनीसुद्धा विदर्भ किसान मजदूर कॉंग्रेसच्या वतीने 6 नोव्हेंबरलाच विभागीय शेतकरी कामगार मेळावा आणि रॅलीचे आयोजन केले, तेव्हापासून या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली. वडेट्टीवारांनी पुगलिया यांना भाजप समर्थक ठरविले. पुगलिया यांनी वडेट्टीवार यांच्या संपत्तीचा मुद्दा उकरून काढला. पक्षाची बदनामी थांबविण्यासाठी शेवटी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मध्यस्थी केली. मेळावा रद्द करण्याची विनंती केली; मात्र पुगलिया यांनी चव्हाण यांनाच जनआक्रोश मेळावा रद्द करा, असा सल्ला दिला. त्यामुळे चंद्रपुरात कॉंग्रेसचे दोन मेळावे होतील, हे स्पष्ट झाले. दोघांनीही मेळाव्याची जोरदार तयारी केली. वडेट्टीवारांनी चांदा क्‍लब येथे आयोजित केलेला पक्षाचा अधिकृत मेळावा होता. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश, महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस आदी उपस्थित होते. या मेळाव्यात पक्षाची बदनामी आणि नुकसान करणाऱ्यांवर कारवाई करा, असा बहुतेकांचा सूर होता, तर काहींनी पुन्हा जुळवून घेण्याचाही सल्ला वडेट्टीवारांना दिला. 

विदर्भातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असतील, असा दावा पुगलियांचा होता. माजी मंत्री अनीस अहमद, नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, आमदार सुनील केदार, अशोक धवड, माजी खासदार गेव्ह आवारी यांच्याव्यतिरिक्त तिकडे कुणी फिरकले नाहीत.

Web Title: vidarbha news chandrapur congress