Vidhan Sabha 2019 : मुंबई, पुण्यापेक्षा ‘या’ नक्षलग्रस्त भागात झाले चांगले मतदान

gadchiroli bhamragad voting turnout maharashtra elections
gadchiroli bhamragad voting turnout maharashtra elections

गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या धमकीला न घाबरता दुर्गम तथा नक्षलग्रस्त भागात मतदानाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, भूसुरुंग स्फोटाची घटना वगळता गडचिरोली जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. नक्षलग्रस्त भाग म्हणून, ओळखल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्यात 55.51 टक्के मतदान झाल्याची माहिती मिळाली आहे. एका बाजुला मुंबई, ठाण्यासारखी शिक्षणाची टक्केवारी सर्वाधिक असणारी सुशिक्षित शहरं, जिथं मतदानाच्या टक्केवारीनं पन्नाशीही गाठली नाही. तर, दुसऱ्या बाजूला नक्षलग्रस्त भागात मतदानाची टक्केवारी चांगली दिसत आहे.

जिल्ह्यात सुरक्षेच्या कारणावरून सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. बहुतांश मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती. दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 66 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. एटापल्ली तालुक्‍यात सुरक्षेच्या कारणाने चार मतदान केंद्रे ऐनवेळी हलवून गट्टा येथील चार नागरिकांच्या घरी मतदान प्रक्रिया पार पाडली. गडचिरोली जिल्ह्यात 992 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. अहेरी, गडचिरोली व आरमोरी या तीन विधानसभा मतदार संघातून एकूण 37 उमेदवारांचे भाग्य इव्हीएम मशिनमध्ये बंद झाले आहे. एटापल्ली तालुक्‍यातील गट्टा पोलिस स्टेशन हद्दीतील गिलनगुड़ा मतदान केंद्रावर जाणाऱ्या निवडणूक पथक व सुरक्षारक्षकांना लक्ष्य करून कुंजेमार्का व गोरगट्टा गाव जंगल परिसरात नक्षल्यांनी स्फोट घडवून आणला. त्यानंतर अंदाधुंद गोळीबार सुरू केल्याने प्रत्युत्तरा दाखल पोलिसांनीही गोळीबार केला. मात्र, पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलात पळून गेले. स्फोटात तसेच चकमकीत कोणीही जखमी झाले नाही. घटनेनंतर पोलिसांकडून नक्षलविरोधी शोध मोहीम तीव्र करण्यात आली.

दरम्यान, शिक्षक बापू पांडू गावडे हे हेडरी येथील बेस कॅम्पवरून रविवारी पुरसलगोंदी येथील मतदान केंद्रावर पथकासोबत पायी जात असताना त्यांना भोवळ आली. ते खाली कोसळल्याने त्यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना लागलीच एटापल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर चंद्रपूर येथे भरती करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.

दोन महिला मतदार गंभीर
एटापल्ली तालुक्‍यातील कोठी येथील मतदान केंद्रावर काही मतदार ट्रॅक्‍टरने जात असताना या वाहनाला अपघात झाला. यात कुदरी नवरीलिंगू पुंगाटी (वय 30) व जुनी पेका येरमा (वय 32) या दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या. हा अपघात खराब रस्ता असल्याने झाला असून ट्रॅक्‍टर ट्रॉलीत चाळीस स्त्री-पुरुष मतदार बसले होते, अशी माहिती उपसरपंच देवू पुंगाटी यांनी दिली. अपघातातील जखमींना शासकीय मदत देण्याची मागणी सरपंच पुंगाटी यांनी केली आहे. मतदार ने-आण करण्यासाठी प्रशासनातर्फे ट्रॅक्‍टर उपलब्ध करून देण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com