चिलगव्हाणकरांच्या काळजात अजूनही होते धस्स!

suicides
suicides

महागाव, (जि. यवतमाळ) : देशातील पहिली सामूहिक शेतकरी आत्महत्या ही महागाव तालुक्‍यातील चिलगव्हाण येथे 19 मार्च 1986 रोजी झाली होती. चिलगव्हाणचे 15 वर्षे सरपंच राहिलेल्या साहेबराव करपे या सधन शेतकऱ्याने पत्नी, तीन मुली व एका मुलासह वर्धा जिल्ह्यातील दत्तपूर आश्रमात आत्महत्या केली होती. तेव्हापासून चिलगव्हाण हे गाव देशाच्या नकाशावर आले. या घटनेनंतर गावात आता फार बदल झालेला आहे. मात्र, सामूहिक शेतकरी आत्महत्येच्या आठवणींनी आजही गावकऱ्यांच्या काळजात धस्स होते.

महागाव या तालुक्‍याच्या गावापासून नऊ किलोमीटर अंतराव चिलगव्हाण हे सधन शेतकऱ्यांचे गाव आहे. या गावातील सधन शेतकरी साहेबराव करपे यांनी पत्नी मालती, मुलगी विश्रांती, मंगला, सारिका व मुलगा भगवान यांच्यासह वर्धा जिल्ह्यातील दत्तपूर आश्रमात 19 मार्च 1986 रोजी सामूहिक आत्महत्या केली होती. ही देशातील पहिली सामूहिक शेतकरी आत्महत्या होती. साहेबराव करपे नावाचा हा धडाडीचा तरुण कार्यकर्ता होता. तब्बल 15 वर्षे ते गावाचे सरपंच होते. 125 एकर जमीन व 24 गडीमाणसे त्यांच्या हाताखाली राबायची. 10 एचपीचा मोटरपंप त्यांच्या विहिरीवर होता. ते शेतात नवीन प्रयोग करायचे. शेतात केळी लावली होती. बॅंक व खासगी कर्ज त्यांच्यावर होते. अशातच वीज मंडळाने त्यांच्या घरचा व कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे त्यांचा आत्मसन्मान दुखावला गेला. हा प्रसंग साहेबराव यांच्या मनावर खोल परिणाम करून गेला.
खचलेल्या लोकांचा आधार असलेला हा तरुण स्वतःच आतून पूर्ण खचला. आता जगायचं तरी कशाला, हा विचार त्याच्या मनात आला. आपल्या पतीच्या मनातील काहूर मात्र मालतीच्या लक्षात आले नव्हते. 19 मार्च 1986 ला साहेबराव, पत्नी मालती व मुलगी विश्रांती, मुलगी मंगला, मुलगी सारिका, मुलगा भगवान यांना यात्रेच्या नावाखाली वर्धा जिल्ह्यातील दत्तपूर आश्रमात घेऊन गेले. पत्नी व चार लेकरांना बापाचे मनसुबे माहित नव्हते. साहेबरावाने विषारी द्रव्य सोबत घेतले होती. दत्तपूर आश्रमात ते पोहोचले तेव्हा साहेबराव अस्वस्थच होता. तिथे गेल्यावर त्याने विष कालवलेली भजी विश्रांती, मंगला व सारिकाला खाऊ घातली. भगवानला डेमॉक्रॉन पाजले. भगवानचा जीव जात नव्हता, तर त्याच्या अंगावर घोंगडे टाकून नारळाच्या दोरीने त्याला संपविले. चार मुलांचा जीव गेल्यानंतर मालतीला व नंतर स्वतःला साहेबरावाने संपविले. तत्पूर्वी त्याने पाचही जणांच्या कपाळावर एक रुपयाचे कलदार (नाणे) ठेवले होते.
स्वतःला संपविण्यापूर्वी साहेबरावनी एक चिठ्ठी लिहून ठेवली. या चिठ्ठीत त्याने आपली वेदना व्यक्त केली आहे. स्वतःला मृत्यूच्या स्वाधीन करण्यापूर्वी संगीतप्रेमी साहेबराव करपे यांनी "येऊ दे दया आता तरी गुरुमाऊली', या आयुष्याची दोरी कमी जाहली' हे भजन म्हटले. 19 मार्च 1986 ला रात्री 12 वा. 45 मिनिटांनी हे थरारनाट्य संपले. दुसऱ्या दिवशी या सामूहिक आत्महत्याकांडाने अख्खा महाराष्ट्र हादरला. चिलगव्हाण दोन दिवस मूक आक्रंदन करीत राहिले. सहा प्रेते जवळजवळ ठेवण्यात आली अन्‌ हजारो लोकांच्या साक्षीनं हे कुटुंब अग्नीच्या स्वाधीन होत काळाच्या उदरात गडप झालं. त्यामुळे चिलगव्हाण या गावाचे नाव संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. आज या गावातील काय परिस्थिती आहे हे पाण्यासाठी 'सकाळ'ने दोन दिवसांपूर्वी भेट दिली. तेथील नागरिकांशी संवाद साधला. दरवर्षी या गावात साहेबराव करपे कुटुंबीयांच्या स्मृतिप्रीत्यर्थ किसानपुत्र आंदोलन समितीकडून 'अन्नत्याग आत्मक्‍लेश आंदोलन' 19 मार्चला आयोजित केले जाते. परंतु, यावर्षी कोरोना व ग्रामपंचायत निवडणुकीमुळे हे आंदोलन स्थगित केल्याची माहिती बाळासाहेब करपे या तरुणाने दिली. या गावात स्वातंत्र्यापासून कधीही ग्रामपंचायतीची निवडणूक झाली नाही. यंदा अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने प्रथमच निवडणूक होत आहे.

साहेबराव करपे यांच्या चिरेबंदी वाड्याचा मालक आता बदलला आहे. तो दुसऱ्याने विकत घेतला आहे. गावाला जाणारा रस्ता डांबरी झाला. गावाबाहेर स्वच्छ आणि हागणदारीमुक्त गाव असल्याचा फलक आहे. झाडाझुडूंपामध्ये वसलेले हे गाव आता टापपीप झाले आहे. परंतु, सामूहिक शेतकरी आत्महत्येचे व्रण आजही त्या गावाच्या आत्म्यावर चिकटून असल्याचे तेथील लोकांशी चर्चा करताना स्पष्ट जाणवते. त्या खुणा मिटल्या असल्या तरी त्या आठवणींनी आजही गावकऱ्यांच्या काळजात धस्स होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com