सफर विदर्भाची : गोंदिया जिल्ह्यातील इंग्रजकालीन हाजराफॉल बघितला का? 

राहुल हटवार
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

इंग्रजांच्या काळात नागपूर हे मध्य भारताचे महत्त्वपूर्ण रेल्वे मार्गावरील स्थानक होते. मात्र, पूर्वेस जाण्यासाठी रस्तेमार्ग लांब पल्ल्याचा असल्याने नागपूर ते बंगाल अशा लोहमार्गाची नितांत आवश्‍यकता होती. त्यासाठी गोंदिया-राजनांदगाव शहरांना जोडून रेल्वेमार्ग तयार करण्याचे ठरले. 1878 साली यावर काम सुरू झाले. त्यापैकी 150 किलोमीटर अंतराचे नागपूर-राजनांदगाव लोहमार्ग 1882 साली पूर्ण झाले. त्यादरम्यान रायपूरला जाण्याशिवाय पर्याय नाही, असे लक्षात येताच दरेकसा पास म्हणजे मायकल पर्वतरांगांच्या भागातून (आताच्या दरेकसा गावाजवळ) सुरूंग लावून बोगदा तयार करण्याचे ठरले. हे काम सुरू असताना एका ब्लास्टमुळे तिथूनच वाहत असणारा नाल्याचा प्रवाह आपली वाट बदलून वेगळ्याच दिशेने वाहू लागला.

सालेकसा (गोंदिया) : सध्या दिवाळीचा हंगाम सुरू आहे. सर्वांनी फराळाचा मनमुराद आनंद घेतला असेलच. शाळा, महाविद्यालयांना देखील सुट्या आहेत. त्यामुळे कौटुंबिक सहल किंवा पर्यटनाचा बेत नाही झाला तरच नवल. तुम्ही जर पर्यटनाचा बेत आखत असाल तर विदर्भाच्या पूर्व भागात असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील हाजराफॉलला नक्की भेट द्या. 

गोंदियापासून 57 किलोमीटर अंतरावरील सालेकसा तालुक्‍यात हाजराफॉल हा इंग्रजकालीन धबधबा आहे. या धबधब्याचे सौंदर्य टिपण्यासाठी किंबहुना डोळ्यात साठवण्यासाठी जिल्हाच नव्हे, बाहेरील जिल्ह्यातील पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देत असतात. पावसाळ्याच्या दिवसांत धबधबास्थळी पर्यटकांची मोठी गर्दी असते. आदिवासीबहुल, नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील सालेकसा तालुक्‍याच्या वैभवात भर पाडणारा हा धबधबा, अशी ओळख आता झाली आहे. 

 


पाण्याचा जुना मार्ग

इंग्रजांच्या काळात नागपूर हे मध्य भारताचे महत्त्वपूर्ण रेल्वे मार्गावरील स्थानक होते. मात्र, पूर्वेस जाण्यासाठी रस्तेमार्ग लांब पल्ल्याचा असल्याने नागपूर ते बंगाल अशा लोहमार्गाची नितांत आवश्‍यकता होती. त्यासाठी गोंदिया-राजनांदगाव शहरांना जोडून रेल्वेमार्ग तयार करण्याचे ठरले. 1878 साली यावर काम सुरू झाले. त्यापैकी 150 किलोमीटर अंतराचे नागपूर-राजनांदगाव लोहमार्ग 1882 साली पूर्ण झाले. त्यादरम्यान रायपूरला जाण्याशिवाय पर्याय नाही, असे लक्षात येताच दरेकसा पास म्हणजे मायकल पर्वतरांगांच्या भागातून (आताच्या दरेकसा गावाजवळ) सुरूंग लावून बोगदा तयार करण्याचे ठरले. हे काम सुरू असताना एका ब्लास्टमुळे तिथूनच वाहत असणारा नाल्याचा प्रवाह आपली वाट बदलून वेगळ्याच दिशेने वाहू लागला. यातून एक सुंदर धबधबा निर्माण झाला. त्यालाच आज हाजराफॉल या नावाने ओळखले जाते. 

हा धबधबा प्रयत्नपूर्वक पाण्याच्या सोयीसाठी तयार केला गेला असावा, असाही काही जाणकारांचा अंदाज आहे. त्याचे काही पुरावे देखील आसपासच्या परिसरात बघायला मिळतात. हाजराफॉलच्या वरच्या बाजूला एका शिलालेखाच्या आधारे हे स्पष्ट होते की, या धबधब्याची निर्मिती इंग्रजकालीन असून, ज्या वेळी बोगद्याची निर्मिती झाली त्याच काळातील आहे. म्हणजे 1872 ते 1882 च्या दरम्यान धबधब्याची निर्मिती झाली असावी, असे समजते. इंग्रजांच्या फौजेतील एक तुकडी म्हणजे बी.एन.आर. रायफल्स आणि डरहॅम लाईट इन्फन्ट्रीच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे अधिकाऱ्यांना सुरक्षा देण्याचे काम सोपवण्यात आले होते. त्यांनीच या धबधब्याची निर्मिती केल्याचे शिळेतून कळते. याच धबधब्याच्या पायथ्याशी पक्‍क्‍या विटांचे, जुन्या घरांचे आणि लोकवस्तीचे अवशेषसुद्धा सापडतात. त्यावरून इंग्रज अधिकारी बोगद्याच्या बांधकामाकरिता पायथ्याशी वास्तव्यास होते, असे समजते. 

सालेकसा तालुक्‍याचा संपूर्ण परिसर जंगलांनी व्यापलेला आहे. आदिवासीबहुल लोक या तालुक्‍यात मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. नक्षललदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. अशा या तालुक्‍याला हाजराफॉल धबधब्यामुळे एक वेगळी ओळख मिळाली आहे. पर्यटनासाठी उत्कृष्ट ठिकाण तयार झाले आहे. तिन्ही ऋतूंमध्ये येथे पर्यकांची रेलचेल असतेच. मात्र, पावसाळ्यात धबधब्याचे विहंगम दृश्‍य पाहण्यासाठी, ते कॅमेराबद्ध करण्यासाठी किंबहुना डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते. 

नजिकचे रेल्वेस्थानक : दरेकसा : 3 किलोमीटर (पूर्वेस) 
नजिकचे एक्‍सप्रेस रेल्वेस्थानक : 9 किलोमीटर सालेकसा (पश्‍चिमेस) 
जिल्हा ठिकाण : गोंदिया : 57 किलोमीटर 
विमानतळ : बिरसी कामठा : 45 किलोमीटर 
बसस्थानक : नवाटोला 3 किलोमीटर 

कसे जावे? 
पर्यटकांना गोंदिया येथून हॉजराफालला जायचे असल्यास त्यांनी गोंदिया-डोंगरगड या बसने जावे. सालेकसा तालुक्‍यातल्या नवाटोला येथे उतरावे, तिथून दोन किलोमीटर उजवीकडे पायी जावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidarbha tourist place hazarafall