घोडं मेलं भारानं अन्‌ आमदार मेला कामानं

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

नागपूर : आमदारांना मतदारसंघातील नागरिक वीज, पाणी रस्ते, रेल्वेसह अगदी जिल्हा परिषदेतील छोटेछोटे प्रश्‍न सांगत असतात. कारण कामे करणाऱ्या आमदारांकडूनच त्यांना अपेक्षा असतात आणि ते एका दृष्टीने बरोबरही आहे. त्यामुळे सध्या माझी स्थिती ‘घोडं मेलं भारानं अन्‌ आमदार मेला कामानं’ अशीच काहीशी झाली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये मतदारसंघातील अनेक विकासकामे केली आणि बरीच शिल्लकही आहेत. येत्या दोन वर्षांत राहिलेली सर्व कामे पूर्ण करण्याचा निर्धार धामणगाव रेल्वेचे आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी व्यक्‍त केला.

नागपूर : आमदारांना मतदारसंघातील नागरिक वीज, पाणी रस्ते, रेल्वेसह अगदी जिल्हा परिषदेतील छोटेछोटे प्रश्‍न सांगत असतात. कारण कामे करणाऱ्या आमदारांकडूनच त्यांना अपेक्षा असतात आणि ते एका दृष्टीने बरोबरही आहे. त्यामुळे सध्या माझी स्थिती ‘घोडं मेलं भारानं अन्‌ आमदार मेला कामानं’ अशीच काहीशी झाली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये मतदारसंघातील अनेक विकासकामे केली आणि बरीच शिल्लकही आहेत. येत्या दोन वर्षांत राहिलेली सर्व कामे पूर्ण करण्याचा निर्धार धामणगाव रेल्वेचे आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी व्यक्‍त केला.

राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 'सकाळ'तर्फे राज्यभरात आमदारांचे रिपोर्ट कार्ड बनविण्यात आले होते. आमदारांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा आणि प्रत्यक्ष केलेल्या कामांचा आढावा त्यात घेतला होता. नागपूरमध्ये 'सकाळ'तर्फे स्थानिक आमदारांना रिपोर्ट कार्ड आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. 

आमदार जगताप म्हणाले, धामणगाव मतदारसंघातील अर्थव्यवस्था शेतकरी केंद्रित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कल्याण सध्या माझ्या अजेंड्यावर आहे. मतदारसंघात अप्पर वर्धा, लोअर वर्धा आणि बेंबळासारखे तीन मोठे प्रकल्प आहेत. २२ पैकी सहा प्रकल्प माझ्या मतदारसंघात आहेत. चांदूर आणि नांदगावमध्ये अतिक्रमणाची समस्या आहे. शहर अतिक्रमणमुक्‍त करण्यासाठी तीन मजली इमारती पाडण्याचे धाडस मी केले. धामणगाववासींनी माझ्यावर खूप प्रेम केले. त्यामुळे त्यांचे जोपर्यंत समाधान होत नाही, तोपर्यंत मलाही चैन पडणार नाही.

संत्रा प्रक्रिया प्रकल्पाला प्राधान्य : डॉ. अनिल बोंडे

वरुड-मोर्शी परिसर संत्र्यासाठी जगभर प्रसिद्ध असला तरी, संत्रा प्रक्रियेअभावी शेतकऱ्यांच्या संत्र्याला चांगला भाव मिळत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने संत्रा प्रक्रिया प्रकल्प मंजूर झाला असून, तो येत्या वर्षात पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्धार, मोर्शी-वरुड मतदारसंघाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी व्यक्‍त केला.  ते म्हणाले, आजच्या स्थितीत शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी हवे आहे. वरुड तालुक्‍यातील शेती सुजलाम्‌ सुफलाम्‌ करण्यासाठी २००७ मधील पॅकेजमध्ये सात-आठ प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. कामेही सुरू झालीत. परंतु, कंत्राटदारावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने काम रखडले. मुख्यमंत्री, नितीन गडकरी आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यामुळे काम पुन्हा सुरू झाले. येत्या २०१९ पर्यंत या प्रकल्पातून शेतकऱ्यांना पाणी मिळेल, या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. इतरही रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेसह शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना आहेत. त्यांचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी मी प्रयत्न करीत आहे. 

वणीचा विकास हाच ध्यास : आमदार बोदकुरवार

यापूर्वीच्या आमदारांनी गेल्या २० वर्षांमध्ये विकासकामे केली नाहीत. त्यामुळे मतदारांमध्ये प्रचंड नाराजी होती. त्यामुळे माझ्यासारख्या नवख्या व्यक्‍तीला जनतेने निवडून दिले. निवडणुकीदरम्यान त्यांना दिलेल्या आश्‍वासनांची मला जाणीव आहे. गेल्या तीन वर्षांत काही आश्‍वासने पूर्ण केली, उर्वरित विकासकामे येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्याचा निर्धार, वणी मतदारसंघाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी व्यक्त केला.  बोदकुरवार म्हणाले, वणीत मुख्य समस्या रस्त्यांची आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त  आहेत. नितीन गडकरी आणि हंसराज अहीर यांच्या पुढाकाराने रस्त्यांसाठी २० कोटींचा निधी  मंजूर झाला. त्यातून वणी शहराचा कायापालट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. रस्त्यांसोबतच पिण्याच्या पाण्याचीही मोठी अडचण आहे. तसेच विद्युत प्रकल्पांअभावी लोडशेडिंगची समस्या वाढली होती. गेल्या तीन वर्षांत आठ नवीन प्रकल्प आणले. शहरात ब्रिटिशकालीन पाइपलाइन आहे. ती बदलवून नवीन पाइपलाइन टाकण्यासाठी १५ कोटी मंजूर झाले. येत्या एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. अजूनही बराच टप्पा गाठायचा आहे. जोपर्यंत जनतेचे पूर्ण समाधान होत नाही, तोपर्यंत मलाही चैन पडणार नाही.

‘सकाळ’च्या रिपोर्ट कार्डमुळे दिशा मिळाली :आमदार बुंदिले 

दैनिक ‘सकाळ’ने विविध आमदारांच्या कामगिरीवर आधारित प्रसिद्ध केलेले रिपोर्ट कार्ड परिसरातील समस्यांची जाणीव करून देणारे असून, त्यामुळे समस्या सोडविण्याला मदत होते. शिवाय आमदारांची विकासकामे जनतेपर्यंत पोहोचते, असे मत दर्यापूरचे आमदार  रमेश बुंदिले यांनी व्यक्‍त करून पुढील दोन वर्षांत परिसराचा विकास, हा मुख्य अजेंडा बोलून दाखविला. मतदारसंघातील प्रश्‍न अनेक आहेत. लोकांच्या माझ्याकडून अपेक्षाही खूप आहेत. काही समस्या मार्गी लावल्या, काही अजूनही बाकी आहेत. अचलपूर आणि चांदूरबाजार या २५ किमी रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरण करणे, ही सद्यस्थितीत मोठी समस्या आहे. याशिवाय गाडगेबाबांचे जन्मगाव असलेल्या शेंडगावचा विकास करणे गरजेचे आहे. त्यासाठी ५० कोटींची मागणी केली असून, २५ कोटी मंजूर झाले आहेत. अंजनगावचे क्रीडासंकुल, शहानूर नदीवर मोठा पूल, २२० केव्ही विहीगाव सबस्टेशन, ट्रान्सफॉर्मर बदलविणे आणि शेतीला पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करणे आदी अनेक कामे येत्या दोन वर्षांत करावयाची आहेत.

विकासकामाची गाडी रुळावर आणली : डॉ. सुनील देशमुख

मधल्या काळात अमरावती शहराच्या विकासाची गाडी काहीशी घसरलेली  होती. मात्र, गेल्या तीन वर्षांमध्ये विकासकामांच्या धडाक्‍यामुळे गाडी रुळावर आली, याचा  मनस्वी आनंद आहे. उरलेली कामे येत्या दोन वर्षांत पूर्ण करून अमरावती शहराचा कायापालट करण्याचा मनोदय अमरावतीचे आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी व्यक्‍त केला. राज्यातील प्रमुख मुख्यालयांपैकी एक असलेल्या अमरावती शहरात भुयारी गटाराची प्रमुख  समस्या आहे. १९९७ मध्ये याला मान्यता मिळाली होती. परंतु, २० वर्षांत काहीच झाले नाही. नागपूरप्रमाणे अमरावती शहरातही काँक्रीटचे रस्ते तयार करण्याला प्राधान्य दिले जात आहे. अमरावतीची आरोग्यसेवा सुधारण्यावरही जोर दिला जात आहे. त्यासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या दुसऱ्या फेजचे काम लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासोबतच कॅंसर रुग्णालयालाही प्राधान्य देण्यात येत आहे.  तीन महिन्यांत ८० टक्‍के मनपा शाळा डिजिटल करण्यात आल्या . निवडणुकीपूर्वी राहिलेली सर्व कामे पूर्ण करून जनतेच्या विश्‍वासाला पात्र ठरण्याचा माझा प्रयत्न आहे.

विकासकामांवर पूर्णत: समाधानी नाही : समीर मेघे 

गेल्या तीन वर्षांमध्ये मतदारसंघात अनेक विकासकामे केली. मात्र, त्यावर मी पूर्णत: समाधानी नाही. सुधारणेसाठी नेहमीच वाव असतो. पुढील दोन वर्षांत राहिलेली कामे पूर्ण करण्यावर मुख्यत्वे भर राहणार असल्याचे, हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांनी सांगितले. ते म्हणाले, माझ्या मतदारसंघात शहर आणि ग्रामीण भागाचा समावेश असून, नागपूर शहराला लागून आहे. २४ वर्षांपासून रखडलेला तुरागोंदी सिंचन प्रकल्प मार्गी लागला असून, येत्या वर्षभरात पाइपलाइन व इतर कामे पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. वाडी व बुटीबोरीसारख्या इंडस्ट्रीयल भागांतील पाणीपुरवठा योजनेला प्राधान्य देतानाच दत्तक घेतलेल्या अडेगावचा विकासालाही महत्त्व दिले जात आहे. अडेगाव बोर अभयारण्याला लागून असल्यामुळे मोबाईल कनेक्‍टिव्हिटी नव्हती. टॉवर उभारण्यात आल्याने मोठी अडचण दूर झाली. विशेषत: येथील पर्यटनाला मोठा हातभार लागणार आहे.

(शब्दांकन - नरेंद्र चोरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidarbha News Nagpur News Nagpur MLAs Sakal felicitation