करंजीच्या भुमिपूत्राच्या हाती राज्यातील काँग्रेसच्या गटनेतेपदाची कमान

संदीप रायपुरे
शनिवार, 15 जून 2019

आमदार विजय वडेट्टीवार यांचा गोडपिंपरीलगतचा करंजी हा जन्मगाव. याच गावात त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. गोंडपिपरीच्या जनता विद्यालयातही त्यांनी माध्यमिक षिक्षण घेतले. वडील नामदेव वडेट्टीवार करंजीचे सरपंच होते. अचानकपणे त्यांचे निधन झाले.

गोंडपिंपरी :  लोकसभा निवडणुकात काँग्रेसचा अक्षरशः सफाया झाला. वर्षानुवर्षे एकहाती सत्ता असलेल्या पक्षाची झालेली वाताहात चिंतनीय होती. यामुळे पक्षाला तडफदार नेत्यांची गरज आहे. अशात उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेता बनविण्यात आले. गोंडपिपरी तालुक्यातील करंजीच्या भुमिपूत्राच्या वाटयाला आलेल्या या पदाने तालुकयात आनंदाची उधळण होत आहे.

आमदार विजय वडेट्टीवार यांचा गोडपिंपरीलगतचा करंजी हा जन्मगाव. याच गावात त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. गोंडपिपरीच्या जनता विद्यालयातही त्यांनी माध्यमिक षिक्षण घेतले. वडील नामदेव वडेट्टीवार करंजीचे सरपंच होते. अचानकपणे त्यांचे निधन झाले. यावेळी त्यांच्या कुटंबियांवर आभाळ कोसळले. दरम्यानच्या काळात त्यांच्या वाटयाला प्रचंड संघर्ष आला. लहानपणापासूनच काहीतरी करण्याची जिदद त्यांच्यात होती. या जिद्दीखातर त्यांनी कुटुंबियांसह करंजी गाव सोडत गडचिरोली गाठली. नंतर ते आमदार झाले. वनविकास महामंडळाचे अध्यक्ष झाले. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यांनतर विदर्भातील एक आक्रमक चेहरा म्हणून त्यांनी कामगीरी बजावली.  पक्षाने त्यांना उपगटनेते पद दिले.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसचा देशभरासंह राज्यातूनही सफाया झाला. खरतर पक्षासाठी हि अतिशय चिंतनीय बाब होती. चंद्रपूरचे काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांच्या विजयाने पक्षाची लाज राखली. धानोरकर यांच्या विजयाने विजय वडेटटीवार यांचे पक्षातील स्थान बळकट झाले. सध्या काँग्रेसमध्ये पराभवाची कारणमिमांसा करण्याचे काम सुरू आहे. पक्षाला बळकट करण्यासाठी आक्रमक चेह-याची गरज आहे. विरोधकांवर तुटून पडण्यासोबत जनतेचे मनपरिवर्तन करण्यासाठी धारधार नेत्यांना समोर आणण्याचे काम सुरू आहे. अशात आज मुंबईत पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीत आमदार विजय वडेटटीवार यांना गटनेता बनवून मोठी जबाबदारी देण्यात आली.

करंजीच्या भुमिपूत्राच्या हाती राज्यातील काँग्रेसच्या गटनेतेपदाची कमान आल्याची बातमी समजताच गावासह तालुक्यात मोठया प्रमाणावर आनंदाची उधळण करण्यात आली. करंजीत आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासोबत शिक्षण घेतलेले अनेक सवंगडी आहेत. वडेट्टीवारांचा आजही या मित्रांसोबत आपुलकीचे संबध आहेत. आजही त्यांची गावाशी नाळ कायम आहे. करंजी सारख्या लहानशा गावातून गेलेला एक सामान्य कार्यकर्त्याला आज राज्यातील काँग्रेसच्या गटनेतेपदाची जबाबदारी मिळाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Wadettiwar appointed Oppn leader in Assembly