Vidhan Sabha 2019 : जागेच्या गणितावरून भाजपसमोर पेच

दीपक फुलबांधे
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

नाराजांसाठी वंचित आघाडी
जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांत भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे इच्छुकांची गर्दी आहे. उमेदवारी जाहीर करताच संबंधित पक्षातील नाराज वंचित आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरून तिरंगी व बहुरंगी लढत होऊ शकते. या वेळी बसपचा प्रभाव कमी असला तरी, वंचितमुळे प्रस्थापितांचे गणित बिघडण्याची शक्‍यता आहे.

विधानसभा 2019 : भंडारा जिल्ह्यातील तिन्हीही विधानसभा मतदारसंघांवर भाजपचे वर्चस्व आहे. राज्यात शिवसेनेसोबत युती झाल्यास भंडारा मतदारसंघ मित्रपक्षासाठी सोडण्याची वेळ येऊ शकते. यावरून युतीचा धर्म की जागेचे गणित असा प्रश्‍न भाजपसमोर येऊ शकतो. दुसरीकडे विरोधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा जिल्ह्यात प्रभाव घटलाय. या पक्षातील बरेच नेते भाजपच्या वाटेवर आहेत.

भंडारा जिल्ह्यात भंडारा (अनुसूचित जाती), साकोली आणि तुमसर हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती नसल्याने दोन्ही पक्षांचे उमेदवार समोरासमोर होते. अनुसूचित जातीसाठी राखीव भंडाऱ्यातून भाजपचे ॲड. रामचंद्र अवसरे विजयी झाले होते. त्यापूर्वी २००९ मध्ये युतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर विजयी झाले होते. येत्या विधानसभा निवडणुकीत युती झाल्यास भाजपला ही जागा शिवसेनेसाठी सोडावी लागेल. परंतु, भाजपचे विद्यमान आमदार असल्याने शिवसेनेला न दुखावता जागा राखून ठेवणे कठीण होणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता भाजपकडे उमेदवारांची रिघ आहे. भाजपकडून इच्छुकांमध्ये नरेंद्र पहाडे, आशू गोंडाणे, जिल्हा परिषद सदस्य अरविंद भालाधरे, मधुसूदन गवई यांची चर्चा आहे.

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवेळी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आणखी बरेच भाजपवासी होण्याची शक्‍यता आहे. यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीचा प्रभाव घटू शकतो. तरीही काँग्रेसमधून जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, राजकपूर राऊत, पूजा ठवकर यांना उमेदवारी मिळू शकते. राष्ट्रवादीचे नितीन तुमानेंचेही प्रयत्न आहेत.

साकोलीत भाजपचे राजेश (बाळा) काशिवार आमदार आहेत. भाजपकडून नवीन चेहऱ्याची अपेक्षा असल्याने प्रकाश बाळबुद्धे, अविनाश ब्राह्मणकर, वामन बेदरे यांचे नाव चर्चेत आहे. काँग्रेसचे ब्रह्मानंद करंजेकर हेही ऐनवेळी उमेदवार होण्याची शक्‍यता आहे. याच मतदारसंघात काँग्रेसचे नाना पटोले यांचा प्रभाव आहे. त्यांचीही उमेदवारी निश्‍चित मानली जाते. तर, माजी आमदार सेवक वाघाये, डॉ. अजय तुमसरे यांचाही वेळेवर काँग्रेसकडून विचार होऊ शकतो.

तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांनी सर्वाधिक विकासकामे खेचून आणलीत. परंतु, मतदारसंघावर तुमसर शहराचे वर्चस्व ठेवण्यासाठी वेगवेगळे गट सक्रिय आहेत. त्यामुळे भाजपमधून माजी खासदार शिशुपाल पटले, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांच्या नावाची चर्चा आहे. तुमसर येथील माजी खासदार मधुकर कुकडे यांची राजकीय मनीषा अजूनही कायम आहे.

त्यांनी नुकतेच उमेदवारी मिळत असल्यास भाजपमध्ये प्रवेश करण्याची तयारी दाखवली होती. परंतु, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. तरीही ते अपक्ष रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. काँग्रेसमधून प्रमोद तितीरमारे, डॉ. पंकज कारेमोरे यांचा इच्छुकांत समावेश आहे. तसेच राष्ट्रवादीमधून अनिल बावनकर, राजू कारेमोरे, अभिषेक कारेमोरे उत्सुक आहेत. ही जागा राष्ट्रवादीला मिळण्याची शक्‍यता आहे. या निवडणुकीत असंतुष्टांची संख्या अधिक असून, ही मंडळी वेळेवर वंचित आघाडी व बसपचे उमेदवार म्हणून आव्हान देऊ शकतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha Election 2019 Bhandara District Seats Issue BJP Politics