लाच घेताना व्हिडिओ व्हायरल ; दोन वाहतूक पोलिस निलंबित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

खामगाव : दुचाकीस्वाराकडून दोन हजार रूपयांची लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर तो व्हिडीओ व बातमी 'ई-सकाळ'ने दाखविली. त्याची दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी आज शहर पोलिस स्टेशनच्या दोन वाहतूक पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली.

खामगाव : दुचाकीस्वाराकडून दोन हजार रूपयांची लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर तो व्हिडीओ व बातमी 'ई-सकाळ'ने दाखविली. त्याची दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी आज शहर पोलिस स्टेशनच्या दोन वाहतूक पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली.

खामगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचारी मार्गारेट हंस व गणेश जाधव अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. दोन दिवसांपासून दोन्ही कर्मचाऱ्यांचा एक व्हिडीवो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यात एका दुचाकीस्वारास दोनशे रूपयांची दंडाची पावती देत त्यांच्याकडून दोन हजार रूपये घेतले जात असल्याचे चित्रिकरण झालेले आहे.

शहर पोलिस स्टेशनमध्येच हा सर्व व्यवहार झालेला असून पोलिस दोन हजार रूपये घेताना स्पष्टपणे व्हिडिओत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याची बातमी व्हिडीवोसह ई सकाळवर प्रसिद्ध झाली. त्याची गंभीर दखल घेतली असून दोन्ही कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी निलंबित केले आहे.

असा आहे प्रकार

खामगाव तालुक्‍यातील आंबेटाकळी येथील आकाश शिवराम धोटे या तरूणाची दुचाकी वाहतूक पोलिसांनी 13 जुलै रोजी पकडून दोनशे रूपयांचा दंड आकारला. मात्र दुचाकी सोडताना त्यांच्याकडून दोन हजार रूपये लाच घेण्यात आली. तरूणाने हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केला. हा व्हिडीवो व्हायरल झाल्याने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.

* दुचाकीस्वाराकडून दोन वाहतूक पोलिस लाच घेत असल्याचा व्हिडीवो व्हायरल झाला होता. त्यानंतर या प्रकरणात संबधितांचे जबाब नोंदवून वरिष्ठांना तसा अहवाल सादर केला होता. दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
 

Web Title: Video viral while taking bribe