दिव्यांगांच्या बाप्पांचे झाले कौतुक - तब्बल 1200 गणपतींची निर्मिती

आशिष ठाकरे
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

बनविण्यात आलेल्या मुर्त्या या कुणालाही न विकता त्या संस्थेला आधारवड असलेल्या आजीवन सदस्य, वर्षभरातील दानशूर, अधिकारी, मोठ्या संस्थांना विद्यार्थ्यांकडूनच भेट देण्यात येतात. यंदा नव्यानेच रुजू झालेले  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.षण्मुखराजन यांच्या हस्ते प्रथम दानशूर व्यक्तींना मूर्ती वाटपाचे कार्य पार पडले

बुलडाणा - कला साकारण्यासाठी अंगी गुणाची आवश्यकता असून, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपल्या अन्न, वस्त्र आणि निवार्‍याच्या गरजा पूर्ण करणार्‍या पर्यावरण पूरक गणपती उत्सव साजरा करण्याचा संदेश देण्याची परंपरा बुलडाणा शहरातील अपंग कल्याण पुनर्वसन संस्थेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून राबविण्यात येत आहे. येथील विद्यार्थ्यांनी तब्बल सहा महिन्याच्या कालावधीमध्ये छंद आणि एक वेगळा उपक्रम म्हणून हे व्रत हाती घेतले होते. 

विद्येची देवता असलेली गणपती बाप्पांची सुबक व देखणी मुर्ती त्यांच्या हातातून जरी घडत असली तरी, मनाचा भाव या कलाकृतीत उतरून एका नावाजलेल्या कलाकाराप्रमाणे साकारलेल्या हजार 200 मुर्त्यांची सुबत्ता म्हणजे साक्षात बाप्पांचा आशीर्वादच असल्याचा प्रत्यय यंदा बुलडाण्यात पहावयास मिळाला.  

राज्यात एकाच परिसरात अपंग कल्याण व पुनर्वसन संस्था द्वारा संचालित अपंग, मुकबधिर व अंध निवासी विद्यालय वसलेले आहे. या तिन्ही शाळांमध्ये तब्बल 210 विद्यार्थी असून, त्यापैकी 190 विद्यार्थी हे निवासी असून, उर्वरित शहरातील आहेत. सर्वत्र पर्यावरण पूरक गणपती चळवळ आता जोर धरत असली तरी, या संस्थेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपूर्वीच विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक गणपती बनविण्याची सुरवात केली आहे. यंदा तब्बल एक हजार 200 गणपतींची निर्मिती करण्यात आली.

बनविण्यात आलेल्या मुर्त्या या कुणालाही न विकता त्या संस्थेला आधारवड असलेल्या आजीवन सदस्य, वर्षभरातील दानशूर, अधिकारी, मोठ्या संस्थांना विद्यार्थ्यांकडूनच भेट देण्यात येतात. यंदा नव्यानेच रुजू झालेले  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.षण्मुखराजन यांच्या हस्ते प्रथम दानशूर व्यक्तींना मूर्ती वाटपाचे कार्य पार पडले. संस्थेतील शाळांमध्ये पहिली ते सातवीपर्यंत विद्यार्थी शिक्षणासोबतच मुर्त्यां बनविण्याचे कार्य करत असून, बनविलेल्या मुर्तींना नंतर सुबत्ता देण्याचे कार्य येथील शिक्षक व कर्मचारी करत असतात. मुर्ती बनविण्याचे साहित्य हे संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना पुरविण्यात येत असते. पर्यावरण पूरक गणपती बाप्पांची निर्मिती करत समाजाला संदेश देण्याचे कार्य या दिव्यांच्या माध्यमातून होत असून, सदर संस्थाही त्यांच्यावर तितकीच मेहनत घेत असताना त्याच समाजाकडून या दिव्यांगाच्या स्वप्नांला साकारण्यासाठी मदतीची आस लागली आहे.

दिवसेंदिवस जन्मापूर्वी होणार्‍या बाळाच्या चाचण्या तसेच पल्स पोलिओ मोहिमेची व्यापकता पाहता दिव्यांग बालकांच्या जन्मामध्ये मोठ्याप्रमाणात घट झाली आहे. यामुळे संस्थेच्या विद्यार्थ्यांमध्येही घट होताना दिसत आहे. गेल्या चार वर्षांअगोदर 290 विद्यार्थी होते जे आता 210 वर आले आहे. विविध अत्याधुनिक यंत्राच्या माध्यमातूनही दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये प्रगती दिसून येत असली तरी, यासाठी त्यांना मदत करण्याची गरज आहे.

- अजय कारंजकर, संयुक्त सचिव, अपंग पुनर्वसन संस्था, बुलडाणा. 

Web Title: vidarbha news: ganesh festival