रामदास आंबटकर भाजपचे उमेदवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

नागपूर - विधान परिषदेसाठी चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक असलेले तसेच पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उद्या, गुरुवारी सकाळी ११ वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दुसरीकडे उमेदवारी दाखल करायला एकच  दिवस शिल्लक असताना रात्री उशिरापर्यंत काँग्रेसचा उमेदवार ठरला नव्हता. 

सध्या भाजपचे मितेश भांगडिया या मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी पुन्हा निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आंबटकर यांच्यासह अरुण लखानी, सुधीर दिवे यांची नावे चर्चेत आली होती. तोडीसतोड लढत देण्यासाठी भाजप आणि काँग्रेस दोघेही एकामेकांच्या उमेदवाराची प्रतीक्षा करीत होते. मात्र, आज भाजपने सकाळीच आपला उमेदवार जाहीर केला.  एका निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्याने भाजपचे उत्साह संचारला आहे. 

रामदास आंबटकर मूळचे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्‍यातील वडनेर येथील रहिवासी  आहेत. त्यांचे वडील अधिकारी होते. मात्र, संघावर बंदी घातल्याने त्याविरोधात आंदोलन उडी घेतली होती. त्यामुळे त्यांना शासकीय नोकरी गमवावी लागली. तेव्हापासून त्यांनी उर्वरित संपूर्ण आयुष्य संघ कार्यासाठी वाहून घेतले. रामदास आंबटकर हेसुद्धा सुमारे ३५ वर्षांपासून भाजपात कार्यरत आहेत. विद्यार्थी परिषदेपासून त्यांनी कामाला सुरुवात केली. अनेक वर्षे पूर्व विदर्भाचे संघटन सचिव होते. त्यानंतर २००४ ते १५ या काळात भाजपचे संघटन सचिव होते. त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांना भाजपने सरचिटणीस केले. आता त्यांना विधान परिषदेत पाठविण्यात येणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघांनीही आंबटकरांच्या नावाला पसंती दिल्याचे कळते.

उमेदवारी दाखल करण्यास शेवटचा दिवस येऊन ठेपला असला तरी काँग्रेसचा उमेदवार ठरला नव्हता. उमेदवार कोण ठरवणार याचीही कोणाला माहिती नव्हती. खर्च करणाऱ्या उमेदवारांच्या शोधात काँग्रेस असल्याचे समजते. उद्योजक जसू मोटवानी, वर्धा येथील उद्योजक टावरी व गणेश चामट इच्छुकांमध्ये असल्याचे समजते. एकूणच पक्षातील वातावरण व घडामोडी बघता काँग्रेस या निवडणुकीबाबत गंभीर नसल्याचे दिसून येते.

Web Title: Vidhan Parishad Election BJP candidate Ramdas Ambatkar politics