मावशी'साठी मामांनी एक पाऊल मागे घेतले!

फ्लॅशबॅक : 2002 मध्ये "टूरटूर'' मालिकेतील एका प्रसंगात लक्ष्मीकांत बेर्डे, मेघना एरंडे, विजय कदम, विजय चव्हाण, राजेश चिटणीस, लक्ष्मीकांत दाभोळकर.
फ्लॅशबॅक : 2002 मध्ये "टूरटूर'' मालिकेतील एका प्रसंगात लक्ष्मीकांत बेर्डे, मेघना एरंडे, विजय कदम, विजय चव्हाण, राजेश चिटणीस, लक्ष्मीकांत दाभोळकर.

नागपूर : साडेपाच-सहा वर्षांपूर्वीची गोष्ट असावी. "झपाटलेला-2'चे शुटिंग मुंबईत सुरू होते. विजय चव्हाण यांच्यासोबत नागपूरचा सुप्रसिद्ध अभिनेता राजेश चिटणीसही यात होता. दुसऱ्या दिवशी सायंकाळी राजेशचा नागपूरमध्ये "मोरूची मावशी'चा प्रयोग होता. विजय चव्हाण यांना हे कळल्यावर त्यांनी एक पाऊल मागे घेतले आणि राजेशचे शुटिंग आटोपून त्याला नागपूरला रवाना केले. विजू मामांशी खास गट्टी असलेल्या राजेशने हा किस्सा "सकाळ'शी बोलताना सांगितला.
"मोरूची मावशी'च्या प्रयोगासाठी विजय चव्हाण अनेकदा नागपूरला आले. नागपूरशी त्यांचे खास जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या अनेक आठवणी नागपूरशीही जुळलेल्या आहेत. राजेशने यातील निवडक आठवणींना उजाळा देताना हा किस्सा सांगितला. "कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये आमच्या सिनेमाचे शुटिंग सुरू होते. दुसऱ्या दिवशी माझा नागपुरात प्रयोग होता आणि रात्रीच मुंबईवरून गाडी पकडून मला निघणे आवश्‍यक होते. त्यावेळी विजय चव्हाण यांच्यासह सर्वच दिग्गजांचे क्‍लोजअप शॉट्‌स व्हायचे होते. अर्थात, त्यांचे आटोपल्यावरच माझा नंबर लागणार होता. पण, विजू मामांनी माझी अस्वस्थता जाणली आणि "मोरूची मावशी'चा प्रयोग आहे असे कळल्यावर सर्वांत आधी राजेशचे क्‍लोजअप आटोपते घ्या, अशा सूचना युनिटला दिल्या. एवढ्या सिनिअर माणसाने आपल्यासाठी हे मोठेपण दाखविणे, भारावून सोडणारे होते. मामांनी माझ्या आणि नाटकाच्या प्रेमाखातर केलेली ही धडपड माझ्या कायम स्मरणात राहणार,' असे राजेश सांगतो.
विजय चव्हाण यांच्यासोबत "शुभमंगल सावधान', "माझा छकुला', "अफलातून', "चल लव कर', "झपाटलेला-2' या चित्रपटांमध्ये त्यांच्यासोबत काम करण्याची संधी राजेशला मिळाली. शिवाय "टूरटूर', "टोकन नंबर' या मालिका आणि "बिघडले स्वर्गाचे दार' या व्यावसायिक नाटकातही राजेशने त्यांच्यासोबत काम केले आहे.
माझी आणि विजू मामांची ओळख 2002 मध्ये झाली. त्यानंतर ते जेव्हा जेव्हा "मोरूची मावशी'च्या प्रयोगासाठी नागपूरला यायचे तेव्हा माझ्याविषयी मुंबईकर कलावंतांना आवर्जून सांगायचे. त्यांच्या प्रेमाला कायमचा मुकणार, याचे दुःख आहे.
- राजेश चिटणीस, अभिनेता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com