ऊर्जामंत्र्यांच्या दारावर विदर्भवाद्यांची धडक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

नागपूर ः विदर्भवाद्यांनी ऊर्जामंत्र्यांच्या निवासस्थानावर धडक देऊन वीजदर निम्मे करा आणि कृषिपंपाचे बिल माफ करण्यासाठी आंदोलन करून जोरदार घोषणा केली. तसेच कोराडी मार्गावर सुमारे तासभर चक्काजाम आंदोलन केले. पोलिसांनी तीस जणांना ताब्यात घेऊन आंदोलकांना हुसकावून लावले.

नागपूर ः विदर्भवाद्यांनी ऊर्जामंत्र्यांच्या निवासस्थानावर धडक देऊन वीजदर निम्मे करा आणि कृषिपंपाचे बिल माफ करण्यासाठी आंदोलन करून जोरदार घोषणा केली. तसेच कोराडी मार्गावर सुमारे तासभर चक्काजाम आंदोलन केले. पोलिसांनी तीस जणांना ताब्यात घेऊन आंदोलकांना हुसकावून लावले.

समितीचे नेते ऍड. वामनराव चटप, मुख्य संयोजक राम नेवले, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, महिला आघाडीच्या प्रमुख रंजना मामर्डे आदींच्या नेतृत्वाखाली संविधान चौकातून दुपारी दोन वाजताच्या सुमारास वीज व विदर्भ मार्चला सुरुवात झाली. दिल्लीत वीज फुकट, महाराष्ट्रात मात्र वीजदर चौपट, विजेच्या दराला आग, कधी येणार महाराष्ट्र सरकारला जाग, वीजदर निम्मे करा, दरवाढ मागे घ्या, अशा घोषणा देत कोराडीच्या दिशने रवाना झाले.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानाआधीच पोलिसांनी अडवल्याने आंदोलनकर्ते आक्रमक झाले.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी चार दिवसांपूर्वीच भेटून निवेदन स्वीकारण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, आज ते गावात नाहीत. वर्धा येथून त्यांनी फोनवर चर्चा केली व एका तासात येतो, असे सांगितले. परंतु, त्यापूर्वीच पोलिसांनी लाठीहल्ला केला. बळजबरीने आंदोलनकर्त्यांना हुसकावून लावले. यात सविता वाघ पडल्याने बेशुद्ध झाल्या होत्या. सहा ते सात महिला व शेतकऱ्यांनादेखील मार लागल्याचा आरोप नेवले यांनी केला.
दरम्यान, अरुण केदार, तुळशीराम कोठेकर, सुदाम राठोड, मुरलीधर ठाकरे, सुनील वडस्कर, राजेंद्र आगरकर यांच्यासह काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन मुख्यालयात नेले. आंदोलनात मधुसूदन हरणे, निळकंठराव घवघवे, प्रफुल्ल शेंडे, ओमप्रकाश तापडिया, निळूभाऊ यावलकर, कृष्णराव भोंगाडे, गुलाबराव धांडे, रजनी शुक्‍ला, विजय मौंदेकर आदी सहभागी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidarbhitans clash at the door of power ministers