विकास ठाकरे महापालिकेत परतणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

नागपूर - शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष तसेच माजी विरोधी पक्षनेते अध्यक्ष विकास ठाकरे मनोनित सदस्य म्हणून महापालिकेत परतणार असल्याची जोरदार चर्चा कॉंग्रेसच्या वर्तुळात आहे. महापालिकेत प्रचंड बहुमतात असलेल्या भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांचीच नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

नागपूर - शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष तसेच माजी विरोधी पक्षनेते अध्यक्ष विकास ठाकरे मनोनित सदस्य म्हणून महापालिकेत परतणार असल्याची जोरदार चर्चा कॉंग्रेसच्या वर्तुळात आहे. महापालिकेत प्रचंड बहुमतात असलेल्या भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांचीच नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे फक्त 29 सदस्य निवडून आले आहेत. भाजपने प्रचंड मुसंडी मारली असून तब्बल 108 नगरसेवक त्यांचे निवडून आले आहेत. महापालिकेत प्रथमच एका पक्षाची सत्ता आली आहे. यामुळे सत्ताधारी भाजपवर अंकुश ठेवणे आवश्‍यक आहे. कॉंग्रेसने विरोधी पक्षनेता म्हणून संजय महाकाळकर यांची नियुक्ती केली आहे. ते फारसे बोलणार नाहीत तसेच आक्रमकसुद्धा नाही. याशिवाय त्यांच्या नियुक्तीवरून कॉंग्रेसच्या नगरसेवकांमध्येच फूट पडली आहे. ज्येष्ठ नगरसेवक व कॉंग्रेसचे प्रदेश महासचिव प्रफुल्ल गुडधे यांनी स्पष्टपणे नियुक्तीवर नाराजी दर्शवून आपणच जनतेचे नेते असल्याचा दावा केला आहे. ही जबाबदारी आपण स्वीकारत असल्याची घोषणाही त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीर केली आहे. यावरून महापालिकेच्या सभागृहात कॉंग्रेसच परस्परांच्या विरोधात उभी ठाकण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

भाजपच्या एकतर्फी आणि कॉंग्रेसमधील गटबाजीला रोखण्यासाठी विकास ठाकरे यांचीच नियुक्ती करावी असा आग्रह शहर कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमार्फत प्रदेश कॉंग्रेसकडे करण्यात आला असल्याचे बोलल्या जाते.

विकास ठाकरे महापौर होते. सुमारे सात वर्षे विरोधी पक्षनेते होते. यामुळे महापालिकेच्या कारभाराची खडान्‌खडा माहिती त्यांना आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबतही त्यांचे चांगले संबंध आहेत. लोकशाही आणि ठोकशाही अशा दोन्ही पद्धतीने त्यांचा कारभार असल्याने सत्ताधारीसुद्धा त्यांना वचकून असतात. यामुळे त्यांची महापालिकेत उपस्थिती आवश्‍यक असल्याचे कॉंग्रेसचे म्हणणे आहे.

Web Title: vikas thackeray return in municipal