Vidhan Sabha 2019 : देवळी मतदारसंघात तिहेरी लढत

शेख सत्तार
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

देवळी (जि. वर्धा) : देवळी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोमाने सुरू झाली आहे. या रणधुमाळीत भाजपचे बंडखोर उमेदवार राजेश बकाणे यांनी निवडणुकीची दिशाच बदलवून टाकली आहे. आधी एकांगी वाटणारी निवडणूक काट्याच्या लढतीत परावर्तित झाली आहे. मतदानाला जेमतेम सहा दिवस राहिले आहेत. त्यामुळे सर्वच उमेदवार "डोअर टू डोअर' प्रचारावर भर देत आहेत.

देवळी (जि. वर्धा) : देवळी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोमाने सुरू झाली आहे. या रणधुमाळीत भाजपचे बंडखोर उमेदवार राजेश बकाणे यांनी निवडणुकीची दिशाच बदलवून टाकली आहे. आधी एकांगी वाटणारी निवडणूक काट्याच्या लढतीत परावर्तित झाली आहे. मतदानाला जेमतेम सहा दिवस राहिले आहेत. त्यामुळे सर्वच उमेदवार "डोअर टू डोअर' प्रचारावर भर देत आहेत.
देवळी मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. या मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार रणजित कांबळे सलग पाचव्यांदा विजय मिळविण्यास इच्छुक आहेत. हा मतदारसंघ कॉंग्रेसकडून हिसकावण्याकरिता सत्ताधारी पक्ष प्रयत्नशील आहे. भाजप-शिवसेनेच्या युतीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. परिणामी, भाजपला मनात असूनही आपल्या कार्यकर्त्याला उमेदवारी देता आली नाही. त्यामुळे भाजपात बंडखोरी झाली. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल केली. युतीच्या उमेदवाराविरुद्ध आरोपांची तोफ डागून त्यांनी आव्हान उभे केले. युतीमध्ये बंडखोरी झाल्याने कार्यकर्त्यांची मोठी पंचाईत झाली आहे. बकाणे यांनी आपल्याला भाजपची उमेदवारी मिळणार या अपेक्षेने आधीपासूनच तयारी केली होती. त्यामुळे त्यांच्या प्रचारात चुरस दिसून येत आहे. मात्र, दुसरीकडे खासदार रामदास तडस हे शिवसेनेचे उमेदवार समीर देशमुख यांच्यासोबत आहेत. त्यांच्या प्रचाराची धुरा त्यांनी सांभाळली आहे. त्यामुळे या निवडणुकीत वेगळे चित्र निर्माण झाले आहे.
कॉंग्रेस, शिवसेना आणि भाजप बंडखोर उमेदवार, अशी तिहेरी लढत होईल, हे स्पष्ट झाले आहे. नेहमी कॉंग्रेससोबत राहणारा राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा गट यावेळी रणजित कांबळे यांच्यासोबत दिसत नाही. तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे हे शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे अल्लीपूर सर्कलचे मतदान कॉंग्रेस आपल्याकडे कसे झुकवू शकेल, असा प्रश्‍न विचारला जात आहे. युतीचे उमेदवार समीर देशमुख यांना मतदारसंघातील निवडणूक लढविणे काहीसे जड जात आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत अडकलेल्या खातेधारकांच्या पैशाचा मुद्दा विरोधक उचलून धरत आहेत. मतदारांमध्येही नाराजीचा सूर उमटत आहे; तरीही जिल्ह्यातील भाजप नेते त्यांच्या प्रचारात जोमाने गुंतले आहेत. युवा आणि नवीन चेहरा या समीर देशमुख यांच्या जमेच्या बाजू आहेत.
बसप, वंचित बहुजन आघाडी, अपक्ष उमेदवार, प्रहार, जनशक्ती, संभाजी ब्रिगेड आदी पक्षांचे उमेदवारही आपापल्या परीने प्रचारात गुंतले आहेत. प्रत्येकाला आपली शक्ती दाखवून द्यायची आहे. मागील निवडणुकीत बसपचे उमेदवार उमेश म्हैसकर यांनी चांगली मते घेतली होती. यावेळी ते अपक्ष उमेदवार म्हणून जोमाने प्रचाराला लागले आहेत. एकूण 14 उमेदवार निवडणूक रिंगणात असले; तरी या मतदारसंघात तिरंगी लढत होईल, अशी चर्चा आहे. यात कोण बाजी मारेल, याविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019: Triple battle in Deoli constituency