वर्षभरात केवळ पाच घरकुलांचे काम पूर्ण!

home
home

अकोला - पंतप्रधान घरकुल योजनेचे काम राज्यात प्रथम सुरू करणारी अकोला महापालिका वर्षभरात केवळ पाच घरकुलांचे काम पूर्ण करू शकली. वेगवेगळ्या पातळ्यांवर येणाऱ्या अडचणी सोडविण्यात अपयश आल्याने कामांची गती कमी आहे. त्यामुळे योजना मंजूर होऊनही लाभार्थींना त्याचा पुरेशा लाभ मिळत नसल्याने नगरसेवकांनी  महासभेत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात.

पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत अकोला महापालिका क्षेत्रात एका खासगी कंपनीद्वारे सर्वेक्षणाचे काम करण्यात आले. हे सर्वेक्षणाचे काम २७ जून ते ३१ आॅक्टोबर २०१७ या काळात पूर्ण करण्यात आले. त्यातून शहरातील २५३ वस्तींमधील ६१९२९ मागणी अर्ज प्राप्त झाले. प्राप्त मागणी अर्ज, प्रभागनिहाय वस्तीचे सिमांकन, वस्तीची जागा मालकी, मंजुर विकास आराखड्यानुसार वस्तीचे जमिनीवरील आरक्षण, जमिनीची किंमत व मागणी अर्जानुसार नागरिकांनी दिलेल्या घटनाबाबतचा पर्याय आदींबाबत तयार करण्यात आलेल्या सर्वांसाठी घरे कृती आराखड्याची माहिती नगरसेवकांना गुरुवारी सभेत देण्यात आली. यावेळी नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांवर उत्तर देताना प्रशासनाची व सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांची चांगलीच अडचण झाली. शिवसेना वसाहतमध्ये घरकुल योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. येथे १२४१ घरकुलांचा डीपीआर तयार करण्यात आला होता. त्यापैकी ६८५ घरकुलांच्या जागेचे मोजमाप करण्यात आले. त्यापैकी ३१० घरकुले मंजुर झाली आहेत. त्यापैकी वर्षभरात केवळ पाच घरांचे काम पूर्ण झाले आहे. २१ घरकुलांकरिता तिसरा टप्प्याचा निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती कार्यकारी अभिंयत्यांनी दिली.

घरकुल योजनेतील अडचणी
० घरकुलासाठी ३२२ चाैरस फुट बांधकामाची अट.
० घरकुल बांधताना मागे आणि पुढे प्रत्येकी तीन फुट जागा सोडणे बंधनकारक.
० लाभार्थींनी जागा सोडण्यास दिलेला नकार.
० घरकुलावरून जाणाऱ्या विद्युत वाहिनी.
० मनपा प्रशासनाकडून नकाशे मंजूर करण्यास होत असलेला विलंब.
० घरकुलासाठी बँकांकडून कर्ज देण्यास नकार.

खासगी भागिदारीतून उभारणार घरकुलं
महापालिकेच्या मालिकेच्या ३५जागांवर घरकुली योजना राबविण्यात येणार आहे. मात्र, प्रत्यक्षात २५३ वस्तींतील नागरिकांसाठी घरकुल बांधावयाचे आहे. त्यासाठी लागणाऱ्या जागा खासगी मालकांकडून घेण्यात येणार आहे. खासगी भागिदारीतून घरकुलांचे बांधकाम करून त्याचा लाभ नागरिकांना देण्यात येईल.

२१० चाै. फु. जागेची परवानगी मागितली
घरकुल उभारण्यासाठी ३२२ चाै.फु. चटई क्षेत्रही मिळत नसल्याने २१० चाै. फु. जागेत घरकुल उभारण्यासाठी परवानगी देण्यात यावी, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यामुळे घरकुल बांधकामाचा खर्चही कमी होण्यास मदत होईल. याशिवाय पहिला हप्ता सुरुवातीलाच देणे, जागा सोडण्यापासून सुट मिळावी, यापूर्वी लाभ घेतलेल्या पण मोळकळीस आलेल्या घरांच्या जागी पुन्हा लाभ मिळणे आदी विषयांबाबत केंद्र व राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती महापाैर विजय अग्रवाल यांनी सभागृहात ठराव मंजूर करताना दिली.

कोण काय म्हणाले?
घरकुल योजनेसाठी कोणतीही अडचण येणार नाही. फाईल सादर झाल्यानंतर नवव्या दिवशी लाभर्थ्यांना त्यांचे पैस मिळतील. शासनाकडे पाठपुरावा करू.
- विजय अग्रवाल, महापाैर.

घरकुलाची कामे वर्षभरापासून सुरू आहेत. मात्र काम अर्धवट आहेत. त्याची जबाबदारी कुणाची?
- सतिश ढगे, नगरसेवक, भाजप

घरकुल योजनेत महिलांना लाभ मिळतो. त्यामुळे ही योजना तत्काळ मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करावे. सर्वांनी सहकार्य करावे.
- सुमनताई गावंडे, माजी महापाैर

घरकुल योजना राबविताता संपूर्ण शहरात एकाचवेळी राबविण्यात यावी. घरकुल योजनेत लाभ देताना भेदभाव होता कामा नये.
-राजेश मिश्रा, गटनेते, शिवसेना

घरकुल योजनेतील सर्व चारही टप्प्यातील लाभार्थींना लाभ देण्याबाबत प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात.
- हरीश काळे, नगरसेवक भाजप.

घरकुल योजना राबविताना त्या-त्या प्रभागातील नगरसेवकांना विचारात घेवून सर्व्हे करण्यात यावे.
- सुजात अहिर, नगरसेविका, भाजप.

घरकुल योजनेबाबत शासनाच्या सर्व निकषांचे पालन झालेले नसल्यामुळे अडचणी येत आहे. शासनाने दिलेल्या निकषांनुसार काम करताना कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी.
- साजिद खान पठाण, विरोधी पक्ष नेते.

घरकुल बांधण्याबाबत १९४ लाेकांनी घरे न बांधण्याबाबत पत्र दिले आहे. त्यांच्याबाबत शासना कोणता निर्णय घेणार आहे.
- गजानन चव्हाण, नगरसेवक, शिवसेना

शिवसेना वसाहतीतील घरकुलांच्या कामांची गती संथ आहे. कामाचा वेग वाढविण्याची गरज आहे.
- सपना नवले, नगरसेविका

आधी घर पाडण्यास सांगितले. २० ते २५ हजार रुपये खर्च करून व मनपाकडून मिळालेल्या शाैचालय योजनेचा लाभ घेणाऱ्या नगारिकांचे शाैचालय पाडण्यात आले आणि आता त्यांना घरकुलासाठी अपात्र असल्याचे सांगण्यात आले आहे.
- अमोल गोेगे, नगरसेवक

इराणी झोपडपट्टीतील नागरिकांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी प्रशासनाकडून प्रस्ताव तयार करण्यात यावा.
- अजय शर्मा, नगरसेवक भाजप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com