विलास मुत्तेंमवारांना "फटाके'

विलास मुत्तेमवार
विलास मुत्तेमवार

विलास मुत्तेंमवारांना "फटाके'
नागपूर : पक्षश्रेष्ठींची इच्छा नसल्याने माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचा पत्ता जवळपास कट झाला आहे. त्यांना नाही तर विकास ठाकरे यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी जोरदार मागणी आज त्यांच्या समर्थकांनी केली. पर्याय म्हणून माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, प्राचार्य बबनराव तायवाडे यांच्याही नावाची चर्चा आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी मुंबईत कॉंग्रेस पक्षाने आढावा बैठका सुरू केल्या आहेत. शुक्रवारी विदर्भातील उमेदवारांचा आढावा घेण्यात आला. यात नागपूरची उमेदवारी केंद्रस्थानी होती. रा. स्व. संघाच्या मुख्यालयात हेविवेट मंत्री नितीन गडकरी यांना फाईट देण्यासाठी "तगडा' उमेदवार दिला पाहिजे, अशी पक्षश्रेष्ठींची इच्छा आहे. गेल्या निवडणुकीत पावणेतीन लाख मताधिक्‍यांनी पराभूत झालेले विलास मुत्तेमवार पुन्हा बाशिंग बांधून तयार आहेत. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वतंत्रपणे निरीक्षक पाठवून प्रत्येक मतदारसंघाची चाचपणी यापूर्वीच केली आहे. या निरीक्षकांनी मुत्तेमवार यांच्या उमेदवारीला विरोध केल्याचे समजते. निरीक्षकांच्या अहवालानुसार नागपूर शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, प्राचार्य बबनराव तायवाडे यांच्या नावांची शिफारस केलेली असल्याचे समजते.
आजच्या बैठकीत विकास ठाकरे यांनी विलास मुत्तेमवार यांच्या नावाची री ओढली. मुंबईत गेलेल्या इतरांनीही मुत्तेमवार यांच्यासाठी आग्रह धरला, परंतु पक्षश्रेष्ठी मुत्तेमवारांच्या नावावर फारसे इच्छुक नसल्याचे पाहून विकास ठाकरे यांचे नाव समोर करण्यात आले. प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्या नावाला मुत्तेमवार-ठाकरे गटाचा तीव्र विरोध आहे. गुडधे पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास नागपूर शहर कॉंग्रेसचे पदाधिकारी घराबाहेर पडणार नाही, अशी भीती आहे.
विविध समाजाच्या प्रभावाचे गणित
नागपुरातील या गटबाजीत कोणत्याही गटाशी न जुळलेले व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या विश्‍वासातील प्राचार्य बबनराव तायवाडे यांना लॉटरी लागण्याची शक्‍यता आहे. यावेळी तायवाडे यांनी नागपुरात ओबीसी, दलित व मुस्लिम समाजाच्या मतदारांच्या प्रभावाचे गणित प्रदेशाध्यक्षांना समजावून सांगितले. आजच्या घडामोडीत माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या उमदेवारीवरून त्यांचे समर्थकांनी दोन पावले मागे घेतल्याचे मानले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com