महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात विदर्भाचे वजन वाढले, या मंत्र्यांचा झाला समावेश 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 December 2019

मंत्र्यांशिवायच नागपुरातील हिवाळी अधिवेशन पार पडले. अधिवेशन काळातच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे बोलले जात होते. मात्र, तसे काहीही झाले नाही. नंतर डिसेंबरच्या शेवटची शेवटी विस्तार होईल असे बोलले गेले. त्यानुसार सोमवारी दुपारी एक वाजता महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला.

नागपूर : दीर्घ प्रतीक्षेनंतर महविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर सोमवारी (ता. 30) झाला. राज्याच्या मंत्रिमडळात विदर्भातील आठ नेत्यांना स्थान मिळाले आहे. यात सर्वाधिक चार कॉंग्रेसचे, एक शिवसेनेचा दोन राष्ट्रवादी कॉंग्रेस तर प्रहार जनशक्‍ती पार्टीच्या एका नेत्याचा समावेश आहे. या आठ नेत्यांच्या रूपात विदर्भाला सात कॅबिनेट व एक राज्यमंत्री पद मिळाले आहे. यामुळे विदर्भाचे पारडे जाड झाले आहे. 

हेही वाचा - विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेता ते कॅबिनेट मंत्री

नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. यासाठी जवजवळ एक ते दीड महिन्यांचा कार्यकाळ लागला. सरकार स्थापन झाल्यांतनर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह निवडक मंत्र्यांनी शपथ घेतली होती. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार असा प्रश्‍न सर्वसामान्यांसह विरोधी पक्ष सातत्याने विचारत होता. 

क्लिक करा - अमरावतीचा आंदोलक नेता 'अपना भिडू बच्चू कडू'

मंत्र्यांशिवायच नागपुरातील हिवाळी अधिवेशन पार पडले. अधिवेशन काळातच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे बोलले जात होते. मात्र, तसे काहीही झाले नाही. नंतर डिसेंबरच्या शेवटची शेवटी विस्तार होईल असे बोलले गेले. त्यानुसार सोमवारी दुपारी एक वाजता महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मंत्रिमंडळ विस्तारात अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे, सुनील केदार, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, संजय राठोड व बच्चू कडू यांनी शपथ घेतली. पूर्वीच नितीन राऊत यांनी शपथ घेतली होती. नेत्यांचा परिचय पुढील प्रमाणे... 

 

अनिल देशमुख (कॅबिनेट मंत्री, काटोल)

अनिल देशमुख महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठे नाव आहे. ते शेतकरी, शेतमजूर, दलित, बहुजन, सर्वसामान्यांचा लोकनेता. नरखेड पंचायत समितीचे सभापती ते राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषविलेल्या अनिल देशमुखांचा गत 27 वर्षांचा प्रवास अतुलनीय आणि गौरवशाली असाच आहे. राजकारणात पद गेल्यानंतर साधारणत: काही लोक माघारी फिरतात. मात्र, 2014 ची विधानसभेची निवडणूक अवघ्या काही मतांनी हरल्यानंतर अनिल देशमुख मागे फिरले नाही. उलट ते नव्या उमेदीने उभे राहीले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते जिंकले आणि कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. 

Image may contain: 1 person

विजय वडेट्टीवार (कॅबिनेट मंत्री, चंद्रपूर)

विजय वडेट्टीवार मूळचे शिवसैनिक आहे. काही काळासाठी वडेट्टीवार गडचिरोली जिल्ह्याचे शिवसेना प्रमुख देखील होते. नारायण राणे यांच्या सोबत त्यांनी कॉंग्रेसप्रवेश केला होता. त्यानंतर कॉंग्रेस पक्षात स्वतःचा गट तयार केला. नंतरच्या काळात कॉंग्रेसचे विदर्भस्तरीय नेतृत्व रूपात स्वतःला स्थापित केले. 2014 ते 19 या काळात भाजप विरोधात विदर्भातील बुलंद आवाज म्हणून विजय वडेट्टीवार यांची ख्याती झाली. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी विदर्भातील तिकीट वाटपात मोलाची भूमिका बजावली होती. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातून दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. आता त्यांना उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. 

Image may contain: 1 person, smiling

सुनील केदार (कॅबिनेट मंत्री, सावनेर)

नागपूर जिल्ह्यात सहकाराची मुहुर्तमेढ रोवणारे माजी मंत्री व सहकार महर्षी बाबासाहेब केदार यांचे पुत्र सुनील केदार हे जिल्ह्यातील दंबग नेते म्हणून ओळखले जातात. सर्वसामान्यांसाठी अर्ध्यारात्री मदतीसाठी धावून जाणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. नागपूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड असलेल्या हा नेता जरी कठोर दिसत असला तरी तो मनमिळावू आहे. सावनेर मतदारसंघात फिरताना रत्यावर एकही खड्डा आढळणार नाही याची खबरदारी ते स्वत: जातीने घेतात. सावनेर मतदारसंघातून जाणारे प्रशस्त रस्ते हे त्याचे उदाहरण आहे. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात त्यांनी कॉंग्रेसकडून कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. 

Image may contain: 1 person, smiling, sitting and child

संजय राठोड (कॅबिनेट मंत्री, यवतमाळ)

संजय राठोड मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्‍यातील पहूर (शिवपुरी) येथील रहिवासी. मात्र, त्यांची राजकीय कारकीर्द दारव्हा, दिग्रस व नेर या तालुक्‍यांतच शिवसेनेचा तडफदार कार्यकर्ता म्हणून विस्तारत राहिली आहे. 1990 ते 2000 या काळात यवतमाळ जिल्हा कॉंग्रेसमय होता. ग्रामपंचायत ते लोकसभेत कॉंग्रेसचीच सत्ता होती. या कठीण काळात संजय राठोड यांनी शिवसेनेची बांधणी सुरू केली. 1997मध्ये वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी शिवसेना जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यांवर आली. या संधीचे संजय राठोड यांनी सोने केले. एक शिवसैनिक ते कॅबिनेट मंत्री असा अफलातून राजकीय प्रवास आमदार संजय राठोड यांचा राहिला आहे. 

Image may contain: 1 person, sitting and beard

बच्चू कडू (राज्यमंत्री, अमरावती)

वेगळ्या शैलीतील आंदोलनाने बच्चू कडू यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. चांदूरबाजार तालुक्‍यातील बेलोरा ग्रामपंचायतच्या सदस्यापासून बच्चू कडू यांच्या राजकीय तसेच सार्वजनिक जीवनातील प्रवासाला सुरुवात झाली. 1999 साली लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत उडी घेतली. मात्र, पराभूत झाले. 2004 च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांना परत एकदा पराभवाचे तोंड पाहावे लागले. असे असतानाही 2004 च्या विधानसभा निवडणुकीत अचलपूर मतदारसंघातून त्यांनी चांगलाच जोर लावला अन्‌ नागरिकांनी प्रचंड मतांनी बच्चू कडू यांना निवडून दिले. 2004 पासून तेच अचलपूरचे आमदार आहेत. शेतकऱ्यांसाठी लढणारे बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 

Image may contain: 1 person, smiling, closeup

यशोमती ठाकूर (कॅबिनेट मंत्री, अमरावती)

तिवसा मतदारसंघात गेल्या तीन पंचवार्षिकपासून ऍड. आमदार यशोमती ठाकूर निवडून येत आहेत. त्यांना वडील व माजी आमदार कै. भय्यासाहेब ठाकूर यांच्यापासूनच राजकीय वारसा मिळाला. यशोमती ठाकूर यांना 2004 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला होता. मात्र, त्यानंतर सलग तीनदा त्या विजयी झाल्या. ग्रामीण भागातील जनतेशी सतत संपर्कात राहून यशोमती ठाकूर यांनी वडिलांपासून असलेला राजकीय वारसा सांभाळला आहे. अतिशय अभ्यासू, स्पष्टवक्तया, आपल्या मतदारसंघातील जनतेच्या प्रश्‍नांची जाण असलेल्या, सरकार कोणतेही असले तरी विकास खेचून आणणाऱ्या डॅशिंग आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. 

Image may contain: 1 person

डॉ. राजेंद्र शिंगणे (कॅबिनेट मंत्री, बुलडाणा)

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून 1999 ला जी पहिली विधानसभा निवडणूक झाली होती, तेव्हापासूनच पक्षात सक्रिय कार्यकर्तेच नव्हेतर बुलडाणा जिल्ह्याचे नेतृत्वही ते करीत आहेत. देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा जो राजभवनात शपथविधी झाला होता, त्यातून बाहेर पडून पक्षाध्यक्ष शरद पवार यांना माहिती देणारे डॉ. शिंगणे पहिले होते. पवार यांनीही त्यांना माध्यमांपुढे आणले. यापूर्वी डॉ. शिंगणे यांनी 2001, 2004, 2008 व आता 2019 च्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. 

Image may contain: 1 person, smiling, beard

डॉ. नितीन राऊत (कॅबिनेट मंत्री, नागपूर)

डॉ. नितीन राऊत यांनी एकाचवेळी सामाजिक आणि राजकीय चळवळीच्या कक्षा रुंदावत राजकारणाच्या पटलावार यश मिळवले. 28 नोव्हेंबर रोजी शिवतीर्थावर डॉ. नितीन राऊत योनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. 2014 मध्ये कॉंग्रेसच्या अंतर्गत राजकीय कुरघोडीतून त्यांना उत्तर नागपूर मतदास संघातून अपयश पत्कारावे लागले होते. मात्र, 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळविला. 2019 मध्ये त्यांनी चौथ्यांदा उत्तर नागपूरचे प्रतिनिधीत्व केले. विशेष असे की, 1979 पासून ते कॉंग्रेससोबत आहेत. 

येथून एकही मंत्री नाही

मंत्रिमंडळाच्या विस्तारात विदर्भातील आठ मंत्र्यांना स्थान मिळाले. मात्र, या विस्तारात अकोला, वाशीम, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व वर्धा येथील एकाही आमदाराला जागा मिळाली नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidarbha's weight in the cabinet of Maharashtra increased