अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

सडक अर्जुनी (जि. गोंदिया): अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना सडक अर्जुनी तालुक्‍यातील मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर शुक्रवारी (ता. 23) रात्री घडली. या घटनेत तीन वर्ष वयाच्या बिबट्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

सडक अर्जुनी (जि. गोंदिया): अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना सडक अर्जुनी तालुक्‍यातील मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर शुक्रवारी (ता. 23) रात्री घडली. या घटनेत तीन वर्ष वयाच्या बिबट्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास डुग्गिपार बिटात येत असलेल्या वनपरिक्षेत्रात देवपायली गावाजवळ रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला असावा. आज (शनिवार) सकाळी ही बाब निदर्शनास येताच नागरिकांनी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत बिबट्याला ताब्यात घेत पंचनामा केला. देवपायली जवळच्या डोंगरगाव डेपोत बिबट्याला नेण्यात आले. देवरी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी पगारे यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले. डेपोमधील जागेत मृत बिबट्याला पुरण्यात आले. यावेळी गोंदियाचे सहायक वनसंरक्षक शेख, सावन बहेकार, सडक अर्जुनीचे तालुका वनपरिक्षेत्राधिकारी जी. एस. राठोड, सुनील खांडेकर व इतर वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

सदर घटना सडक अर्जुनी रेंज व कोहमारा सर्कल अंतर्गत घडली. डुग्गिपारच्या समोर शशिकरण पहाडीपासून घटनेच्या ठिकाणापर्यंत दुहेरी मार्ग आहे. जंगलव्याप्त भाग असल्याने या रस्त्यावरून वन्य प्राण्यांचे अवागमन होत असते. येथे पुलाची निर्मिती करण्यात यावी असा प्रस्ताव वनविभागाकडून शासनाकडे पाठविण्यात आला आहे. शासनाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title: vidarbha news gondia leopard killed in accident