कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्यांचा आलेख चढताच!

suicide
suicide

वाशीम - आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍याच्या समस्या सुटाव्यात म्हणून विरोधकांकडून कर्जमाफीची मागणी करण्यात आली. आज-उद्या करीत अखेर ता. 24 जूनला मुख्यमंत्र्यांनी ‘ऐतिहासिक’ कर्जमाफीची घोषणा केली. त्यामुळे डोक्यावर असलेले कर्ज भरण्याची गरज शेतकर्‍यांना नव्हती. मात्र, असे असतानाही कर्जमाफी मृगजळ ठरत असल्याची भावना बळावत आहे. विदर्भातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या ग्रस्त, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन अंतर्गत येणार्‍या सहा जिल्ह्यांत चार महिन्यांत तब्बल 420 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. कर्जमाफीची घोषणा तर केली. मात्र, कार्यान्वनाचा लकवा शेतकर्‍यांच्या जिवाशी आला आहे. 

विदर्भ हा संपूर्ण महाराष्ट्रात मागास भाग म्हणून ओळखल्या जातो. त्यातच गेल्या दोन दशकांपासून वाढत्या शेतकरी आत्महत्यांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. हलक्या प्रतीचा भूभाग, पाणी साठवणूक, सिंचनाचा अभाव, कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटांनी विदर्भातील शेतकरी होरपळून निघत आहे. त्यामुळे विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ व वर्धा या सहा जिल्ह्यांची निवड वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन अंतर्गत करण्यात आली. जेणेकरून या भागातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या कमी होऊन, दरडोई उत्पन्नात वाढ होत, जीवनमान उंचावेल. मात्र, वास्तव सकारात्मकतेपेक्षा नकरात्मकच बाबी समोर आणत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांच्या आर्थिक समस्या सोडविण्याच्या दृष्टीने चालढकल करीत ‘ऐतिहासिक’कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, या कर्जमाफीचा लाभ कुणाला हे समजायलाच दोन महिन्यांचा कालावधी लागला. कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर, शेतकरी आत्महत्या थांबणे गरजेचे होते. कारण, शेतकर्‍यांना कर्ज भरावे लागणार नव्हते. मात्र, कर्जमाफी हा शेतकरी आत्महत्यांवरील पर्याय नसल्याचे वास्तव, गत चार महिन्यांत झालेल्या 420 आत्महत्यांवरून दिसून येते. 

‘व्हीएनएसएस’अंतर्गत जिल्ह्यांतील शेतकरी आत्महत्या
महिना..................आत्महत्या..... पात्र.... अपात्र.......चौकशी.......मदत
जुलै 2017...............87.........44.......39...........4..........44
ऑगस्ट 2017.........119.........48.......49.........22..........48
सप्टेंबर 2017.........122.........34........20..........68........34
ऑक्टोबर 2017........92..........06.......06..........81.........06
एकूण ....................420.......132.....114........175.......132

शेतकर्‍याला घामाचे मोल हवे ः किशोर तिवारी
शेतकरी शेतात राबराब राबून उत्पन्न घेतो. मात्र, त्याच्या घामाची बाजारात किंमत होत नाही. कवडीमोल दराने कृषीमालाची खरेदी होतो. त्यामुळे शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य दर मिळणे गरजेचे आहे. कर्जमाफी ही शेतकर्‍यांच्या समस्या सोडवूच शकत नाही. त्यामुळे कर्जमाफी मागणारे व देणारे दोघेही मूर्खच! अशी प्रतिक्रिया वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली. 

जखम मांडीला अन् पट्टी शेंडीला ः तुपकर
सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी योजना फसवी आहे. त्यामुळे ती प्रत्यक्षात उतरली नाही. आभास निर्माण करण्याचा या सरकारचा हातखंडा आहे. प्रत्यक्षात मात्र, विदर्भामध्ये शेतकर्‍यांच्या चिता रोज जळत असताना, हे सरकार ‘डिजिटलायझेशन’ व ‘जाहिरात’बाजीत मग्न आहे. सरकारची अशीच भूमिका राहिली तर, विदर्भात किड्या मुंग्यांसारखी लोकं मरतील, त्याचे पाप मात्र यांच्या शिरावर बसणार आहे. शेतमालाला भाव हा एकच उपाय असून, तो तत्काळ अंमलात आणला तर; शेतकरी आत्महत्या कमी होतील. अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिली. 

कर्जमाफी हा उपाय नव्हेच!
शेतकर्‍यांच्या समस्या सुटाव्यात म्हणून कर्जमाफी करण्यात आली. मात्र, कर्जमाफी ही शेतकर्‍यांच्या समस्यांचे उत्तर नाही, ही बाब शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारीने पुन्हा एकदा उघड केली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतीमालाला लागवड खर्च अधिक 50 टक्के मोबदला, सिंचनाची व्यवस्था, सुरळीत वीज पुरवठा ह्या बाबी मिळाल्यास, शेतकरी आत्महत्याही करणार नाही. तसेच कर्जासाठी कुणासमोर हातही पसरणार नाही, एवढे मात्र निश्‍चित!

अमरावती, बुलडाणा डेंजर झोनमध्ये!
विदर्भातील शेतकरी आत्महत्या काही केल्या कमी होत नाहीत. त्यातही ‘व्हीएनएसएस’अंतर्गत येणार्‍या जिल्हे शेतकरी आत्महत्यांमुळे जगाच्या नकाशावर आलेत. शासनाच्या कर्जमाफीच्या घोषणेनंतर जुलै ते ऑक्टोबर या चार महिन्यांत बुलडाणा जिल्ह्यात 103, अमरावती जिल्ह्यात 107 तर यवतमाळ जिल्ह्यात 92 शेतकरी आत्महत्या घडल्या. या जिल्ह्यांत दररोज एक आत्महत्या होत असल्याचे दिसून येते. अमरावती हा कॅटनबेल्टचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणार्‍या जिल्ह्याने शेतकरी आत्महत्येत यवतमाळलाही मागे टाकले आहे. 

‘व्हीएनएसएस’मध्ये या जिल्ह्यांचा समावेश 
हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन (व्हीएनएसएस) हे विदर्भातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या मिशन अंतर्गत अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ ही पाच व वर्धा अशा एकूण सहा जिल्ह्यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com