५ व्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची सर्वत्र चर्चा!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

विद्यार्थ्यांसाठी असलेले हे बालकुमार साहित्य संमेलन आणि आपण विद्यार्थीदशेला आयुष्यातील पेरणीचा मोसम जर म्हटले तर साहित्याच्या संदर्भाने चांगल्या विचारांची पेरणी विद्यार्थी मन व बुद्धीच्या जमिनीत या निमित्ताने निश्चितपणे होऊन ज्ञान, मूल्ये आणि कौशल्यांची ‘तिफन’ दमदारपणे या संमेलनात चालेल आणि मुलांना चौफेर आनंदासाठी साहित्यानंदाची उभारणी करणारे हे संमेलन ठरेल

अकोला - विदर्भ साहित्य संघाचे ५ वे बालकुमार साहित्य संमेलन दि.१ व २ डिसेंबर रोजी साने गुरुजी साहित्य नगरी, प्रभात किड्स स्कूल परिसर, वाशीम रोड, अकोला येथे संपन्न होत आहे. 

या साहित्य संमेलनाचे साजेशे बोधचिन्ह दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या रंगीबेरंगी या सदरचे स्तंभ लेखक तसेच सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार गजानन घोंगडे यांनी उत्कृष्ट कॅलिग्रॉफीच्या आधारे जुन्याकाळातील शाळेत उपयोगात येणारी पाटी व त्यावर ‘५ वे बालकुमार साहित्य संमेलन’ असे लिहीलेली अक्षरं, छोटी मुलं आणि पुस्तक असे त्याचे एकंदरीत स्वरुप आहे. 

जुन्या काळी प्राथमिक शिक्षणात पाटी फार महत्वाची होती. ‘शाळा सुटली, पाटी फुटली आई मला भूक लागली’अशा आशयाच्या कवितेच्या ओळी प्रसिद्ध होत्या. आज मात्र मोबाईल आणि व्हॉटसअ‍ॅपच्या अधिन गेलेल्या पिढीला कदाचित पाटीचा गंधही नसेल. मात्र पारंपारिकता आणि नवता याचा सुयोग्य मेळ घालणा-या ५ व्या बालकुमार साहित्य संमेलनाचे बोधचिन्हकार गजानन घोंगडे म्हणतात, ‘कुठलीही कलाकृती ही शैलेंद्रच्या गाण्यांसारखी सहज-सोपी, कुणालाही गुणगुणता येणारी, परंतु अर्थपूर्ण असावी’ या त्यांच्या वडीलांच्या शिकवणीला अनुसरून असे सोपे संमेलनाचे बोधचिन्ह साकारले आहे. 

५ व्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाविषयी अधिक माहिती देताना संमेलन सरचिटणीस प्रा.डॉ.सुहास उगले म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांसाठी असलेले हे बालकुमार साहित्य संमेलन आणि आपण विद्यार्थीदशेला आयुष्यातील पेरणीचा मोसम जर म्हटले तर साहित्याच्या संदर्भाने चांगल्या विचारांची पेरणी विद्यार्थी मन व बुद्धीच्या जमिनीत या निमित्ताने निश्चितपणे होऊन ज्ञान, मूल्ये आणि कौशल्यांची ‘तिफन’ दमदारपणे या संमेलनात चालेल आणि मुलांना चौफेर आनंदासाठी साहित्यानंदाची उभारणी करणारे हे संमेलन ठरेल'.

Web Title: vidarbha news: literature