वन्य जीव, आश्रयस्थाने, भ्रमणमार्ग विकासावर भर

राजेश रामपूरकर
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016

नागपूर - वन व वन्य जिवांच्या संवर्धनासाठी वन खात्याने आतापर्यंत ७८ संरक्षित जंगलांतील गावांचे पुनर्वसन केले असून येत्या दोन वर्षांत आणखी दहा गावांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातील वन्य जीव भ्रमणमार्गांचा शोध घेण्याचे काम संशोधक करीत असून हे कार्यसुद्धा प्रगतिपथावर आहे. राज्यातील वन्य प्राण्यांना लावण्यात आलेल्या रेडिओ कॉलरवरून भ्रमणमार्गाचा शोध घेण्यात काही प्रमाणात यश आले आहे.

नागपूर - वन व वन्य जिवांच्या संवर्धनासाठी वन खात्याने आतापर्यंत ७८ संरक्षित जंगलांतील गावांचे पुनर्वसन केले असून येत्या दोन वर्षांत आणखी दहा गावांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातील वन्य जीव भ्रमणमार्गांचा शोध घेण्याचे काम संशोधक करीत असून हे कार्यसुद्धा प्रगतिपथावर आहे. राज्यातील वन्य प्राण्यांना लावण्यात आलेल्या रेडिओ कॉलरवरून भ्रमणमार्गाचा शोध घेण्यात काही प्रमाणात यश आले आहे.

त्यातून वन व वन्य जीव संवर्धन करण्यास नवी दिशा मिळणार आहे. 
महाराष्ट्रात १९.३४ टक्के जंगले संरक्षित असून वाढती लोकसंख्या आणि विकासामुळे जंगल क्षेत्र दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे. यामुळे राज्यात वन्य जीव व मानव संघर्ष वाढू लागला आहे. राष्ट्रीय वन्य जीव कृती आराखड्याअंतर्गत वने व वन्य जीव संवर्धनासाठी संरक्षित क्षेत्रालगतच्या गावांमध्ये ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागाने जन वनविकास साधण्यासाठी ‘डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना’ सरकारने सुरू केली आहे. या योजनेत गावातील जन, जल, जंगल, जमीन या संसाधनांचा शाश्‍वत विकास साधून उत्पादन वाढविणे, गावकऱ्यांची वनांवरील निर्भरता कमी करणे, पर्यायी रोजगार उपलब्ध करणे, मानव व वन्य जीव संघर्ष कमी करण्यावर भर देण्यात येणार आहे. 
 

वन्य जिवांसाठी चोवीस तास गस्त
सोलापूर ः वन्य जिवांच्या सुरक्षेसाठी वन आणि अभयारण्य परिसरात दिवसा आणि रात्री वन विभागाकडून गस्त घालण्यात येत आहे. वन्य जिवांचा वनहद्द आणि अभयारण्याच्या बाहेरचा वावर कमी व्हावा,  त्यांना मुबलक चारा उपलब्ध व्हावा म्हणून कुरण विकास कार्यक्रमाअंतर्गत वनहद्दीत अंजन, पवण्या, खेडा, डोंगरी आदी गवताच्या प्रजातींची लागवड करण्यात आली आहे. सोलापूर वनविभागाच्या हद्दीत ७५ ठिकाणी पाणवठे असून ६० हेक्‍टर परिसरात गवताची लागवड केली आहे. यंदा नव्याने ३० ठिकाणी पाणवठे करण्यात येणार आहेत. नान्नज येथील माळढोक पक्षी अभयारण्यात १२ ठिकाणी पाणवठे असून दोन ठिकाणी वीस हेक्‍टर परिसरात गवत लागवड केली आहे.

भ्रमणमार्गांच्या अभ्यासाला गती
वन्य जिवांचे संवर्धन करीत असताना वन्य जिवांच्या भ्रमणमार्गाचा अभ्यास मात्र आतापर्यंत झाला नव्हता. या विषयाचा अभ्यास करण्यासाठी वाघासह काही वन्य प्राण्यांना रेडिओ कॉलर लावण्यात आली आहे. त्यातून भ्रमणमार्ग निश्‍चित होण्यास मदत होणार आहे. संरक्षित क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन करताना वन्य जिवांच्या आश्रयस्थानाचा दर्जा उंचावण्यावर भर देण्यात येत आहे. त्यानुसार वनांतील नैसर्गिक पाणस्थळांचे व्यवस्थापन, नवीन पाणवठे तयार करण्यावर भर दिला जात आहे. कुरण विकास कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. त्यामुळे तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढेल; सोबतच मांसाहरी वन्य प्राणी जंगलातच खाद्य उपलब्ध झाल्याने बाहेर येणार नाहीत. परिणामी, मानव व वन्य जीव संघर्ष कमी होण्यास मदत होणार आहे.

वन्य जीव व वनांचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी जनजागृतीचे काम करण्यात येत आहे. तसेच श्‍यामाप्रसाद मुखर्जी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांचे जंगलांवरील अवलंबित्व कमी करण्यावर सरकारचा भर आहे. 
- गिरीश वशिष्ठ, विभागीय वनाधिकारी

Web Title: village rehabilitation for wild animal security

टॅग्स