आता नक्षल्यांची खैर नाही; नागरिकांत धुमसतोय असंतोष

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 December 2019

गडचिरोली : कधीकाळी आदिवासी व गरिब नागरिकांना न्याय देण्याच्या बाता करीत त्यांना सरकारविरोधी चिथावणी देणाऱ्या नक्षलवाद्यांचे खरे स्वरूप हळूहळू लोकांच्या लक्षात आले आहे. आता नक्षलवाद्यांविरोधात ग्रामीण भागांत असंतोष धुमसताना दिसून येत आहे.

गडचिरोली : नक्षलवाद्यांविरोधात ग्रामीण भागांत असंतोष धुमसताना दिसून येत आहे. मागील काही वर्षांत गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांना अनेक ठिकाणी पोलिसांनी लोळवले आहे. त्यामुळे कुठे फलक लावून, तर कुठे रस्त्याच्या कडेला असलेल्या वाहतूक निदर्शक फलकांवर नक्षल्यांविरोधात संदेश लिहून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शिवाय ही चळवळ आता भरकटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही त्यांच्याविषयी फारशी सहानुभूती दिसत नाही. म्हणूनच पूर्वी गावात किंवा जंगलात लावलेला नक्षलवाद्यांचा फलक, बॅनर स्पर्शही न करणारे नागरिक आता त्या फलकांची, बॅनर्सची होळी करू लागले आहेत.

Image may contain: one or more people, people standing, fire and outdoor
नक्षल्यांच्या बॅऩरची जाळपोळ करताना नागरिक.

नक्षलवाद्यांचा पीएलजीए सप्ताह

एवढेच नव्हे; तर त्यांच्याप्रमाणेच संदेश लिहून त्यांच्याच स्टाइलमध्ये त्यांना उत्तर देताना दिसून येत आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत फिरताना नक्षलविरोधी संदेश अनेक ठिकाणी दिसून येत आहेत. सरकारविरोधात गरळ ओकत निष्पाप नागरिकांचे बळी घेण्याचे काम नक्षलवादी करीत आहेत. सध्या नक्षलवाद्यांचा पीएलजीए सप्ताह सुरू आहे. यादरम्यानही त्यांनी अनेक हिंसक घटना घडविल्या आहेत.

Image may contain: outdoor and nature
नक्षल्यांचे बॅऩर

आठवड्यात केली तिघांची हत्या

कोरची तालुक्‍यातील भिमनखोजी पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी 27 नोव्हेंबरच्या रात्री मनोज दयाराम हिडको या अवघ्या 17 वर्षांच्या युवकाची गोळ्या घालून हत्या केली. अहेरी तालुक्‍यातील पेरमिली गावाजवळ झाडे आडवी टाकून व बॅनर बांधून रस्ता अडविला होता. एटापल्ली तालुक्‍यातील पुरसलगोंदी येथील मासू पुंगाटी(वय 55) व ऋषी मेश्राम(वय 52) यांची हत्या केली. यातील मासू पुंगाटी हे गाव पाटील, तर ऋषी मेश्राम हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते होते.

पोलिसांनी स्फोटकेकेली निकामी

पोलिसांचा घातपात करण्याच्या उद्देशाने नक्षल्यांनी जमिनीत 15 किलो स्फोटके पुरून ठेवली होती. भामरागड तालुक्‍यातील लाहेरी-धोडराज मार्गावर ही स्फोटके पुरून ठेवल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही स्फोटके निकामी केली. नक्षल्यांचा हा कट उधळून लावला. नक्षलवादी अशा हिंसक कारवाया करीत असल्याने आता नागरिकही त्रस्त झाले आहेत. विविध माध्यमातून नक्षलवाद्यांच्या विरोधात संताप व्यक्त होताना दिसत आहे.

वाचा : कसं शक्‍य आहे? कोंबडीबिना उबविता येणार अंडी... वाचा

पोलिसांची दुहेरी कामगिरी

गडचिरोली पोलिस एकीकडे नक्षलवाद्यांना आपल्या बंदुकांनी कंठस्नान घालतानाच दुसरीकडे जनजागरण मेळावे व विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांची मने जिंकत आहेत. त्यांच्या या दुहेरी कामगिरीचे कौतुक होत आहे. 30 नोव्हेंबरच्या सकाळी भामरागड तालुक्‍यातील लाहेरी पलीकडील अबुझमाड जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी दोन नक्षल्यांना कंठस्नान घातले होते. त्यामुळे बिथरलेल्या नक्षलवाद्यांनी नागरिकांचे हत्यासत्र राबविले. पण, त्यांच्याबद्दल नागरिकांमध्ये रोष दिसून येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: villagers from gadchiroli districts stand against maoist