राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडला स्पिरीटचा टँकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

मुंबई व अकोला विभागाच्या पथकाने ११ हजार लिटर स्पिरीट पकडले असून, दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू असून, हे मोठे रॅकेट असल्याची शक्यता आहे. हा टँकर कोठे जात होता, याची अद्याप माहिती मिळाली नाही.
- राजेश कावरे, अधीक्षक, राज्य उत्पादन विभाग

अकोला : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई व अकोल्यातील अधिकाऱ्यांच्या पथकाने मूर्तिजापूर जवळ एका धाब्यावरून ११ हजार बल्स लिटर रेकटीफाईड आरएस स्पिरीटने भरलेला टँकर रात्री पकडला. या स्पिरीटची किंमत १३ लाख ८० हजार रुपये असल्याचे सांगितले आहे. हा टँकर नेमका आला कोठूण? यासंदर्भात कोणतीच माहिती अधिकाऱ्यांना मिळाली नाही.

मुंबईचे भरारी पथक आणि अकोला विभागाच्या अधिकाऱ्यांनी मूर्तिजापूरजवळील धाब्यावर उभ्या असलेल्या टँकर क्र. केए - ०१ - बी - ६२८१ च्या चालकांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली. तसेच त्या टँकरचीही तपासणी केली असता टँकरच्या एका रकान्यामध्ये गोडे तेल आढळले. तर उर्वरित दोन रकान्यामध्ये स्पिरीट भरलेले असल्याचे अधिकाऱ्यांना दिसले. त्यांनी टँकरचा चालक पिन्नर पेरूमल तेलवम व सत्तार अब्दुल रहीम या दोघांना ताब्यात घेतले. त्याची किंमत १३ लाख ८० रुपये असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त डॉ. अश्‍विनी जोशी यांच्या नेतृत्वात व राज्य उपसंचालक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई अकोला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राजेश कावळे व भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक अशोक तारू, अकोला दुय्यम निरीक्षक आनंद काळे, गौतम खंडागळे, संजय वाडेकर, संजय केरे, विकास सावंत यांच्या पथकाने केली.
हे स्पिरीट दारू बनविण्यासाठी वापरण्यात येते. या स्पिरीटपासून ८० लाखांची दारू बनविण्यात आली असती असे पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, हा टँकर आला कुठन आणि कुठे जाणार आहे, याची माहिती कळू शकली नसली तरी पथकाकडून त्याचा तपास सुरू आहे. तसेच या टँकरचा मालक आणि स्पिरीटच्या मालकाचा शोधही घेण्यात येत आहे. स्पिरीट अफरातफरीच्या मागे आंतरराष्ट्रीय टोळी असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

चालक व क्लिनर तामिळनाडू राज्यातील
चालक आणि क्लिनर हे दोघेही तामिळनाडू राज्यातील आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत संभाषण करताना उत्पादन शुल्क विभागाला त्यांच्याशी संवाद साधताना फारच अडचणी गेल्यात. परिणामी, त्यांच्याकडून अधिक माहिती मिळू शकली नाही. तामिळ भाषेचा संभाषण करणाऱ्या व्यक्तीचा शोध राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून घेण्यात येत असून, त्यानंतरच या प्रकरणावरून पूर्ण पडदा उघडणार आहे.

याआधीही झाली होती कारवाई
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबईच्या पथकाने यापूर्वी २०१५ मध्ये स्पिरिटचा ट्रक पकडला होता. आठ हजार लिटर स्पिरीट जप्त करण्यात आले होते. या स्पिरीटची किंमत नऊ लाख रुपये होती. दरम्यान, या कारवाईमुळे येथील बड्या दारू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले होते. त्यासोबतच त्यांचे नावही या कारवाईशी जुळल्या गेल्याची माहिती आहे.

स्पिरीट लपविण्याची पद्धतही विशेष
टँकरमध्ये तीन कप्पे होते. त्यातील दोन कप्प्यामध्ये काळे तेल होते. त्याच्या बाजूनेच एका कप्पा होता. त्या कप्प्यात पांढरी नळी टाकल्यास त्यातून स्पिरीट येत होते. त्याच्याशिवाय कोणतीही वस्तू टाकल्यास फक्त तेलच येत होते. पथकाला ही पद्धत माहिती असल्याने त्यांची ही कारवाई यशस्वी झाली. दरम्यान, मोठ्या कप्प्यात एक हजार लिटर तेल आणि त्याला लागून असलेल्या कप्प्यात स्पिरीट होते. या टँकरची क्षमताच १२ हजार लिटर असल्याने ११ हजार स्पिरीट असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आनंद काळे यांनी सांगितले.

मुंबई व अकोला विभागाच्या पथकाने ११ हजार लिटर स्पिरीट पकडले असून, दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू असून, हे मोठे रॅकेट असल्याची शक्यता आहे. हा टँकर कोठे जात होता, याची अद्याप माहिती मिळाली नाही.
- राजेश कावरे, अधीक्षक, राज्य उत्पादन विभाग

Web Title: vidarbha news: maharashtra police