कचरा रे कचरा रे दत्तक गावात कचरा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

गाव ही शरीर। त्यास राखावे नेहमी पवित्र।
त्याने नांदेल सर्वत्र आनंद गावी।।
केंद्र शासनाने गावविकासाच्या दृष्टीने खासदार दत्तक ग्रामयोजना अमलात आणली. त्याच धर्तीवर राज्य शासनाने आमदारांना गाव दत्तक घेण्याचे सूचित केले. काही मोजकी गावे वगळली तर अनेक गावे विकास तर सोडाच घाणीतून दुर्गंधीमुक्त होऊ शकली नाहीत. स्वच्छतादिनानिमित्त सकाळच्या चमूने घेतलेला हा आढावा. 

स्वच्छ पाणी, स्वच्छतेची आस
डॉ. आशीष देशमुख, देवग्राम
जलालखेडा -
 देवग्राम गाव आदर्श करण्यासाठी गावातच अधिकाऱ्यांच्या सभा झाल्या. नियोजनही झाले; पण दोन वर्षे होत आली तरी विकास झाला नाही. गावाचे नाव बदलले; पण रूप मात्र बदलले नाही. आमदार डॉ. देशमुख यांच्या प्रयत्नांनी गावाचे नाव बदलून देवग्राम करण्यात आले. मात्र, गावाचे रूप देवग्रामप्रमाणे झाले नाही. आज गावात सगळीकडे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. गावाला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. भांडणे वाढल्याने पोलिसांतील तक्रारीत वाढ झाली आहे. दूषित पाणीपुरवठा करण्यात येतो. सांडपाणी वाहून जाण्याची व्यवस्था नाही. रस्ते व नाल्यांची दुरुस्ती करण्यात न आल्याने सांडपाणी साचून राहते. सांडपाण्याचे डबके तयार झाले आहेत. नळाद्वारे पुरवठा करण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्यात मांसाचे तुकडे, कचरा, सापांची कात असते. या दूषित  पाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. पाणीटाकीची साफसफाई करण्यात येत नाही. आमदार डॉ. देशमुख यांनी गाव दत्तक घेतले असून, आदर्श गाव म्हणून हे ओळखले जात आहे. मात्र, गावात कोणतीच सुधारणा झाली नाही, अशी तक्रार बंडू सुधाकर दंढारे, किशोर सुभाष चरडे, मयूर संजयराव वासाडे, जितेंद्र गणेशराव चौधरी, मारोतराव बारमासे, प्रमोद बारमासे, हरीश भाऊराव गिरडे, प्रशांत तेजराम लोहे, प्रदीप शालिक लोहे, रवींद्र ठोमणे, विलास सातपुते, गणेश नामदेव मोरे यांनी केली आहे.

सीएमचे गाव झाले चकाचक
 देवेंद्र फडणवीस, फेटरी

नागपूरपासून १८ कि. मी. अंतरावर असलेले फेटरी हे गाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतले आहे. अडीच वर्षांत फडणवीस यांच्या माध्यमातून येथे अनेक विकासकामे झाली. विशेषत: स्वच्छताविषयक कामावर अधिक भर दिल्याने अल्पावधीतच फेटरी चकाचक झाल्याचे चित्र आहे. गावातील केरकचऱ्याची नियमित विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतकडे दोन कचरा वाहून नेणाऱ्या गाड्या आहेत. उघड्या नाल्यांची समस्या मार्गी लावण्यासाठी भूमिगत मलवाहिनी टाकण्याच्या कामाने वेग घेतला आहे. गावातील रस्ते सिमेंटचे असल्याने चिखल तुडवित जाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे.

गावकऱ्यांमध्ये स्वच्छतेविषयक जनजागृतीमुळे घाणीचे साम्राज्य नसून फेटरी हे एक आदर्श गाव म्हणून नावारूपास येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह पत्नी अमृता फडणवीस व प्रशासनाचे फेटरी गावावर सातत्याने लक्ष आहे. त्यामुळेच गावात कोट्यवधींची कामे सुरू आहेत. येथील अंगणवाडी व शाळा डिजिटल झाली आहे. आरोग्याच्या सुविधादेखील येथे उपलब्ध आहेत.

विहिरीत केरकचरा 
डॉ. मिलिंद माने, माहूरझरी

नागपूरपासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर असलेले ग्रामपंचायतीचे माहूरझरी हे गाव. दत्तक घेऊन तीन वर्षांचा कार्यकाळ झाला. पुन्हा गावाकडे पुन्हा कोणी लक्षच दिले नाही. ग्रामपंचायतीच्या वतीने वस्तीतील अंतर्गत रस्त्याची मागणी, गावाशेजारच्या तलावाच्या सौंदर्यीकरणाची मागणी, गावात खुल्या नाल्यांची मागणी केली. आमदार माने यांनी ग्रामविकास मंत्रालयाकडे निधीची मागणी केली आहे. परंतु, अद्याप कुठलीच विकासाची कामे झाली नाहीत. अनेक वर्षांपासून पाणीपुरवठ्याची टाकी जीर्ण झाली आहे. ग्रामपंचायत कार्यालयाच्या वाटेवर, ग्रामपंचायत कार्यालयासमोर तसेच जि. प. शाळेसमोर परिसर अस्वच्छ वाटतो. गावात भूमिगत नाल्या नाहीत. खस्ता स्थितीतील विहीरीत कुठलाही उपसा न करता केरकचरा टाकण्यात येतो. गावात अजिबात स्वच्छता पाळली जात नाही.

गजबजलेले गटार, कचराकुंड्या
प्रकाश गजभिये, चिचोली

नागपूर तालुक्‍यातील चिचोली हे गाव असून, राज्य सरकारच्या आमदार दत्तक ग्राम योजनेअंतर्गत विधान परिषदेचे सदस्य प्रकाश गजभिये यांनी दत्तक घेतले आहे. त्यांनी हे  गाव दत्तक घेतल्यानंतर गावात कोणतीच ठोस विकासकामे झाली नसल्याचे गावकरी सांगतात. गावातील मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात त्यात पाणी साचत असल्याने गटारचे स्वरूप प्राप्त होते. गावातील इतरही रस्त्यांची अवस्था तिच आहे. पाणी टाकीच्या शेजारीच कचऱ्याचे ढिगारे पडलेले आढळतात. गावातील सांडपाणी वाहून नेण्याऱ्या नाल्यादेखील तुटफूट झाल्या आहेत. त्यामुळे त्यातील पाणी रस्त्यावर वाहत असल्याचे चित्र पाहयला मिळाले. आमदार गजभिये यांनी गाव दत्तक घेऊन अडीच वर्षांचा कालावधी लोटला; परंतु अद्याप येथे विकासकामे झाली नसल्याचे चित्र आहे. गजभिये यांच्या पुढाकाराने शांतीवन परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाल्याचे गावकरी सांगतात.

गावात चला नाक दाबून
डी. मल्लिकार्जुन रेड्डी चारगाव

रामटेक - नाल्यांभोवती वाढलेली झाडेझुडपे, गावातील रस्त्यांवर जनावरांचे मलमूत्र, नाल्यांची होत नसलेली सफाई यामुळे चारगाव या छोट्याशा टुमदार गावाला बकालपण आल्यासारखे वाटते. जनावरांसाठी गोठे नसल्याने कित्येकजण आपली जनावरे रस्त्यालगत बांधतात. मग जनावरे आपले मलमूत्र विसर्जन रस्त्यावरच करतात. नाल्यांवर पावसाळी झुडपांनी आच्छादन केल्याने त्या झुडपांमधून विंचवासह सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती वाटते. पावसाळ्यापूर्वी गावातील नाल्यांची सफाई न झाल्याने चारगाव या सुंदर गावाला आपली ओळख हरवल्यासारखे वाटते. कंपोस्ट खतासाठी गावाच्या दोन बाजूंना मोठी टाकी बांधण्यात आली आहे. मात्र टाक्‍यात कमी अन्‌ बाहेरच जास्त शेण आणि कचरा पडलेला दिसतो.

सुधारणेएेवजी दुर्गंधी, अस्वच्छता
सुधाकर कोहळे  खापा-पाटण

कामठी - खापा-पाटण गाव कोल्हार नदीच्या किना-यावर वसलेले असून या गावाची लोकसंख्या १७०० इतकी आहे. या गावाला जाण्याकरिता दहेगाव पिपळा तर दुसरा मार्ग कोराडी लोणखैरीपासून सात किलोमीटर अंतरावर आहे. हे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी विधानसभा क्षेत्रातील गाव असून या गावाला आमदार सुधाकर कोहळे यांनी दत्तक घेतले. गाव सुखसुविधांपासून दूर आहे. गावात स्वच्छतेचा अभाव आहे. जागोजागी ग्रामपंचायतचे नियोजन नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहने, दुर्गंधी, अस्वच्छता दिसून येते. गाव हागणदारीमुक्त नसून येथील लोक शौचास रस्त्यावर बसतात. ‘काय सांगाव साहेब, आमच्या गावावर कुणाचे लक्ष नाही’ असे गावातील वाचनालयाजवळ बसलेले सुरेश वऱ्हाडे, सुदाम गहुकर, सोहेल शेख, सुखदेव धडाडे, श्रीपत राजुरकर, देवराव नेवारे, बाबा वानखेडे यांनी सांगितले. गावातील उपसरपंच प्रमोद राजुरकर यानी सांगितले की मी गावाचा विकास कृती आराखडा तयार केला असून पंचायतीकडून बीडीओमार्फत पाठविला आहे. या आराखड्यात गावातील नाल्या, रस्ते तसेच दवाखान्याच्या उपकेंद्राची मागणी केली आहे.

संकलन -  अंकूश गुंडावार, सोपान बेताल, वसंत डामरे, गजानन बोरकर, चंद्रकांत श्रीखंडे, मनोज खुटाटे.

Web Title: vidarbha news Garbage in adoption village