विदर्भात पावसाचे पाच बळी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

नागपूर : गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे आज, मंगळवारी पहाटे भंडारा जिल्ह्यातील राजेदहेगाव येथे घर कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. याच जिल्ह्यातील कोंढी येथील नाल्याच्या काठावरील पूर्ण वस्ती पाण्यात बुडाली. नागपूर शहरात व जिल्ह्यातही दोघे पुरात वाहून गेले.

नागपूर : गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे आज, मंगळवारी पहाटे भंडारा जिल्ह्यातील राजेदहेगाव येथे घर कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. याच जिल्ह्यातील कोंढी येथील नाल्याच्या काठावरील पूर्ण वस्ती पाण्यात बुडाली. नागपूर शहरात व जिल्ह्यातही दोघे पुरात वाहून गेले.
सुकरू दामाजी खंडाते (32) कुटुंबासह राजेदहेगाव (जि. भंडारा) येथे पाच वर्षांपासून माजी पोलिस पाटील मधुकर ढोबळे यांच्याकडे सालगडी होते. गावातीलच नारायण ढोबळे यांच्याकडे ते भाड्याने राहत होते. सोमवारी (ता.20) रात्री सुकरू खंडाते (32), पत्नी सारिका (28) व मुलगी सुकन्या (वय तीन) खोलीत झोपले असता आज पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास त्यांच्या अंगावर घराची भिंत व छत कोसळून तिघांचाही जागीच मृत्यू झाला. रात्रभर पाऊस येत असल्याने गावकऱ्यांना घटनेची माहिती नव्हती. सकाळी घर कोसळलेले दिसताच गावकरी धावले. मात्र, तिघांचाही मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढले. खंडाते कुटुंब मूळचे नागपूर जिल्ह्यातील निलज खंडाळा (ता. पारशिवनी) येथील रहिवासी आहेत. घर कोसळून मृत्युमुखी पडलेल्या सुकरू खंडाते यांची मोठी मुलगी रागिणी (वय सहा) ही मौदा तालुक्‍यातील कोटगाव येथे आजोबा दिगांबर मारबते यांच्याकडे शिक्षणासाठी राहत होती. त्यामुळे ती या घटनेतून बचावली.
भंडारा जिल्ह्यातच कोंढी गावाजवळील नाल्याला आलेल्या पुराने नवीन वस्तीतील घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाच्या जिल्हा शोध व बचाव पथकाने 16 कुटुंबांसह 15 जनावरांना सुरक्षितस्थळी हलविले. जिल्ह्यात आज सकाळपर्यंत सरासरी 113 मिलिमीटर पाऊस झाला. अड्याळजवळ भिंत पडून एकजण जखमी झाला, तर पाचगाव येथे गोठ्यात पाणी शिरल्याने नऊ जनावरे दगावली.
आमडी नाल्याला पूर
नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्‍यात आमडी नाल्याला आलेल्या पूर पहायला गेलेला कामगार सुरेश सदाशिव सातपैसे (42, रा. पारशिवनी) पुरात वाहून गेला. नागपूर शहरातून वाहत असलेल्या पिवळ्या नदीतही एक मुलगा वाहून गेला. रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे पिवळ्या नदीला पूर आला. त्यात उत्तर नागपुरातील वनदेवीनगर परिसरात आठ वर्षांचा अदनान कुरेशी वाहून गेला. अदनान गरीब नवाज नगरातील रहिवासी असून खेळण्यासाठी तो वनदेवी परिसरात आला होता. रात्री उशिरापर्यंत त्याचा मृतदेह सापडला नव्हता.

Web Title: vidarbha rain news