आसवेही  गोठली डोळ्यांतून या...

आसवेही  गोठली डोळ्यांतून या...

मौदा - जिल्ह्यातील मौद्या तालुक्‍यातील बारसी या एकाच गावात चार दिवसांत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. परंतु, इतकी गंभीर घटना होऊनसुद्धा संवेदनाहीन शासन- प्रशासनातील आमदार-खासदार (आजी-माजी) तर सोडाच पण उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांनासुद्धा पीडित शेतकरी कुटुंबाला व गावाला भेट देण्याची गरज वाटत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी नेते संजय सत्येकार यांनी व्यक्त केली. शेतकरी कुटुंबीयांच्या डोळ्यातली आसवेही आता गोठून गेली आहेत.

बारसी येथील माणिकराव रामजी हिवसे (वय ४५) या तरुण शेतकऱ्याने शेतात विष प्राशन करून जीवन संपविले. सततची नापिकी, निसर्ग व मानवनिर्मित दुष्काळ, पिकाचे पडलेले बाजारभाव, बॅंकेचे-सावकाराचे कर्ज, धरणातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याची अडचण, फसवी शेतकरी कर्जमाफी अशा अनेक समस्यांशी सामना करीत शेतकरी कसेबसे हातात पीक येईल, या अपेक्षेत असताना यावर्षी तुडतुडा व करप्याने हताश केले. हातचे पीक हिरावले आहे. दुसरी घटना  १६ नोव्हेंबरला या गावातील दुसरे शेतकरी राजकुमार पांडुरंग हिवसे (वय ५०, हल्ली मुक्काम  नवेगाव कोराड) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. या दोन्ही शेतकऱ्यांवर बारसी येथे अंत्यसंस्कार पार पडले.

घरचा कर्ता व्यक्ती गेल्यानंतर किती दुःख सहन करावे लागते, याचा अनुभव त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला येतो. येणाऱ्या समस्या निधड्या छातीने झेलणारा कर्ता पुरुषच जिथे हारतो, मग असाह्य पत्नी व समस्याग्रस्त जगाचा कसलाही अनुभव नसणाऱ्या कोवळ्या मुलांनी जगाचा सामना कसा करावा, असा प्रश्न पडतो. कर्त्या पुरुषांच्या पश्‍चात त्यांचे चिंताग्रस्त चेहरे सर्व काही सांगून  जातात. एरवी स्वतः उपाशी राहून कुटुंबाचा सांभाळ करणारा शेतकरी त्याच्या पश्‍चात कुटुंबाचे काय होणार, याचा विचार न करता या जगाचा निरोप घेतो.

प्रत्येक सजीव प्राणी स्वतःचा जीव वाचविण्याकरिता धडपडतो. एरवी कोणी साधारण चिमटासुद्धा काढला तरी आपला जीव निघतो. कधी मुंगी, माकोडे किंवा गाय, बैल वा इतर जीवांनी  आत्महत्या केली असावी याचे उदाहरण नाही. मग शेतकऱ्यांवर आत्महत्या करायची वेळ  का येते, यावर सरकारने गंभीर विचारमंथन करणे गरजेचे आहे. जनावर आत्महत्या करीत नाही, परंतु शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येते. याचा अर्थ शासनकर्त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे आजचा शेतकरी जनावरापेक्षासुद्धा नीच दर्जाचा झालेला आहे. एकेकाळी उत्तम शेती म्हणून नावलौकिक असलेला जगाचा पोशिंदा आज आत्महत्या करण्यास विवश झालेला आहे.

एखाद दुसरी आत्महत्येची घटना सोडली तरी आजपर्यंत मौदा तालुका आत्महत्याग्रस्त नव्हता. परंतु, पेंच धरणामुळे यावर्षीपासून उद्भवलेल्या सिंचनाच्या प्रश्नामुळे भविष्यामध्ये शेतकरी आत्महत्या वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. कसेबसे ओलीत करून वाचविलेले पीक तुडतुडा व करप्याने फस्त केले. जीवाचे रान करून, प्रसंगी कर्जबाजारी होऊन हाती आलेले पीक नष्ट होते, तेव्हा शेतकऱ्यांचा धीर सुटतो व याक्षणीच तो आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतो. हे चक्र कधी थांबणार? सरकार यासाठी काही ठोस उपाययोजना करणार काय, असा सवाल कष्टकरी जनता सरकारला विचारत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com