विदर्भ निर्माण महामंच स्वतंत्र लढणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

महामंचचे उमेदवार उभे असल्याने भाजप व काँग्रेस दोघांना धडकी भरली आहे. त्यामुळे दोघांकडून एक-दुसऱ्याला हरविण्यासाठी उमेदवार उभे करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. आम्हाला कुणाला हरवायचे किंवा जिंकवायचे नाही. फक्त विदर्भ राज्य पाहिजे. सत्ता मिळविल्याशिवाय विदर्भ मिळणार नाही. विदर्भाचे राजकारण करावे लागेल. त्यासाठी निवडणूक लढवावी लागेल.
-ॲड. श्रीहरी अणे

नागपूर - राज्यात व केंद्रात सरकार कुणाचेही आले तरी विदर्भ राज्य दिले जात नाही. यामुळे विदर्भवादी पक्ष आणि संघटनांनी एकत्रित येऊन ‘विदर्भ निर्माण महामंच’ची स्थापन केली आहे. महामंचने पहिल्याच सभेत लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा संकल्प केला आहे.

सभेला दिल्लीचे समाजकल्याणमंत्री ॲड. राजेंद्रपाल गौतम, विदर्भ राज्य आघाडीचे ॲड. श्रीहरी अणे, ब्रिगेडीयर सुधीर सावंत, ॲड. वामनराव चटप, राजकुमार तिरपुडे, ॲड. सुरेश माने, राजेश काकडे, राम नेवले, उपेंद्र शेंडे, सुनील चोखारे, ज्वाला धोटे, ॲड. स्वप्नील सन्याल, जयंत कोंबाडे, डॉ. नीरज खांदेवाले आदी उपस्थित होते. भाजप व काँग्रेसने विदर्भाच्या मागणीवर भुलथापा देऊन मते घेतली. शेतकऱ्यांना शेतमालाचा भाव मिळत नसून त्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत असे राजेंद्रपाल गौतम म्‍हणाले.

वेगळा विदर्भ ही स्वातंत्र्याची लढाई आहे.  फसवणूक करणाऱ्या नेत्यांना मतपेटीतून टक्कर देण्याची गरज आहे, असे वामनराव चटप म्हणाले. आजपर्यंत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी विदर्भाच्या मुद्द्याचे राजकारण केले. पहिल्यांदा विदर्भ निर्माण महामंचाच्या माध्यमातून निवडणुका लढविण्याचा झालेला निर्णय हा वेगळ्या विदर्भासाठी चांगले संकेत आहे, असे ॲड. सुरेश माने म्हणाले. 

मोदी सरकारने देशाला फसवण्याचे काम केले आहे. देशाला वाचवण्यासाठी भाजपला सत्तेवरून हटवून शेतकरी व शेतमजुरांचे सरकार स्थापन करण्याची गरज आहे, असे ब्रिगेडीयर सुधीर सावंत म्हणाले. वेगळ्या विदर्भासाठी रास्ता रोको करून राज्याचे व्यवहार थांबविण्याची गरज आहे, असे राजेश काकडे म्हणाले. 

महामंचचे उमेदवार उभे असल्याने भाजप व काँग्रेस दोघांना धडकी भरली आहे. त्यामुळे दोघांकडून एक-दुसऱ्याला हरविण्यासाठी उमेदवार उभे करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. आम्हाला कुणाला हरवायचे किंवा जिंकवायचे नाही. फक्त विदर्भ राज्य पाहिजे. सत्ता मिळविल्याशिवाय विदर्भ मिळणार नाही. विदर्भाचे राजकारण करावे लागेल. त्यासाठी निवडणूक लढवावी लागेल.
-ॲड. श्रीहरी अणे

Web Title: vidarbha nirman mahamanch Separate fight in election