आता गावेही स्मार्ट करायची म्हणतात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

नागपूर - नागपूर शहराची स्मार्ट सिटीकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे. त्या तुलनेत जिल्ह्यातील गावेदेखील मागे राहू नयेत. त्यांचाही स्मार्ट शहराप्रमाणेच सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी जिल्ह्यातील 13 गावांची स्मार्ट ग्राम म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याची अधिकृत घोषणा 26 जानेवारीला होणार आहे. 

नागपूर - नागपूर शहराची स्मार्ट सिटीकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे. त्या तुलनेत जिल्ह्यातील गावेदेखील मागे राहू नयेत. त्यांचाही स्मार्ट शहराप्रमाणेच सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी जिल्ह्यातील 13 गावांची स्मार्ट ग्राम म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याची अधिकृत घोषणा 26 जानेवारीला होणार आहे. 

ग्रामविकास मंत्रालयाने स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील काही गावे स्मार्ट करण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत जिल्हा परिषद पंचायत विभागाने 13 तालुक्‍यांतील प्रत्येकी एक गाव स्मार्ट ग्रामसाठी तर यापैकी एका गावाची जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून निवड करण्यात आली आहे. स्मार्ट ग्राम गावाला 10 लाख आणि जिल्हा स्मार्ट ग्राम गावाला 50 लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. गावांची निवड करण्यासाठी तालुका आणि जिल्हास्तरावर समित्या गठित करण्यात आल्या. या समित्यांनी गावांची पाहणी करून तेथे उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधांनुसार गुण दिले. गुणानुसार गावांची निवड करण्यात आली. निवड केलेल्या गावांसंदर्भात काहींना आक्षेप असल्यास तेदेखील मागविले आहे. एकंदरीत गावांची निवड पारदर्शकपणे व्हावी. कारण पुढे स्मार्ट गावांमध्ये लोकसहभाग आणि त्यांच्या सूचनानुसार विकासात्मक कामे करायची आहेत. स्मार्ट ग्राममुळे गावात पायाभूत आणि मूलभूत सुविधा निर्माण करणे, शेतीसाठी पांदण रस्ते, ग्रामपंचायतीचे संगणीकरण, ग्रामसभेचे बळकटीकरण, पाण्याचा ताळेबंद, कृषी मालासाठी बाजारपेठ, दर्जेदार शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा निर्माण करणाऱ्यावर भर दिला जाणार आहे. एकंदरीत ही गावे केवळ नावापुरतीच स्मार्ट नव्हे तर वास्तविक स्वरूपात व्हावी. या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहे. याद्वारे गावे स्वयंपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम केली जाणार आहेत. 
 

पुरस्काराची रक्कम यावर होणार खर्च 
स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत निवड झालेल्या गावांना बक्षीस स्वरूपात प्राप्त होणारी रक्कम घनकचरा व्यवस्थापन, बायोमॉस प्रकल्प, खतनिर्मिती प्रकल्प, सौरऊर्जेचे साहित्य खरेदी करण्यासाठी खर्च करता येणार आहे. याशिवाय गावातील अन्य महत्त्वपूर्ण विकास कामावर ही रक्कम खर्च करता येणार आहे. त्यासाठी ग्रामसभेची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

अशी आहे निवड समिती 
स्मार्ट ग्रामची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीमध्ये जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा कृषी विकास अधिकारी, पाणीपुरवठा व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, मुख्य लेखावित्त अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत यांचा समावेश आहे. तर, तालुकास्तरीय समितीत बीडीओ, विस्तार अधिकारी, आरोग्य अधिकारी, कृषी अधिकारी, पाणीपुरवठा सहाय्यक यांचा समावेश आहे. 

स्मार्ट ग्रामची वैशिष्ट्ये 
- बक्षिसाचा निधी घनकचरा व्यवस्थापनावर 
- सौरऊर्जेवरील योजनांना प्राधान्य 
- पायाभूत सुविधांवर भर 
- गावे इंटरनेटने स्वयंपूर्ण 
- शुद्ध पाण्यासाठी प्रकल्प 

Web Title: Villages called to smart